रत्नागिरीत पूर ओसरला, सावरण्याची धडपड सुरू 

जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून पूर, दरड कोसळल्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे.
Ratnagiri rain
Ratnagiri rain

रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून पूर, दरड कोसळल्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. खेड तालुक्यातील पोसरेत अजूनही पंधरा जण गाडले गेल्याची शक्यता आहे. एनडीआरएफच्या पथकाकडून शोध मोहीम सुरू आहे. तसेच चिपळूण शहरातील घरांसह दुकानांमध्ये साचलेला चिखल साफ करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. 

खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी, राजापुरातील पूरस्थिती नियंत्रणात आली आहे. खेड तालुक्यातील पोसरे येथे सात घरांवर दरड कोसळून १७ जण गाडले गेले होते. त्यातील दोन जणांचे मृतदेह एनडीआरएफच्या पथकाला सापडले आहेत. अन्य पंधरा जणांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नदी किनारी भागातील शेकडो एकर भातशेतीचे नुकसान झाले आहे. रत्नागिरी, कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात दरड कोसळली असून रस्ता खचला आहे. पावसाच्या पाण्याबरोबर माती व दगड रस्त्यावर आल्यामुळे दोन वाहतूक खंडित झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. वाहतूक बंद राहिल्यामुळे भाजीपाल्यास इंधनाचा तुडवडा रत्नागिरीत जाणवत होता. 

मुंबई - गोवा महामार्गावरील वासिष्ठी, एनरॉन पुलासह पशुराम घाटही खचला आहे. त्यामुळे वाहतुकीला ब्रेक लागला आहे. पशुराम घाटात पर्यायी मार्ग तयार करून एकेरी वाहतूक सुरू केली आहे. मात्र अवजड वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक अजूनही बंदच आहे. आंबा घाटातील दरड काढण्यासाठी अजून एक दिवस लागेल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या भाजीपाला, दूध यासह पेट्रोल-डिझेलचा तुटवडा रत्नागिरीत जाणवत आहे. संगमेश्‍वर तालुक्यातील ओझरे येथे दरड कोसळून एका शेतकऱ्यांचा गोठा उद्‌ध्वस्त झाला. त्यातील चार जनावरे मृत पावली आहेत. यामध्ये दोन लाखांचे नुकसान झाले आहे.  पिकांना फटका  राजापूर तालुक्यातून अर्जुना-कोदवली नद्यांसह शुक नदीला आलेल्या पुराने भातशेतीचे नुकसान झाले. भातशेती कुजून गेली असून, पुराने आलेल्या गाळाच्या थरासह शेतात रोपांचे केवळ बुंधे दिसत आहेत. काही भागांमध्ये काही दिवसांपूर्वी लावणी केलेली रोपे पुराच्या पाण्यासोबत वाहून गेली आहेत. तालुक्यातील चौदा गावांतील २२६ शेतकरी बाधित झाले असून, सुमारे ४८.२७ हेक्टर क्षेत्रातील भातशेतीसह नारळ बागायतींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. रत्नागिरी तालुक्यातील ४० हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com