अकोला जिल्ह्यात मत्स्यपालन शेतीला प्रोत्साहन देणार : भारती

अकोला जिल्ह्यात मत्स्यपालन शेतीला प्रोत्साहन देणार : भारती
अकोला जिल्ह्यात मत्स्यपालन शेतीला प्रोत्साहन देणार : भारती

अकोला : शेतीला जोड धंदा म्हणून जिल्ह्यात या वर्षी मत्‍स्यपालनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाणार आहे. निलक्रांती योजनेअंतर्गत प्रामुख्याने खारपाण पट्ट्यातील १०० शेतकऱ्यांची निवड करण्यात येईल. त्यांना या व्यवसायात उतरविण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जाणार आहे, अशी माहिती मत्स्य विभागाचे सहायक आयुक्त सुरेश भारती यांनी दिली. 

भारती म्हणाले, ‘‘खारपाण पट्ट्यात सिंचनाच्या मर्यादा आहेत. याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पादनावरही झाला आहे. खारपाण पट्ट्यात शेततळे वाढत असून यामध्ये मत्स्यपालन करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाईल. अशी मत्स्यतळे बनविण्यासाठी निलक्रांती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ४० ते ६० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळू शकेल. अनुसूचित जाती-जमातीच्या महिला शेतकऱ्यांना ६० टक्के, तर खुल्या गटाला ४० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येईल. 

मत्स्यपालनासाठी केंद्र, राज्य शासनाच्या विविध योजना आहेत. अनेक शेतकरी या आधारे चांगले उत्पन्न कमावित आहेत. त्यांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून आता खारपाण पट्ट्यातील शेतकऱ्यांना या पूरक व्यवसायाकडे वळविण्याचा प्रयत्न आहे, असेही भारती यांनी सांगितले.

जिल्ह्यात ८० टक्क्यांपेक्षा अधिक मासे बाहेरून येतात. येथील खवय्यांची गरज पाहता या व्यवसायाला जिल्ह्यात खूप मोठा वाव आहे. त्यामुळे मत्स्यतळे उभारण्यासाठी जिल्हा प्रशासनही पाठपुरावा करेल, असे उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर यांनी सांगितले.

मत्स्यपालनाबाबत कार्यशाळा जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने दर बुधवारी एका विषयाची कार्यशाळा शेतकऱ्यांसाठी घेतली जाते. बुधवारी (ता.१६) मत्स्यपालन विषयाची कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात झाली. या वेळी जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक शेतकरी सहभागी झाले.

उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर, सुरेश भारती, दिनेश धोपे, श्रीमती वऱ्हेकर आदींनी मार्गदर्शन केले. सोबतच सध्या यशस्वीपणे मत्स्यपालन करीत असलेल्या शेतकऱ्यांनी आपले अनुभव मांडले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे या वेळी देण्यात आली. मंडळ अधिकारी राजेश बोडखे यांनी सूत्रसंचालन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com