शेतकऱ्यांसाठीची पहिली औद्योगिक वसाहत जालन्यात

कृषी उद्योग
कृषी उद्योग

मुंबई : शेतकऱ्यांची पहिली औद्योगिक वसाहत जालन्यातील परतूर तालुक्यातील आष्टी या गावात होत आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचा उद्योजक होण्याचा मार्ग प्रशस्‍त होईल आणि उत्पन्न वाढण्यासदेखील मदत होणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव लवकरात लवकर मंजुरीसाठी सादर करण्यात यावा, अशा सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात रुर्बन व मानव विकास कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा शासनाचा संकल्प असून त्या दिशेने शासनाची वाटचाल सुरू आहे. यासाठी विविध विभागांच्या समन्वयातून या कामाला गती देण्यात येत असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. ते म्हणाले, गाव पातळीवर सूक्ष्म नियोजनातून यासाठी हाती घ्यावयाच्या प्रकल्पांची निश्चिती केली जात आहे. जालना जिल्ह्याने पुढाकार घेऊन रुर्बन तसेच मानव विकास कार्यक्रमांतर्गत तयार केलेला कार्यक्रम त्या दिशेने टाकलेले एक चांगले पाऊल आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या उत्पादनांवर त्याच शेतकऱ्यांच्या औद्योगिक वसाहतीमधील विविध कारखान्यांमधून किंवा उद्योगांच्या माध्यमातून प्रकिया केल्या जातील, त्याचे मूल्यवर्धन केले जाईल, यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. यातून रोजगार संधीची निर्मिती होईल, असे सांगून श्री. लोणीकर म्हणाले की, यासाठी तीन वर्षे कालावधीचा आणि १८५ कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. प्रकल्पासाठी २० एकर जागादेखील उपलब्ध करून घेण्यात आली आहे.  तसेच मानव विकास मिशनअंतर्गत ५० तर श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशनच्या माध्यमातून ५० प्रकल्प यामध्ये हाती घेण्यात येतील. एका शेतकरी समूहात ५० सदस्य असतील साधारणत: ३०० कुटुंबांना याचा लाभ मिळेल. प्रस्तावित प्रकल्पामध्ये १८ प्रकारच्या कृषी, कृषिपूरक व इतर संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असून आष्टी तालुक्यातील १६ खेड्यांना याचा लाभ होईल. यात ६० शेतकरी समूह गट स्थापन करण्यात येतील. प्रस्तावित रुर्बन प्रकल्पामध्ये मूलभूत सोयीसुविधा, सर्व सुविधा युक्त ६० उद्योग, यंत्रसामग्री, प्रशिक्षण, क्षमतावृद्धी आणि सहाय्य या बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. अशा प्रकारचा हा राज्यातील पहिलाच उपक्रम राहणार असल्याचे श्री. लोणीकर यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com