साखर उचलीत ५ टक्के कपात; राज्य बँकेचा निर्णय
साखर उचलीत ५ टक्के कपात; राज्य बँकेचा निर्णय

साखर उचलीत ५ टक्के कपात; राज्य बँकेचा निर्णय

राज्य बँकेने यंदा कारखान्यांना देण्यात येणाऱ्या साखर पोत्यांवरील उचलीत पाच टक्के कपात केली आहे. साखरेच्या पोत्याला मिळणारी ९० टक्केची उचल आता ८५ टक्के इतकी मिळणार आहे. याबरोबरच प्रक्रिया खर्चही २५० रुपयांवरूनही २०० रुपये केला.

कोल्हापूर : राज्य बँकेने यंदा कारखान्यांना देण्यात येणाऱ्या साखर पोत्यांवरील उचलीत पाच टक्के कपात केली आहे. साखरेच्या पोत्याला मिळणारी ९० टक्केची उचल आता ८५ टक्के इतकी मिळणार आहे. याबरोबरच प्रक्रिया खर्चही २५० रुपयांवरूनही २०० रुपये केला. अल्प मुदतीच्या बँक कर्जाची वसुली २०० रुपयांवरून २५० रुपये करण्याबरोबर दहा टक्के दुराव्याऐवजी १५ टक्के दुरावा करण्याबाबतचे निर्णयही राज्य बँकेने घेतले आहेत.

एकीकडे गेल्या वर्षीचे रखडलेले निर्यात अनुदान, नव्या निर्यातीबाबत प्रलंबित धोरण या कचाट्यात उद्योग अडकला असतानाच राज्य बँकेनेही डागण्या दिल्याने नव्या हंगामाच्या प्रारंभीच राज्यातील साखर उद्योगात नाराजी पसरली आहे. गेल्या वर्षी साखरेच्या किमतीत मोठी घसरण झाली होती. त्याचा फटका कारखान्यांना बसत होता. यामुळे कारखान्यांना मदत व्हावी म्हणून बँकेने ८५ ऐवजी ९० टक्के उचल देण्याचा निर्णय घेतला होता. केंद्राने किमान विक्री दर निश्‍चित केला आहे. ३१०० रुपयांच्या खाली साखर विकू नये असे सांगितले आहे. किमान विक्री दर निश्चित केल्याने साखर दर घसरण्याचा प्रश्‍न उद्भवत नाही. यामुळेच आम्ही साखरेवरच्या उचलीत पाच टक्क्यांनी कपात केल्याचे बँकेच्या सूत्रांनी सांगितले.

कारखान्यांवरच दोष? कर्जाची वसुली करताना राज्य बँकेला वेळेत रक्कम दिली जात नाही. परिणामी बँकेचे नुकसान होते. यामुळे उचल देतानाच कमी उचल देण्याची रणनीती बँकेने आखल्याचा आरोप कारखानदार सूत्रांनी केला आहे. बँकेने तातडीने धोरण बदलावे अशी मागणी कारखानदारांची आहे. ज्या प्रमाणात रिझर्व बँक धोरणात लवचिकता आणते त्याचा लाभ राज्य बँक कारखानदारांना देत नसल्याचा आरोप ही राज्यातील कारखाना प्रतिनिधींनी या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर केला आहे.

महासंघाची बँकेकडे मागणी बँकेच्या या धोरणामुळे क्विंटलला किमान २०० रुपये कमी मिळण्याची शक्यता असल्याने याचा फटका एफआरपी देताना बसणार आहे. परिणामी साखर उद्योग हादरला आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाने तातडीने एका पत्राद्वारे राज्य बँकेने ९० टक्के उचल करावी अशी मागणी बँकेकडे केली आहे. मागणी केली असली तरी राज्य बँकेने मात्र अद्यापही सकारात्मक उत्तर दिले नसल्याची माहिती साखर कारखाना महासंघाच्या सूत्रांनी दिली.

प्रतिक्रिया.. गेल्या वर्षी साखर दराची स्थिती बिकट होती. यामुळे आम्ही उचल ९० टक्के केली होती. आता साखरेचे दर स्थिर असल्यानेच आम्ही पूर्ववत ८५ टक्के उचल केली आहे. ती परत ९० टक्के करण्याबाबत सध्या तरी आम्ही विचार केला नाही. - अजित देशमुख, व्यवस्थापकीय संचालक, राज्य सहकारी बँक 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com