कापूस उद्योगाचे चीनमध्ये पाच हजार कोटी अडकले

चीनशी सौदा झालेल्या सुमारे चार ते पाच लाख कापूस गाठी बंदरांवर पडून आहेत. निर्यातदारांकडे जिनिंग कारखानदारांचे पैसे अडकले आहेत. देशातील कापूस बाजारात फारसा दबाव दिसत नसला तरी कापूस निर्यात अशीच रखडत सुरू राहिली व सीसीआयची खरेदी थांबली तर बाजारात पुढे दबाव वाढण्याची भीती आहे. - अनिल सोमाणी, जिनिंग प्रेसिंग कारखानदार, जळगाव
cotton
cotton

जळगाव ः देशातील सूत व कापूस गाठींचा मोठा खरेदीदार असलेल्या चीनमध्ये कोरोना विषाणूचा धोका कायम असल्याने तेथील कापूस उद्योग ठप्प आहे. परिणामी देशातून पाठविलेले सूत व कापूस गाठी तेथील बंदरांवर पडून आहे. सूत, गाठींचे सौदे पूर्ण न झाल्याने देशातील सूत, गाठींच्या निर्यातदारांचे सुमारे पाच हजार कोटी रुपये अडकल्याची माहिती आहे. देशात यंदा पाच हजार कोटी किलो सूत उत्पादनाचा अंदाज आहे. यातील २३ ते २५ टक्के सुताची निर्यात अपेक्षित आहे. तर सुमारे ६५ लाख गाठींची निर्यात होऊ शकते. देशातून निर्यात होणाऱ्या एकूण सुतापैकी ४० टक्के सुताचा खरेदीदार चीन आहे. परंतु चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे उद्योग ठप्प झाले आहेत. त्यात तेथील प्रमुख भागातील कापड उद्योग बंद अवस्थेत आहेत. तेथे देशातून पाठविलेले सूत व कापूस गाठी बंदरांवर पडून आहे. चीनच्या शांघाय, टाईटाई, नानटूंग बंदरांवर सुमारे दोन हजार कोटी रुपयांचे सूत पडून आहे. चीनची मालवाहू जहाज (कंटेनर) यंत्रणा बंद असून, तेथून कंटेनर येत नसल्याने देशातील कलकत्ता, जेनएनपीटी, टुटीपोरम, मुंद्रा येथील बंदरांवरही कापूस गाठी व सूत पडून आहे. देशातील बंदरांवर सुमारे १२०० ते १३०० कोटींचे सूत पडून आहे. तर सुमारे तीन लाख कापूस गाठींची उचल झालेली नाही. सौदे झाल्याने देशातील निर्यातदार, व्यापाऱ्यांना चीनकडील खरेदीदारांकडून लेटर ऑफ क्रेडिट (एलसी) प्राप्त झाल्या आहेत. परंतु मालाची उचल होऊन व्यवहार पूर्ण न झाल्याने पैसे अडकले आहेत. सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा हा व्यवहार अडकल्याची माहिती जाणकारांनी दिली.  देशातील सुताची निर्यात सध्या बांगलादेश, व्हिएतनाम, श्रीलंका, आफ्रिकन देश, युरोपात होत आहे. परंतु चीनच्या तुलनेत तेथून अल्प मागणी आहे. तर कापूस गाठींची निर्यात बांगलादेशात बऱ्यापैकी होत आहे. चीनमधील निर्यात ठप्प असल्याने देशातील कापूस गाठी व सूत निर्यातदार सावध भूमिकेत आहेत. बाजारातील उलाढालीवर परिणाम झालेला आहे. परंतु देशात भारतीय कापूस महामंडळाची (सीसीआय) कापूस खरेदी वेगात सुरू असल्याने कापूस दरांवर कमी दबाव आहे. कापसाची ४८०० ते ५१०० रुपये प्रतिक्विंटल या दरात खरेदी सुरू आहे. तर खंडीचे दर (३५६ किलो रुई) ३९००० रुपयांपर्यंत स्थिर आहेत. ‘सीसीआय’ने मागील आठवड्यापर्यंत सुमारे ६८ लाख कापूस गाठींच्या कापसाची खरेदी देशात विविध खरेदी केंद्रांच्या माध्यमातून केली आहे. शासकीय खरेदी सुरू असल्याने कापसाचे दर स्थिर असून, देशातील कापूस बाजार सीसीआयच्या भरवशावर असल्याची माहिती मिळाली.  देशांतर्गत मागणी स्थिर देशातील कापड उद्योगात सुताची मागणी स्थिर आहे. सध्या उत्तरेकडील मिला सुरू झाल्या आहेत. तर दाक्षिणात्य कापड उद्योगातही कार्यवाही गतीने सुरू झाली आहे. देशांतर्गत मिलांकडून उचल असल्याने सूतगिरण्यांमध्ये अजून फारसा सुताचा साठा नाही. परंतु चीनमधील कापूस गाठी व सुताची निर्यात ठप्प राहिली तर सूतगिरण्यांमधील उत्पादन क्षमता निम्म्यावर येऊ शकते, अशीही भीती व्यक्त करण्यात आली आहे. प्रतिक्रिया सुताची उचल मागील १० ते १२ दिवसांपासून कमी झाल्याने आमच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम झाला आहे. कोरोना विषाणूमुळे बंदरे, कापड उद्योगातील कामकाज चीनमध्ये ठप्प आह. व्यवहार सुरळीत न झाल्याने चीनमध्ये अनेक सूत निर्यातदारांचे पैसे अडकले आहेत. त्यामुळे सूतगिरण्यांनाही अडचण सहन करावी लागत आहे. आमच्या गिरणीत तीन कोटींचे निर्यातक्षम दर्जाचे सूत साठवावे लागले आहे. जानेवारीत निर्यात व्यवस्थित सुरू होती, यामुळे कुठलाही सूत साठा नव्हता.  - दीपक पाटील, अध्यक्ष, लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी, उंटावद होळ (जि. नंदुरबार)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com