agriculture news in Marathi, flood condition in south Maharashtra, Maharashtra | Agrowon

दक्षिण महाराष्ट्रात पाणीच पाणी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

टीम ॲग्रोवन

टीम ॲग्रोवन
पुणे : पावसाची मुसळधार कायम असल्याने कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली सोलापूर जिल्ह्यांत पूरस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने प्रमुख नद्यांनी पात्र सोडले आहे. नदीकाठची गावे, वसाहती शेतांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. १५ हजारांवर नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले असून, बचाव कार्यासाठी लष्कर, नौदल, तटरक्षकदल, एनडीआरएफची मदत घेण्यात येत आहे. मंगळवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांवतवाडी येथे ३७० मिलिमीटर, कोल्हापूरमधील गगनबावडा आणि साताऱ्यातील महाबळेश्‍वर येथे ३३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

कोल्हापूर जिल्ह्यात विविध नद्यांना आलेल्या पुरामुळे दहा हजारांहून अधिक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. पाणी वेगाने वाढत असल्याने अनेक गावांत जनावरांसह संसार सुरक्षित ठेण्यासाठी ग्रामस्थांची धावपळ उडाली. पंचगंगेची पातळी तब्बल ५२ फुटांपर्यंत गेल्याने नागरिक हादरले आहेत. बचाव कार्यासाठी लष्कराची तुकडी, तसेच नौदल आणि तटरक्षक दलाची हेलिकॉप्टर्स मागवण्यात आली आहेत. ‘एनडीआरएफ’चे पथकदेखील कोल्हापुरात दाखल झाले आहे. अतिवृष्टीने कोल्हापूर शहराचा चोहोबाजूंनी संपर्क तुटला. मंगळवारी पावसाचा जोर कायम राहिल्याने धरणांचा विसर्ग कायम राहिला. दिवसभर पाऊस व धरणातून जादा पाणी सोडण्यात येत असल्याने नदीकाठची गावांची चिंता वाढली आहे. 

सांगलीत वारणा आणि कृष्णा नदीने रुद्रावतार धारण केला असून, पूरस्थिती अधिक गंभीर होत आहे. वारणा आणि कोयना धरणांतून पाणी सोडण्यात येत असल्याने आयर्विन पुलाजवळची पातळी ५१ फुटांवर गेली आहे. शहरातील मारुती चौक, टिळक रोड, कोल्हापूर शिवाजी मंडई, आमराई चौक, गावभाग, तसेच मल्टिप्लेक्स परिसरात पुराचे पाणी आले आहे. जिल्ह्यातील ३१ हजारांहून अधिक लोकांचे स्थलांतर केले आहे. एनडीआरएफचे पथक सांगलीत दाखल झाले असून, सकाळपासून बचाव कार्य सुरू केले आहे. वाळवा तालुक्यातील शिरगाव येथे पथकाने पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे काम सुरू केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाचे प्रमाण वाढत असून, संततधारेमुळे पूरस्थिती गंभीर बनली आहे. अनेक गावे, बाजारपेठा पाण्याखाली गेल्या आहेत. कित्येक गावांचा संपर्क तुटला आहे. काही गावांना पुराच्या पाण्याने वेढले असून, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. मुंबई-गोवा महामार्गासह बहुतांशी मुख्य आणि ग्रामीण रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पुराच्या पाण्यातून वैभववाडीतील एक आणि कणकवली एक जण वाहून गेला आहे. जिल्ह्यात पावसासोबत वादळाचा जोरदेखील कायम आहे. वादळामुळे पडझड सुरूच आहे. पुरामुळे शेकडो एकर शेती, बागायती पाण्याखाली गेल्या आहेत.

