‘आत्मा’चे पंचवार्षिक आराखडे रखडले

शेतकऱ्यांपर्यंत कृषी विषयक योजना कशा पोचवायच्या याची दिशा देणारे आराखडे (एसआरइपी) वेळेत तयार करण्यात ‘आत्मा’च्या जिल्हा यंत्रणा अपयशी ठरल्या आहेत.
krushi vighag
krushi vighag

पुणे: शेतकऱ्यांपर्यंत कृषी विषयक योजना कशा पोचवायच्या याची दिशा देणारे आराखडे (एसआरइपी) वेळेत तयार करण्यात ‘आत्मा’च्या जिल्हा यंत्रणा अपयशी ठरल्या आहेत. यामुळे काही जिल्ह्यांत आराखड्याविनाच कामकाज रेटले जात असल्याची माहिती कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या गोटातून देण्यात आली.   आराखड्यांच्या माध्यमातून संबंधित जिल्ह्यात आधी गट कृती आराखडा तयार करणे, जिल्हा कृषी कृती आराखडा (डीएएपी) तयार करावा, अशा सूचना केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिल्या होत्या. त्यामुळे आराखडे तयार न करताच मोघमपणे ‘आत्मा’कडून कोट्यवधी रुपये खर्च करणे गैर असल्याचे कर्मचारी सांगतात.  ''आत्मा''चा एक ''एसआरइपी'' अर्थात व्युहरचनात्मक संशोधन व विस्तार आराखडा प्रत्येक जिल्ह्यात तयार करण्याचे बंधन केंद्र सरकारने कृषी खात्यावर टाकलेले आहे.   जिल्ह्याची कृषी जडणघडण विविधता, बळकटीकरणातील उणिवा विचारात घेत या उणिवांवर तोडगा देणारी कामे या आराखड्यात आणायची आहेत. त्यासाठी कृषी व संलग्न खात्यांकडून (उदा. फलोत्पादन, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास) शेतकऱ्यांसाठी नेमके काय केले जाणार आहे याचा देखील समावेश यात बंधनकारक आहे. ‘‘कृषी खात्याने संलग्न विभाग, स्वयंसेवी संघटना, कृषी विज्ञान केंद्रे, पंचायत राज संस्था, शेतकरी तसेच कृषी क्षेत्रातील खासगी संस्थांना बरोबर घेत आराखडा बनविणे बंधनकारक होते. मात्र, बहुतेक जिल्ह्यांनी वेळेत आराखडे दिलेले नाहीत,’’ अशी माहिती पुणे विभागातील एका जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याने दिली.  ‘आत्मा''च्या मुख्यालयाने मात्र आराखडे वेळेत सादर करण्यासाठी आता पाठपुरावा सुरू केला आहे. ‘‘आराखडे नसले तरी काहीही थांबलेले नाही. २०१४ मध्ये पंचवार्षिक आराखडे तयार केले होतेच. मात्र, मुदत संपल्याने २०२० पासून नवे आराखडे द्यायचे आहेत. बहुतेक आराखडे तयार आहेत. येत्या काही दिवसात हा विषय संपलेला असेल,’’ अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.  जिल्हानिहाय आराखडे राज्यासाठी महत्त्वाचे ‘आत्मा''च्या जिल्हानिहाय अभ्यासातून सर्वंकष कृषी कृती आराखडा तयार केला जाणार होता. त्याची अंमलबजावणी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून करायची होती. ‘‘याच जिल्हा कृती आराखड्यांसह राज्य विस्तार कार्य योजना (एईडब्ल्यूपी) तयार करायची होती. ‘आत्मा’ची ही योजना म्हणजे राज्याचा कृषी विषयक विकास आराखड्याचा भाग असतो. केंद्र शासनाची तशी संकल्पना आहे. तथापि, राज्यात त्याकडे दुर्लक्ष झाले आहे,’’ अशी कबुली एका कंत्राटी अधिकाऱ्याने दिली.

प्रतिक्रिया ‘आत्मा’चे पंचवार्षिक आराखडे रखडले असे म्हणता येणार नाही. काही जिल्ह्यांमध्ये प्रकल्प संचालक नाहीत. कोविड १९ मुळे कामाला मर्यादा आल्या. बहुतेक जिल्ह्यांचे आराखडे मुद्रण प्रक्रियेत (प्रिटिंग स्टेज) आहेत. अर्थात, आराखडे नाहीत म्हणून राज्यात कुठेही कामे थांबलेली नाही. ‘आत्मा’मधून सर्वत्र उत्तम कामे चालू आहेत. — किसनराव मुळे,  संचालक, ‘आत्मा’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com