साडेपाच लाख टन सोयापेंड  आयातीसाठी मुदतवाढ द्या 

केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी पोल्ट्री उद्योगाच्या सुरात सूर मिसळून साडेपाच लाख टन सोयापेंड आयातीसाठी मुदत वाढवून ३१ मार्च २०२२ करावी, ही मागणी उचलून धरली आहे.
Five and a half lakh tonnes of soybean meal Extend for import
Five and a half lakh tonnes of soybean meal Extend for import

पुणे ः केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी पोल्ट्री उद्योगाच्या सुरात सूर मिसळून साडेपाच लाख टन सोयापेंड आयातीसाठी मुदत वाढवून ३१ मार्च २०२२ करावी, ही मागणी उचलून धरली आहे. मंत्री रूपाला यांनी विदेश व्यापार महासंचालक अमित यादव यांना पत्र लिहून यात लक्ष घालण्यास सांगितले आहे. रूपाला यांच्या पत्राचा परिणाम बाजारात लगेच जाणवला. सोमवारपासून सोयाबीनच्या वायद्यांत ५०० ते ७०० रुपये आणि बाजार समित्यांतही दरात ४०० ते ८०० रुपयांची घसरण झाली.  शेतकऱ्यांनी यंदा एकदम माल विक्री न करात टप्प्याटप्याने विक्री करून पुरवठा फुगू दिला नाही. परिणामी, बाजारात ऐन आवक हंगामातही सोयाबीनचे दर टिकून होते. त्यामुळे ऑल इंडिया पोल्ट्री ब्रीडर्स असोसिएशनचे अध्यक्ष बहादूर अली यांनी केंद्रीय पशुसंवर्धनमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांना पत्र लिहून पोल्ट्री उद्योगाच नुकसान टाळण्यासाठी सोयापेंड आयातीला ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ, सोयाबीनचे दर चार हजारांपर्यंत आणावे आदी मागण्या केल्या होत्या. पोल्ट्री असोसिएशनच्या मागण्या पुढे रेटत रूपाला यांनी विदेश व्यापार महासंचालक अमित यादव यांना पत्र लिहून सोयापेंड आयातीची मुदत वाढविण्याची मागणी केली आहे.  काय म्हणाले पुरुषोत्तम रूपाला या पत्रात?  पुरुषोत्तम रूपाला यांनी पत्रात लिहिले, की ऑल इंडिया पोल्ट्री ब्रीडर्स असोसिएशनचे अध्यक्ष बहादूर अली यांनी देशातील वाढते सोयाबीनचे दर कमी करण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारने पशुधन उद्योगाला दिलासा देण्यासाठी १२ लाख टन सोयापेंड आयातीला परवानगी दिल्याने सोयापेंडचे दर कमी होऊन स्थिर राहण्यास मदत झाली, असेही बहादूर अली यांनी म्हटले आहे. तसेच १२ लाख टनांपैकी आतापर्यंत साडेसहा लाख टन सोयापेंड आयात झाली आहे. उर्वरित साडेपाच लाख टन सोयापेंड ३१ मार्च २०२२ पर्यंत आयात करण्यास परवानगी द्यावी व सोयाबीन आणि सोयापेंड बाजाराचे एनसीडीईक्सवरील स्टॉकिस्ट आणि स्पेक्युलेटर्स यांच्यापासून संरक्षण करावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. त्यामुळे आपल्याला विनंती आहे, की आपण वैयक्तिकरीत्या यात लक्ष घालावे आणि योग्य ती कार्यवाही करावी.  बाजारात लगेच प्रतिक्रिया उमटली  केंद्रीय पशुसंवर्धन मंत्र्यांच्या या पत्राचे सोयाबीन बाजारात पडसाद उमटले. सोयाबीनचे दर दबावात आले. शुक्रवारच्या तुलनेत वाद्यांत तब्बल ५०० ते ८०० रुपायांने सौदे तुटले. तर बाजार समित्यांतही सोयाबीनच्या दरात ५०० ते ८०० रुपयांच्या दरम्यान दरात घट झाली. शुक्रवारी अनेक बाजार समित्यांत सरासरी दर हा ६ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान होता. मात्र मंगळवारी सरासरी दर सहा हजारांवर आला.  प्रतिक्रिया  मी पोल्ट्री उत्पादक आहे. सोयाबीनचे दर वाढले तर ते कमी करण्यापेक्षा पोल्ट्री उद्योगाने आपले दर वाढवावे. तसे ते वाढलेही. पोल्ट्री उद्योगाने मागणी केल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूची भूमिका घेणे अपेक्षित आहे. सोयाबीन उत्पादकांना चार पैसे मिळू द्यावे. सोयाबीन दरावर झालेला परिणाम तत्पुरता असेल. शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास सरकारला निवडणुकांत शेतकरी धडा शिकवतील.  - रघुनाथदादा पाटील, शेतकरी नेते  रूपाला यांची मागणी निषेधार्ह आहे. रूपाला आणि ऑल इंडिया पोल्ट्री ब्रीडर्स असोसिएशनमध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा आम्हाला संशय आहे. पोल्ट्रीच खाद्यच पाहिजे असेल तर भात, मका आणि भुईमुगाची पेंड आयात करा. सोयाबीनच का? तुम्ही आधीच साडेसहा लाख टन सोयापेंड आयात करून आमचे सोयाबीन चार हजारांवर आणले होतं. आता कसेबसे दर सहा हजारांवर गेले. आता सोयापेंड आयातीला परवानगी दिली तर आम्ही गप्प बसणार नाही. वाणिज्य मंत्रालयाला आमची विनंती आहे, की पशुसंवर्धन मंत्र्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करा. अन्यथा, आम्ही वाणिज्य मंत्री आणि पशुसंवर्धन मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करू.  - रविकांत तुपकर, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com