Agriculture news in marathi Five in Satara district Discharge of 75,000 cusecs from dams | Agrowon

सातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार क्युसेक विसर्ग

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 जुलै 2021

 कोयना धरणासह सर्वच प्रमुख धरणांतून ७५ हजार १३६ क्युसेक इतक्‍या पाण्‍याचा विसर्ग नदीपात्रात सुरू होता.

सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या विविध भागांत मुसळधार पाऊस सुरू असून, धरणक्षेत्रातील पावसाच्‍या नोंदी रेकॉर्डब्रेक ठरल्‍या आहेत. पाण्‍याची आवक जास्‍त असल्‍याने पाणीपातळी नियंत्रित ठेवण्‍यासाठी शुक्रवारी (ता.२३) दुपारी कोयना धरणासह सर्वच प्रमुख धरणांतून ७५ हजार १३६ क्युसेक इतक्‍या पाण्‍याचा विसर्ग नदीपात्रात सुरू होता. या विसर्गामुळे सर्वच नद्यांच्‍या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून, पुराचा धोका वाढला आहे. 

जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा वेधशाळेने वर्तवला होता. या इशाऱ्यांच्‍या पार्श्‍वभूमीवर जिल्‍हा प्रशासनाने आवश्‍‍यक त्‍या उपाययोजना राबविण्‍यास सुरुवात केली होती. कोयना पाणलोट क्षेत्रात गेल्‍या तीन दिवसांत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे कोयना धरणात येणाऱ्या पाण्‍याची आवक वाढली आहे. पाणीपातळी नियंत्रित करण्‍यासाठी या धरणातून शुक्रवारी सकाळी आठ वाजता सहा वक्र दरवाजे उचलून नदीपात्रात सुरू करण्यात आला होता. पावसाचा जोर कायम राहिल्याने पाण्याचा विसर्ग वाढवावा लागला आहे. दुपारी १२ वाजता दरवाजे व पायथा वीज गृहातून ४२ हजार ४३५ क्‍युसेक इतके पाणी सोडण्‍यात आले. 

धोम धरणातून ५ हजार ११० क्‍युसेक, कण्‍हेर धरणातून सहा हजार ७८४ क्‍युसेक, उरमोडी धरणातून चार हजार ३८३ क्‍युसेक, तारळी धरणातून ११ हजार ३९४ क्‍यूसेक धोम-बलकवडी धरणातून पाच हजार ३१ क्‍युसेक इतके पाणी नदीपात्रात सोडण्‍यात येत आहे. धरणात येणाऱ्या पाण्‍याची आवक वाढल्‍यास आगामी काळात विसर्ग क्षमतेत वाढ होण्‍याची शक्‍यता आहे. कृष्णा, कोयना, उरमोडी, तारळी, वेण्‍णा, उत्तरमांड या नद्यांतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले आहे. कृष्‍णेसह सर्वच उपनद्यांनी धोकापातळी ओलांडत नागरीवस्‍तीला घेरण्‍यास सुरुवात केली आहे. 

इतिहासातील सर्वाधिक पाऊस 
कोयना धरणाच्या इतिहासातील सर्वाधिक पाऊस झाला आहे. शुक्रवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयना धरण क्षेत्रांत ६१०, नवजा ७४६ व महाबळेश्‍वर धरण क्षेत्रात ५५६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे धरणात प्रतिसेकंद ८१ हजार ४२९ क्युसेक पाण्याची आवक होत आहे.

आठ व्यक्तींचा मृत्यू; 
दोन जण बेपत्ता 

जिल्ह्यात सद्य:स्थितीत पश्चिम भागात जोरदार अतिवृष्टी होत आहे. जिल्ह्यातील सर्व धरणातून पाण्याचा विसर्ग नदी पात्रात होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सातारा जिल्ह्यात पुढील काही दिवस अतिवृष्टी होणार आहे. 

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यातील मिरगाव, आंबेघर, हुंबरळी, ढोकावळे, या ठिकाणी भूस्खलन झाले असून, यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झालेली आहे. सद्य:स्थितीत मिरगाव येथील एक मृत व्यक्ती आढळून आलेली आहे. तथापि, भूस्खलनाखाली व्यक्ती गाडल्या गेलेल्या असल्यामुळे निश्चित संख्या सांगता येत नाही. या ठिकाणी एनडीआरएफचे एक पथक आणि स्थानिक प्रशासन, नागरिकांच्यामार्फत युद्धपातळीवर शोध व बचावकार्य चालू आहे.

