सांगलीच्या ५९६ शेतकऱ्यांचा कर्जमुक्तीच्या पहिल्या यादीत समावेश

The first list of debt relief comprises 596 Sangli farmers
The first list of debt relief comprises 596 Sangli farmers

सांगली ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत म्हैसाळ येथील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणीकरण करून या योजनेचा प्रारंभ जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्ह्यातील ५९६ शेतकऱ्यांचा कर्जमुक्ती योजनेत समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ९० हजार १०७ पात्र शेतकऱ्यांच्या याद्या २८ फेब्रुवारी पर्यंत उपलब्ध होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील म्हैसाळ आणि आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथील थकबाकीदार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले. म्हैसाळ येथील वसंत विकास सोसायटीमध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमास उपनिबंधक मिरज आदीनाथ दगडे तसेच संस्थेचे पदाधिकारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

जिल्हा उपनिबंधक करे म्हणाले, ‘‘म्हैसाळ येथील ३७५ व बनपुरी येथील २२१ पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर असून त्यांचे आधार प्रमाणीकरण केले जाणार आहे. या याद्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास त्यांची त्या-त्या स्तरावर निर्गती केली जाईल, असे जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हा उपनिबंधक यांनी आधार प्रमाणीकरणाच्या कामाची पाहणी केली. तसेच आधार प्रमाणीकरण केलेल्या शेतकऱ्यांना पोच पावत्यांचे वितरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले. महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. या योजनेच्या अंमलबजावणीत कोणत्याही त्रुटी राहु नयेत, यासाठी प्रशासन सतर्क असून जिल्ह्यातील ९० हजार १०७ थकबाकीदार शेतकरी सभासदांची जवळपास ५२८ कोटी रूपयांची कर्जमाफी होवून हे शेतकरी कर्जमुक्त होतील. या सर्व शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली असून २८ तारखेपर्यंत याद्या उपलब्ध होतील. 

या याद्या ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, विकास सोसायटी तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संबंधित शाखेत लावल्या जाणार आहेत. यावेळी उपनिबंधक मिरज आदिनाथ दगडे, वसंत विकास सोसायटीचे अध्यक्ष धनराज शिंदे, सचिव भरत माळी, ग्रामपंचायत सदस्य दौलत शिंदे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी, शेतकरी उपस्थित होते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com