राज्यात पाच टक्के पेरा

पेरणी
पेरणी

पुणे : दमदार पावसामुळे राज्याच्या खरिपावर आलेले संकट टळले आहे, असा दावा कृषी विभागाने केला आहे. आत्तापर्यंत राज्यात पाच टक्के पेरा झाला आहे.  कृषी आयुक्तालयाचे विस्तार संचालक विजयकुमार घावटे यांनी ‘अॅग्रोवन’ला सांगितले, की लांबलेल्या पावसामुळे राज्याच्या काही भागांमध्ये खरीप पेरण्यांबाबत चिंता होती. मात्र गेल्या काही दिवसांत चांगला पाऊस होत असल्याचे दिसत असून, पेरण्यांवरील संकट टळले आहे. आतापर्यंत पाच टक्के पेरादेखील झाला आहे. राज्याचे मुख्य पीक असलेल्या कापूस, सोयाबीन व तुरीच्या पेरण्या १५ जुलैपर्यंत आटोपतील, असे कृषी विभागाला वाटते. एक जून ते २५ जूनदरम्यान सरासरी पाऊस १८६ मिलिमीटर अपेक्षित असताना केवळ ३७ टक्के पाऊस झाला. ३५५ तालुक्यांपैकी ९० तालुक्यांत ३० टक्केदेखील पाऊस झाला नाही. या कालावधीत चांगला पाऊस झालेले तालुके फक्त ३४ असल्यामुळे चिंता वाढली होती.  “खरिपाची एकूण वाटचाल बघता राज्यात मूग आणि उडीद पिकाच्या क्षेत्राला फटका बसू शकतो. मात्र, इतर पिकांबाबत अडचण येणार नाही. विदर्भाच्या धान उत्पादक पट्ट्यात रोपे टाकण्यास सुरवात झाली आहे. तर कोकण व पश्चिम महाराष्ट्रात रोपे टाकलेल्या भागात आता पाऊस झाल्याने संकट टळले आहे,” असे संचालकांनी स्पष्ट केले.   २०१७ च्या खरीप हंगामात याच कालावधीत पेरा ४० टक्क्यांच्या पुढे गेला होता. २०१८ च्या हंगामात याच कालावधीपर्यंत ३४ टक्के पेरा झाला होता. गेल्या हंगामात पेरा लांबण्याचे मुख्य कारण म्हणजे जूनच्या पंधरवड्यात पावसाचा पडलेला खंड. कारण, १२ जूनपासून मान्सून बेपत्ता झाल्यामुळे शेतकरी चिंतेत होते. तीच स्थिती यंदादेखील आहे.  दीड लाख हेक्टरवर पेरा खरिपाचे राज्याचे क्षेत्र १४० लाख हेक्टरच्या आसपास असून, २५ जूनअखेर पेरा दीड लाखापर्यंत गेला होता. यंदा कमी पावसामुळे काही भागांत समस्या कायम आहेत. राज्यात जूनमध्ये सरासरी पाऊस २२३ मिलिमीटर होतो. गेल्या हंगामात याच कालावधीत सरासरीच्या १०६ टक्के पाऊस नोंदला गेला होता. यंदा ७१ टक्के नोंद झाली आहे असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com