पंढरपुरातील पूरस्थिती ओसरली

पंढरपूर
पंढरपूर

सोलापूर: उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पंढरपूरसह माळशिरस, मंगळवेढा तालुक्यांत पूरस्थिती निर्माण झाली होती. पण गुरुवारी (ता. ८) नदीतील विसर्ग कमी करण्यात आल्याने पूरस्थिती काही प्रमाणात ओसरली, दिवसभरात पाण्याची पातळी कमी होऊन पाणी नदीच्या घाटावर पोचले. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीकाठच्या गावांत तसेच माळशिरस, मंगळवेढा तालुक्यात पूरस्थिती कायम होती.  उजनी धरणातून दोन लाख क्युसेक पाणी भीमा नदीत सोडण्यात येत होते. आज ते १ लाख ३० क्युसेकवर आणण्यात आले. तसेच दौंडकडून उजनीत येणारा विसर्गही ८४००० क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला आहे. उजनी धरणाची पाणी पातळी सध्या १०२ टक्के वर स्थिर आहे. दुसरीकडे वीर धरणातून नीरा नदीचा विसर्गही ५४०९७ क्युसेक इतका कमी करण्यात आला आहे. यामुळे सध्या पूरस्थिती कायम असली तरी ही परिस्थिती ओसरत असल्याचे चित्र आहे.  उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पंढरपूर येथील नदी व्यासनारायण, अनिल नगर, अंबिकानगर, लखुबाई, आंबेडकरनगर, कुष्ठ रुग्ण वसाहत, स्मशानभूमी या भागात पुराचे पाणी शिरले. रात्री घोंगडे गल्ली उमेदी पटांगण, महात्मा फुले पुतळ्याच्या मागील जगदंबा वसाहत, गोविंदपुरा आदी भागात पाणी आले होते. गोपाळपूर येथील पुलावर पाणी आल्याने पंढरपूरहून मंगळवेढ्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. गोपाळपूर येथील मंदिराच्या बाहेरील दुकाने ही पाण्याखाली गेली आहेत. गुरुवारी पुराचे पाणी कमी झाले आणि पाणी नदीच्या घाटांपर्यंत पोचले. त्यामुळे प्रदक्षिणा मार्ग पूर्ववत झाला.  मंगळवेढा, माळशिरस, दक्षिण सोलापुरातही पूरस्थिती कायम नीरा नदीच्या पाण्यामुळे माळशिरसमधील पूरस्थिती कायम होती, पण त्यात काहीशी संथता होती. मंगळवेढ्यातील नदीकाठच्या गावात आजही परिस्थिती फारशी सुधारली नाही, मोहोळ तालुक्यात  बेगमपूर-माचनुर मार्गावर आजही जैसे थे परिस्थिती होती. दक्षिण सोलापुरातील भीमा नदीकाठच्या भंडारकवठे,  सादेपूर, वडापूर, खानापूर, तेलगाव आदी १२ गावांना फटका बसला आहे. या भागातही अनेक गावात आणि शिवारात पाणी आहे. सुमारे ६०० कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. पंढरपुरातील २९ गावांना फटका उजनी आणि वीर धरणातील विसर्ग वाढल्याने भीमा नदीच्या पूररेषेत येणाऱ्या तालुक्यातील ४८ गावांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. पण त्यापैकी २९ गावांना त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्या गावांतील कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवले आहे, त्यात पटवर्धन कुरोली (४६० कुटुंबे), शिरढोण (५१३), खेडभाळवणी (२८५), शेळवे (३६३), व्होळे (११३०), पि.कुरोली (५६३), वाखरी (७८), वाडीकुरोली (२६३), देवडे (४२६), कौठळी (३८), पुळूज (६३), आंबेचिंचोली (५), आंबे (१२८), गोपाळपूर (६१), मुंढेवाडी (९), उंबरे (३५), करोळे (२८५), सुस्ते (१००५), भटुंबरे (१३५), नांदोरे (४१३), गुरसाळे (३३५), शेगाव दुमला (४४५), इश्‍वर वठार (६३), चिंचोली भोसे (३८), अजनसोंड (३१३), देगाव (११०), ना. चिचोली (१३०), खेडभोसे (७६), सरकोली (१०) आवे-तरटगाव (३५) या ३० गावातील एकूण ७ हजार ५१३ कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com