ऑक्टोबरमध्ये प्रथमच ब्रॉयलर बाजार शंभरीच्या पार

ऑक्टोबरमध्ये प्रथमच ब्रॉयलर बाजार शंभरीच्या पार
ऑक्टोबरमध्ये प्रथमच ब्रॉयलर बाजार शंभरीच्या पार

ब्रॉयलर्सचे बाजारभाव वर्षातील उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. अनपेक्षितपणे बाजारभावात मोठी तेजी आली आहे. यापुढील कालावधीतही बाजार तेजीत राहतील, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

नाशिक विभागात शनिवारी (ता. २०) ९६ रु. प्रतिकिलो दराने ब्रॉयलर्स पक्ष्यांचे लिफ्टिंग झाले. आठवडाभरात बाजारभाव प्रतिकिलो तब्बल २२ रु. ने वधारला आहे. ब्रॉयलर पोल्ट्री विभागात वाढत्या तापमानामुळे पक्ष्यांचे वजन वाढत नाही. खासकरून मालेगावसारख्या विभागात ३५ अंशापुढे तापमानाचा पारा पोचला आहे. याशिवाय पुणे व नाशिक अनुक्रमे ३४ अंशावर पोचले आहे. अलिबाग येथेही ३२ अंशावर पारा सरकला आहे. यामुळे उत्पादन नियंत्रित होण्यास मदत मिळाली आहे.

कोमरला समूहाचे संचालक कृष्णचरण म्हणाले, की बाजारात जोरदार मागणी आहे. सरासरी वजने सव्वादोन किलोच्या आत आहेत. दक्षिण भारतातील बाजारदेखील तेजीत असून, हैदराबाद आणि बंगळूर येथील बाजारभाव ९५ रु. प्रतिकिलोदरम्यान आहेत. यापुढील काळातही बाजारात तेजी टिकून राहील.

खडकेश्वर हॅजरिजचे संचालक संजय नळगीरकर म्हणाले, की ऑक्टोबरमध्ये प्रथमच ब्रॉयलरचे भाव शंभरावर पोचले आहेत. औरंगाबाद विभागात दीड किलोच्या आतील पक्ष्यांना १०० रु. दर मिळाला, तर सव्वादोन किलोचे पक्षी यांना ९५ रु. दर मिळाला. रविवारी (ता. २१) रोजी किरकोळ खप जोरदार होता. हॉटेल्स, केटरर्सकडील मागणीही वाढली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील चिकन शॉप्सवर चांगली विक्री झाली. १८० ते २०० रु. प्रतिकिलो दरम्यान बोर्ड रेट्स होते. सध्या मटणाचे भाव ४६० ते ५०० रु. अशा उंच पातळीवर आहेत, त्यामुळेही चिकनकडे ग्राहकांचा कल राहील, असे सांगून श्री. नळगीरकर सांगितले की, चालू आठवड्यात शेजारील राज्यांमुळे थोडा दबाव आला तरी बाजार ९० रु. च्या वर राहू शकतो. सर्वांनी टप्प्याटप्प्याने माल काढत राहणे योग्य राहील. यापुढील काळात उपवासाचे सणवार नसतील. त्यामुळे खप चांगला असेल. चिक्स व हॅचिंग एग्जचा पुरवठा नियंत्रित आहे. त्यामुळे बाजारभाव ८० रु. प्रतिकिलोच्या वर राहील.

‘मार्केटच्या दृष्टीने दरवर्षी ‘फेल’ जाणारा दसरा या वर्षी किफायती ठरला,’ असे देवळ्यातील पोल्ट्री फार्मर मनोज कापसे सांगितले. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झालेली ऑक्टोबर हीट, दरवर्षी नवरात्र व दसऱ्याला बाजार पडत असल्यामुळे इंटिग्रेटर्सकडून झालेली संयमित प्लेसमेंट यामुळे बाजार चांगला मिळाला. ब्रॉयलर्स मार्केटही अन्य शेतमालासारखे ट्रेंड होते. ज्या वेळी तेजी असते, तेव्हा माल वेगाने विक्री होतो, पोल्ट्रीशेडमध्ये माल साचून राहत नाही, पर्यायने वजने वाढत नाहीत, म्हणजेच इन्व्हेंटरी वाढत नाही. असे झाले की बाजार उंचावतो. खास करून जेव्हा जेव्हा वातावरण प्रतिकूल असते, तेव्हा तेजी हमखास टिकते.

गेल्या वीस वर्षांत देवळा विभागात ऑक्टोबर इतका तापला नव्हता, असे मनोज कापसे यांनी सांगतात. त्यावरून तेजीचे प्रमुख कारण स्पष्ट होते. कळवण, देवळा, सटाणा, मालेगाव, नांदगाव हे राज्यात सर्वाधिक ब्रॉयलर उत्पादन करणाऱ्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पाऊसच झाला नाही. पू्र्ण हंगामात सरासरीपेक्षा निम्म्याने पाऊस कमी झालाय. अनेक गावांत भूजल साठाच वाढला नाही. आतापासूनच पिण्याच्या पाण्याचे हाल आहेत. त्यामुळे कोंबड्यांना कसे पाणी उपलब्ध करणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. ब्रॉयलरमधील तेजीमुळे पिले व हॅचिंग्ज एग्जचा बाजारही सुधारला आहे. पिलांचे दर १ रु. ने वधारून ३६ रु.पर्यंत पोचले, तर हॅचिंग एग्जचे दर दीड रु.ने वाढून २८ रु. प्रतिनग झाले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com