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कमी होत नसल्याने कोयना, कृष्णा, तारळी, उरमोडी आदी नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत. महाबळेश्‍वर, जावळी, पाटण तालुक्यांत जोरदार पाऊस झाल्याने कोयना धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. जिल्ह्यातील २८ गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून कराड, पाटण, सातारा, वाई, जावळी, महाबळेश्‍वर, फलटण या तालुक्यांतील ५९८ कुटुंबांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. विविध नद्यांना आलेल्या पुरामुळे सातारा व पाटण तालुक्यांतील सात व्यक्ती वाहून गेल्या आहेत. पश्‍चिमेकडील सातारा, कराड, जावळी, वाई, कोरेगाव या तालुक्यांतील पावसाचा जोर वाढत असल्याने पिके पाण्याखालीच आहेत. 

पुणे जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. पाणलोट क्षेत्रातून येणारी आवक मंदावल्याने धरणातून पाण्याचा विसर्गही कमी करण्यात आला आहे. नदीपात्रातील पाणी कमी होऊन पूरस्थिती काहीशी नियंत्रणात आली आहे. धरणातून कमी-अधिक विसर्ग सुरू असल्याने जिल्ह्यातील कुकडी, भीमा, घोड, भामा, इंद्रायणी, पवना, मुळा-मुठा, नीरा आणि कानंदी, आरळा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. मात्र उजनी धरणाची वाटचाल शंभरीकडे सुरू असून, भीमेतून मोठ्या प्रमाणावर पाणी येत असल्याने उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग करावा लागला आहे. 

नगर जिल्ह्यातील भंडारदरा व निळवंडे धरणापाठोपाठ मुळा धरणही भरण्याच्या मार्गावर आहे. धरणाच्या लाभक्षेत्रात पाऊस नसल्याने खरीप पिकांच्या सिंचनासाठी मंगळवारी मुळा धरणाच्या दोन्ही कालव्यांतून पाण्याचे आवर्तन सुरू केले आहे. ७५० क्‍युसेक व डाव्या कालव्यातून १०० क्‍युसेकने आवर्तन सोडण्यात आले आहे. गोदावरीला आलेल्या पुरामुळे नागमठाणवरून सुरू असलेला दीड लाख क्‍युसेकपेक्षा जास्तीचा विसर्ग मंगळवारीही सुरू होता. आवकेमुळे अनेक वर्षांनंतर उघडे पडलेले औरंगाबाद जिल्ह्यातील खडकुली गाव पाण्याखाली गेले आहे. जुने कायगाव परिसरातील अनेक वस्त्यांजवळ पाणी पोहोचले. कायगाव टोक शिवारात नदीपात्राबाहेर जवळपास एक किलोमीटरपर्यंत पाणी पसरले होते. 

नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्याने धरणसाठ्यात जलदगतीने होणारी पाण्याची वाढ मंदावली असून, धरणातून होणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे. त्यामुळे पूरस्थिती नियंत्रणात आली असून, जनजीवन काहीसे सुरळीत झाले आहे. पण गोदावरी-दारणेसह विविध नद्यांचा पूर कायम होता. गोदावरी नदीवरील खेडलेझुंगे येथील पूल खचल्याने २५ हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. गोदाकाठ परिसरातील चांदोरी, सायखेडा, शिंगवे, करंजगाव या गावांना पाण्याने वेढा दिला होता. शेतांमध्ये साचलेले पाणी तसेच असून, पाणी वेळेवर ओसरले नाही तर पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे. कळवण, सुरगाणा तालुक्यांत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे देवळा तालुक्यात गिरणा नदीला महापूर आला असून, नदीच्या काठावरील परिसरात नदीपात्रातून पाणी शेतात शिरल्याने विठेवाडी, भऊर आदी गावांतील शेतांमध्ये उभी पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

