कर्जमाफीची पहिली यादी जाहीर; ६८ गावांतील १५ हजार शेतकऱ्यांना लाभ

loan waiver scheme
loan waiver scheme

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सोमवारी (ता.२४) महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर करण्यात आली. ६८ गावांमधील १५ हजार ३६८  शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर काही तासांतच कर्जमाफीची ही यादी सरकारने जाहीर केले. लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांनी या कर्जमाफीविषयी समाधान व्यक्त केले. योजनेअंतर्गत आतापर्यंत ३४ लाख ८३ हजार ९०८ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती नोंदवण्यात आली आहे.  अद्यापही १ लाख ६१ हजार कर्जखात्यांची माहिती आलेली नाही. प्रकाशित झालेल्या यादीमध्ये ६८ गावातील १५ हजार ३६८ लोकांची नावे आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील २ गावांचा या यादीत समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आसुर्ले आणि हेरले या दोन गावातील नावांची यादी पहिल्या टप्प्यात जाहीर झाली आहे.  नगर जिल्ह्यातील ९७२ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली आहे. ब्राह्मणी (ता. राहुरी) गावातील ८५६, तर जखणगाव (ता. नगर) मधील ११६ शेतकऱ्यांची नावे या यादीत आहेत. नगर जिल्ह्यात २ लाख १५ हजार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असल्याचे सांगण्यात आले. उस्मानाबाद जिल्ह्यातील तामलवाडी आणि पाथरूड या दोन गावातील ३१२ शेतकऱ्यांची यादी जिल्हाधिकारी दीपा मुंडे मुधोळ यांनी जाहीर केली आहे.  हिंगोली जिल्ह्यातील २३६ शेतकऱ्यांचा कर्जमाफीच्या यादीत समावेश झाला आहे. हिंगोली तालुक्यातील समगा आणि खरबी या गावांना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी भेट दिली. कर्जमाफी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी यादी जाहीर झाल्यानंतर त्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. तसेच कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांना तसे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. दुसरी यादी २८ फेब्रुवारीला ज्या शेतकऱ्यांचे पीककर्ज २ लाख रुपयांपर्यंतचे आहे, त्या शेतकऱ्यांची ही पहिली यादी आहे, अंतिम नाही. कर्जमुक्तीच्या पहिल्या यादीतील शेतकऱ्यांना लाभ मिळाल्यानंतर आम्ही टप्प्याटप्प्याने यादी जाहीर करू. दुसरी यादी २८ फेब्रुवारीला जाहीर होईल. येत्या तीन महिन्यांच्या कालावधीत ही योजना पूर्ण होईल. एप्रिलच्या अखेरपर्यंत ही योजना पूर्ण होईल, असे  उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com