सांगली जिल्ह्यात महापुरामुळे मत्स्यशेतीचे तीन कोटींचे नुकसान

महापुरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांनी भरपाईसाठी प्रस्ताव द्यावेत. - अमर पाटील, सहायक आयुक्त.
पुरात शेततळ्यांचे झालेले नुकसान
पुरात शेततळ्यांचे झालेले नुकसान

 मिरज, जि. सांगली  : महापुरात शेततळी वाहून गेल्याने मत्स्यशेतीचे सुमारे तीन कोटींचे नुकसान झाले आहे. पुरात तयार मासे आणि मत्स्यबीजे वाहून गेली. मच्छीमारांची जाळी व होड्याही वाहून गेल्या. भरपाईसाठी प्रस्ताव देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

जिल्ह्यातील ढवळी, म्हैसाळ, भिलवडी, धनगाव, हरिपूर, सांगली, मिरज, डिग्रज, वसगडे, पलूस, वाळवा आदी गावांत महापुरामुळे नुकसानीची तीव्रता अधिक आहे. शेतकऱ्यांनी मत्स्यशेतीसाठी लाखोंची गुंतवणूक केली आहे. महापुराचे पाणी शेततळ्यांवरून गेले, त्यासोबत तयार मासे आणि मत्स्यबीजेही वाहून गेली. अनेक शेततळी बांध फुटून रिकामी झाली आहेत.

प्रादेशिक मत्स्य व्यवसाय उपायुक्त अभय देशपांडे यांनी नुकसानीची पाहणी केली. म्हैसाळ, हरिपूर, ढवळी, मिरज येथे मत्स्योत्पादन केंद्रांना त्यांनी भेटी देऊन मत्स्य व्यावसायिक व मच्छीमार संस्थांशी संवाद साधला. सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त मत्स्य व्यावसायिकांसाठी १४ कोटी रुपये मिळाले आहेत. 

भिलवडीमध्ये चार टन मासे गेले वाहून  भिलवडीमध्ये वैभव पवार आणि धनगावमध्ये सुरेश पाटील यांच्या शेततळ्यांमध्ये पंगेशियन जातीचे चार टन मासे तयार होते. बाजारात नेण्यापूर्वीच महापूर आला. तळी फुटून चार टन मासे वाहून गेले. म्हैसाळमध्ये पार्वती मच्छीमार संस्थेअंतर्गत मोठ्या संख्येने बागडी समाज मासेमारी करतो, त्यांची जाळी महापुरात वाहून गेली. पश्‍चिम भागात मच्छीमारांच्या होड्याही वाहून गेल्या. उपायुक्त अभय देशपांडे यांनी भरपाईसाठी प्रस्तावाच्या सूचना शेतकऱ्यांना केल्या. नीलक्रांती योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेततळे तयार करण्यापासून मत्स्योत्पादन व विक्रीपर्यंत प्रत्येक स्तरावर मदत केली जाते. त्यासाठी वर्षभरात एकही प्रस्ताव का आला नाही, अशी विचारणा केली. या वेळी सहायक आयुक्त अमर पाटील, हेमंत जाधव, कोल्हापूरचे प्रदीप सुर्वे उपस्थित होते.    २००५ चे अनुदान अद्याप नाही  २००५ च्या महापुरात मत्स्यशेतीची अतोनात हानी झाली. हेक्‍टरी ८ हजारांच्या भरपाईचा अध्यादेश शासनाने काढला. त्याची अंमलबजावणी झालीच नाही. आजतागायत अनेकांना भरपाई मिळालीच नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे या वेळीही भरपाई मिळण्याबाबत साशंकता आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com