खानदेशात पावसाने कसर भरून काढली असून, सर्वत्र संततधार, मध्यम व जोरदार स्वरूपाचा पडत आहे. सातपुडा पर्वतासह नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर, नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव, धुळे जिल्ह्यांतील साक्री येथेही अतिवृष्टी झाली. आठवडाभर सतत पाऊस सुरू असल्याने ग्रामीण भागात जीर्ण घरांची पडझड होण्याची भीती आहे. शेतरस्त्यांवर चिखल असून, केळी, भाजीपाल्याची काढणी, वाहतूक करताना अडथळे येत आहेत. तसेच स्वच्छ सूर्यप्रकाश नसल्याने आंतरमशागत, खते देणे, तणनियंत्रण, फवारणीची कामे ठप्प आहेत. काळ्या कसदार जमिनीत पूर्वहंगामी कापूस पिकाच्या वाढीवर परिणाम झाला आहे.  

मंगळवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) :

कोकण : सावंतवाडी ३७०, कणकवली २७०, वैभववाडी २६०, वेंगुर्ला, पोलादपूर प्रत्येकी २००, महाड १९०, दोडमार्ग १८०, चिपळूण, कुडाळ प्रत्येकी १७०, खेड, राजापूर प्रत्येकी १५०, भिरा, दापोली, मंडणगड, माणगाव प्रत्येकी १३०, सुधागडपाली, गुहागर प्रत्येकी ११०, लांजा, देवगड, संगमेश्वर, तळा प्रत्येकी १००, मालवण, म्हसळा प्रत्येकी ९०. 

मध्य महाराष्ट्र : गगनबावडा, महाबळेश्‍वर ३३०, राधानगरी ३२०, आजरा २२०, सुरगाणा २००, गारगोटी १९०, वेल्हे १८०, चंदगड १७०, पौड १६०, बार्शी १४०, लोणावळा, जावळी मेढा, कोल्हापूर, कागल प्रत्येकी १३०, पन्हाळा १२०, गडहिंग्लज, शाहूवाडी ११०, पेठ, पाटण १००, कळवण ९०, अक्कलकोट, त्र्यंबकेश्‍वर प्रत्येकी ८०, कराड, इगतपुरी, शिराळा, नंदूरबार प्रत्येकी ७०, कडेगाव, खेड, वाई, भोर प्रत्येकी ६०, अकोले, सातारा, हातकणंगले, वडगावमावळ, अक्कलकुवा, वाळवा, नवापूर प्रत्येकी ५०. 

मराठवाडा : कंधार ६०, निलंगा ३०, कन्नड, लोहारा, उमरगा प्रत्येकी २०, किनवट, पैठण, खुलताबाद, औरंबाबाद, माजलगाव, पाथरी, वैजापूर, सिल्लोड, सोनपेठ, देगलूर, परांडा, तुळजापूर, औंढा नागनाथ प्रत्येकी १०. 

विदर्भ : मुलचेरा ८०, एटापल्ली, सडक अर्जुनी, आरमोरी ४०, बार्शी टाकळी, कोर्ची, गोंडपिंपरी, आहेरी, मलकापूर प्रत्येकी ३०, कामठी, चिखलदारा, भामरागड, पारशिवणी, गडचिरोली, नंदुरा, चामोर्शी प्रत्येकी २०. 

घाटमाथा : कोयना नवजा ४२०, शिरगाव ३२०, दवडी २७०, आंबोणे २२०, कोयना पोफळी २००, ताम्हिणी, डुंगरवाडी १९०, वळवण १२०, खंद ११०, शिरोटा, वाणगाव प्रत्येकी १००.

