वऱ्हाडात पाच लाख शेतकऱ्यांनी काढला पीकविमा

वऱ्हाडात पाच लाख शेतकऱ्यांनी काढला पीकविमा
वऱ्हाडात पाच लाख शेतकऱ्यांनी काढला पीकविमा

अकोला ः पीकविमा काढण्याची मुदत दोन वेळा वाढविल्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला. ३१ जुलैपर्यंत वऱ्हाडातील तीन जिल्ह्यांत पाच लाख २५ हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी पीकविमा काढला. अकोला जिल्ह्यात १ लाख २४ हजार ५१२, बुलडाणा जिल्ह्यात एक लाख ९३ हजार आणि वाशीम जिल्ह्यात १ लाख ३९ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा काढला. साडेतीन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचा विमा काढल्या गेला असला तरी हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा काढल्या गेलेला नाही हेही सत्य आहे. 

यावर्षी खरीप हंगामातील पिकांचा विमा काढण्यासाठी शासनाने दोन वेळा मुदत वाढवून ३१ जुलै ही अंतिम तारीख दिली होती. शेतकऱ्यांनी विमा काढावा यासाठी शासकीय यंत्रणांस्तरावरून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. यावर्षी अनियमित पावसामुळे पेरण्यांमध्ये असमानता आलेली आहे. अकोला जिल्ह्यात काही तालुक्यांत दुबार पेरण्यासुद्धा उलटल्या, अशा वेळी शेतकऱ्यांना इच्छा असूनही पीकविमा काढता आलेला नाही.

पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळणार आहे. खरीप हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांना अन्नधान्य व गळीत धान्य पिकांसाठी विमा संरक्षित रकमेच्या दोन टक्के तर नगदी पिकांसाठी पाच टक्के विमा हप्ता भरावा लागला. यावर्षी विमा काढण्यासाठी २४ जुलैपर्यंत मुदत होती. पहिल्यांदा ही मुदत २९ जुलै करण्यात आली. त्यानतंर आणखी दोन दिवस वाढवून देत ३१ जुलैपर्यंत शेतकऱ्यांना विमा हप्ता भरण्याची मुदत देण्यात आली. यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना विमा काढण्यासाठी वेळ मिळाला. यामुळे पीकविमा काढण्यासाठी शेतकऱ्यांनी शेवटच्या काळात गर्दी केली होती. 

यावर्षी पीकविमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात बराच वेळ खर्ची घालावा लागला होता. त्यानंतर ऑनलाइन विमा भरताना लिंकसुद्धा बऱ्याचवेळा मिळाली नाही. अशाही अडचणीतून शेतकऱ्यांनी पीकविमा काढला. त्यामुळेच यावर्षी वऱ्हाडातील तीन जिल्हे मिळून सव्वा पाच लाखांवर शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभाग नोंदविला. तीन लाख ३७ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील खरीप पिकांचा विमा काढण्यात आला. आतापर्यंत पेरणी झालेल्या एकूण क्षेत्राच्या ५० टक्केही हे क्षेत्र नसल्याची वस्तुस्थिती आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com