जावली तालुक्यातील रेंगडी गावामध्ये दोन व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून बेपत्ता आहेत व दोन व्यक्ती मयत झालेल्या आहेत. वाई तालुक्यातील कोंढवळे येथे पाच घरे पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्यात दबली गेलेली असून, सद्य:स्थितीत दोन व्यक्ती मयत आढळून आलेल्या आहेत. या ढिगाऱ्यात अडकलेल्या २७ नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. जोर या ठिकाणी दोन व्यक्ती मयत आहेत. तसेच महाबळेश्वर तालुक्यामध्ये ५९४.०४ मिमी इतका विक्रमी पाऊस झाल्यामुळे बऱ्याचशा गावाचा संपर्क तुटला असून, धावरी या ठिकाणी एक व्यक्ती मयत झालेली आहे. पावसामुळे मोठ्या प्रमाणावर घरांचे व शेतीपिकांचे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहे.

जिल्ह्यात एक अतिरिक्त एनडीआरएफचे पथक शुक्रवार सायंकाळपर्यंत दाखल होणार असून, त्यामुळे जिल्ह्यात होणाऱ्या अतिवृष्टीमध्ये तत्काळ शोध व बचावकार्यास मदत होणार आहे. अतिवृष्टीमुळे नागरिकांनी पुढील प्रमाणे काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांनी पुराच्या पाण्यात प्रवेश करू नये. नदीपात्राच्या कडेला अथवा धोक्याच्या ठिकाणी वास्तव्यास असल्यास तत्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे.

मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. जुन्या मोडकळीस आलेल्या घरात अथवा इमारतीत आश्रय घेऊ नये. नदी नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्यास कोणतीही परिस्थितीत पूल ओलांडू नये. अफवांवर विश्वास ठेऊ नये आणि अफवा पसरवू नयेत असे, आवाहनही प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
‘कृषी’ शिक्षक म्हणून कृषी, संलग्न ...कोल्हापूर : शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश...
शिसोदे समितीची आज तातडीची बैठकपुणे ः जलयुक्त शिवार कामांमध्ये झालेल्या कोट्यवधी...
शेतीमाल, दुग्धजन्य पदार्थ निर्यात...पुणे : कृषी व प्रक्रियायुक्त अन्न उत्पादन निर्यात...
बुडताना दिसले अन् काही क्षणांत दिसेनासे...वरुड, जि. अमरावती : डोळ्यांसमोर सारे बुडताना दिसत...
‘जनधन’मुळे मदत गरजूंपर्यंत : केंद्रीय...औरंगाबाद : जनधन, आधार आणि बँक खात्याशी मोबाईल...
पूर्वसूचना अर्ज भरण्यासाठी निलंग्यात...निलंगा, जि. लातूर : ऑफलाइन पद्धतीने विमा कंपनीस...
शेतकऱ्यांसाठी महावितरणने हप्ते बांधून...पुणे : कोरोनामुळे महावितरण कंपनीवरही आर्थिक ताण...
केंद्र्याच्या कृषी कायद्यांविरोधातील २७...कोल्हापूर : शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यावेत,...
देवसंस्थांच्या जमिनीवर वहिवाटदारांचा...जेजुरी, जि. पुणे : देवसंस्थानच्या मालकीच्या...
पुरस्कारांच्या प्रस्तावावरून कृषी...अकोला : विविध पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांनी दाखल...
कोयना धरणात १०१ टीएमसीवर पाणीसाठाकोयनानगर, जि. सातारा : शंभर दिवस ओलांडलेल्या...
उजनी धरणात उपयुक्त साठा ६४ टक्केच;...सोलापूर : उजनी धऱणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही...
अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा...अकोला ः जिल्ह्यात अतिपावसाने धुमाकूळ घातला असून...
राज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...
वाशीम झेडपी निवडणुकीचा चेंडू पुन्हा...वाशीम : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिक्त...
‘एफआरपी’च्या तुकड्यांनी शेतकरी...कऱ्हाड, जि. सातारा : एकरकमी ‘एफआरपी’चे तीन तुकडे...
हिंगोलीत मुहूर्ताच्या सोयाबीनला ११ हजार...हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
पीक नुकसान नोंदीसाठी विमा कंपन्यांच्या...परभणी : ७२ तासांच्या आत पीक नुकसानीची नोंद...
राज्यसभेच्या एका जागेसाठी ४ ऑक्टोबरला...नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त...
गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज; तीन...सिंधुदुर्गनगरी : घरोघरी गणेशोत्सव साजरा करण्याची...