कोकण, मध्य महाराष्ट्र जोर कायम राहणार
बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली आहे. ओडिशा, पश्‍चिम बंगालच्या किनाऱ्यालगत असलेली ही प्राणली आणखी तीव्र होणार आहे. आज (ता. ७) विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुरामुळे जनजिवन विस्कळीत

  • कोल्हापूरमध्ये पूरस्थिती गंभीर, दहा हजारांपेक्षा अधिक नागरिकांचे स्थलांतर 
  • सांगलीत वारणा, कृष्णेच्या रुद्रावतारने पूरस्थिती गंभीर, ३१ हजार नागरिकांचे स्थलांतर
  • बचाव कार्यासाठी लष्कर, नौदल, तटरक्षक दल, एनडीआरएफची मदत
  • सिंधुदुर्गमध्ये वादळी पावसामुळे गावे, बागायती शेती पाण्यात 
  • सातारा जिल्ह्यात अनेक गावांत पूरस्थिती, नदीकाठची पिके अजूनही पाण्याखालीच
  • पुण्यात पावसाची उसंत, विसर्ग कमी झाल्याने पूरस्थिती नियंत्रणात
  • नाशिकमध्ये पुराचा जोर ओसरला, नदीकाठची पिके पाण्याखाली
  • खानदेशात संततधार पावसाने शेतीच्या कामे ठप्प

इतर अॅग्रो विशेष
गोदामांत ९० लाख टन साखर पडून; बंदरात...सोलापूर : अडचणीत सापडलेला साखर उद्योग २०१४-१५...
‘डिपिंग ऑईल’ची चढ्यादराने अनाधिकृत...नाशिक/सोलापूर : जिल्ह्यात द्राक्ष मालाला उठाव...
राज्यात दिवसभरात वाढले १२० रुग्ण;...पुणे : राज्यात सोमवारी १२० नवीन रुग्णांची...
मराठवाड्यात १०० वर लघु मध्यम प्रकल्प...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ लघु, मध्यम, मोठ्या...
रब्बी कांदा उत्पादन २५ लाख टनांनी वाढणारपुणे : देशाच्या कांदा बाजारपेठांमध्ये यंदाच्या...
भाजीपाल्याच्या नव्या लागवडीबाबत संभ्रम...कोल्हापूर : ‘कोराना’च्या संकटामुळे गेल्या काही...
अर्धबंदिस्त शेळीपालनाने वाढवले शेतीचे...कृषी विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर...
पूर्व विदर्भात पावसाला पोषक हवामानपुणे  : राज्यात तापमानाचा पारा सातत्याने...
`अमूल`कडून शेतकऱ्यांना मंदीतही २००...पुणे : राज्यातील डेअरी उद्योग सध्या अतिशय बिकट...
राज्यात कोरोना रुग्णसंख्या ७४८;...मुंबई : राज्यातील कोरोनाचा विळखा वाढत चालला...
केंद्र सरकारकडून रासायनिक खत अनुदानात...पुणे: ऐन लॉकडाऊनच्या गोंधळात केंद्र सरकारने...
शेतकरी कंपन्यांची संकलन केंद्रे...पुणे:  ‘ई-नाम’ प्रणालीत गेल्या दोन...
कोरोनामुळे हापूस अडचणीत; मुंबई बाजार...मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी...
कोरोनामुळे ‘टोमॅटो बेल्ट’ लॉकडाऊन; पुणे...पुणेः गेल्या काही वर्षात जिल्‍ह्यातील जुन्नर, खेड...
कोल्हापूर कृषी महाविद्यालयाकडून...कोल्हापूर : येथील कोल्हापूर कृषी महाविद्यालयाच्या...
राज्यात उष्ण, दमट हवामानाचा अंदाज;...पुणे : तापमानाचा पारा चाळीशी पार गेल्याने उन्हाचा...
राज्यात आत्तापर्यंत तेरा हजार टन...नगर ः कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर...
प्रयोगशीलतेतून मिळवले आर्थिक स्थैर्यनाशिक जिल्ह्यातील आडगाव येथील शिवाजी शंकर देशमुख...
...शेतकरी मात्र 'फार्म क्वाॅरंटाइन' !सांगली : कोरोनाने सर्वांची झोप उडाली आहे. संपूर्ण...
केसरची चव यंदा दुर्मिळ; संकटांमुळे आंबा...औरंगाबाद: यंदा बहुतांश आंबा बागांना मोजकाच मोहर...