पूरस्थिती गंभीर; कोकण, मध्य महाराष्ट्रात जनजीवन विस्कळित

दुथडी भरून वाहणाऱ्या प्रमुख नद्या उल्हास (ठाणे), कृष्णा, कोयना, उरमोडी, तारळी, वेण्णा (सर्व सातारा), कुकडी, भीमा, घोड, भामा, इंद्रायणी, पवना, मुळा-मुठा, नीरा, कानंदी (सर्व पुणे), पंचगंगा (कोल्हापूर), कृष्णा, वारणा (सर्व सांगली), मुळा, प्रवरा (नगर), गोदावरी, गिरणा (नाशिक), तापी (जळगाव), सुसरी, गोमाई, रंगावली (नंदुरबार), जगबुडी, वाशिष्ठी, काजळी, बाव, भारजा (रत्नागिरी), सावित्री (रायगड), ितल्लारी (सिंधुदुर्ग)
पूरस्थिती गंभीर; कोकण, मध्य महाराष्ट्रात जनजीवन विस्कळित
पूरस्थिती गंभीर; कोकण, मध्य महाराष्ट्रात जनजीवन विस्कळित

पुणे  : सलग चौथ्या दिवशी पावसाचा जोर कायम असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांची पूरस्थिती कायम आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, रायगड जिल्ह्यांतील अनेक नद्यांनी इशारा पूरपातळी ओलांडली आहे. पुराचे पाणी पात्राबाहेर पडल्याने नदीकाठच्या अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढले आहे; तर अनेक ठिकाणी वसाहती, शेतीमध्ये पाणी शिरले आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाची ‘झोड’धार सुरूच आहे. रायगड जिल्ह्यातील पेण येथे सर्वाधिक ४९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा जोर कमी झाला आहे.   शनिवारी (ता. ३) रात्रीपासूनच सुरू असलेल्या पावसाचा जोर कायम राहिल्याने मुंबईत ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, कल्याणमध्ये पावसाची मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे, तर रस्ते वाहतुकीबरोबरच रेल्वे वाहतुकीलाही यामुळे फटका बसला. पावसामुळे स्थानके, रेल्वेमार्ग जलमय झाल्याने मध्य रेल्वे; तसेच हार्बर रेल्वे पुन्हा एकदा ठप्प झाली. दादर, हिंदमाता, माटुंगा किंग्ज सर्कल, लोअरपरळ, सायन, धारावी, वांद्रे, कुर्ला, चेंबूर, काळाचौकी, अंधेरी, दहिसर, बोरीवली, गोरेगाव, विक्रोळी आदी सखल भागांत पाणी साचले. ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदीपत्रातील पाण्यात वाढ झाली आहे. पूरस्थिती असलेल्या भागात मदतीसाठी हवाई दलाचे साहाय्य घेण्यात आले.  सिंधुदुर्ग जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. समुद्राला उधाण आले असून, अजस्त्र लाटा किनाऱ्याला धडकत आहेत. किनारपट्टीच्या गावांतील वस्तीमध्ये समुद्राचे पाणी घसुले आहे. दोडामार्ग तालुक्यातील काही गावांतील भातशेती आणि बागायतीला पुराच्या पाण्याचा फटका बसला.  कोल्हापुरातील सात तालुक्‍यांत अतिवृष्टी झाली. राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाज्यांमधून ७ हजार ११२ क्‍युसेक्स, अलमट्टी धरणामधून २ लाख ५८ हजार ७१० क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी ४५ फुटांवर पोचल्याने ८६ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा कोदे लघुप्रकल्प व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. धरणांतून पाणी सोडण्यात येत असल्याने नद्यांचे पाणी जलदगतीने वाढत आहे. दररोज हजारो एकर शेती पाण्याखाली जात असल्याने नदीकाठच्या पिकांचे नुकसान होणार आहे.   सांगलीत कृष्णा नदीचे पाणी धोक्याच्या पातळीवर गेले आहे. आयर्विन पुलाजवळ रविवारी (ता. ४) सकाळी पाणीपातळी ४१ फूट होती. रात्रभर शहरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने शहरातील उपनगरेही पाण्यात गेली. चांदोली धरणात चौथ्या दिवशीही अतिवृष्टी होत असल्याने धरणातून २० हजार ४७२ क्युसेक पाणी सोडले जात आहे. धरणांतील विसर्गामुळे कृष्णा, वारणा नदीकाठांवरील २३८ गावांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.  सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील महाबळेश्वर, जावळी, पाटण, सातारा, कराड, वाई या तालुक्यांत मुसळधार पाऊस सुरू आहे. या तालुक्यांतील नद्या पाण्याने तुडुंब भरून वाहत आहेत. कृष्णा, कोयना, उरमोडी, तारळी, वेण्णा नद्यांचे पाणी पात्राबाहेर गेले आहे. कोयनेतून साडलेल्या पाण्यामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने कोयना, कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरेगाव, खटाव, खंडाळा या तालुक्यांतही दमदार पाऊस सुरू आहे. माण व फलटण तालुक्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.  पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात धुव्वाधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील १७ धरणे ओसंडून वाहत असल्याने नद्यांना पूर आला आहे. मुळशी, पवना आणि खडकवासला धरणांतून   मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असल्याने मुळा-मुठा, नीरा नदीने इशारा पूरपातळी ओलांडली आहे; तर भीमा नदीलादेखील मोठा पूर आला आहे. कुकडी, भीमा, घोड, भामा, इंद्रायणी, पवना, मुळा-मुठा, नीरा आणि कानंदी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत.  नगर जिल्ह्यातील मुळा, प्रवरा नदीसह भीमा आणि गोदावरी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदूर मध्यमेश्‍वर बंधाऱ्यातून १ लाख क्युसेक, मुळा नदीत कोतुळजवळ ५३ हजार क्युसेक वाहत आहे. निळवंडे आणि मुळा धरणातही जोरदार पाण्याची आवक सुरू आहे. मुळा नदीचे पाणी शेतात घुसले आहे.  नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पाऊस, गंगापूर, काश्यपी, गौतमी धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. चनकापूर व पुणद धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गिरणा नदीलाही पूर आला आहे. गोदावरी, गिरणा काठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला. चांदोरी व सायखेडा गावातील मुख्य रास्ता पाण्याखाली गेला आहे.  नांदूर मध्यमेश्वर, नागमठाण प्रकल्पातून विसर्ग वाढल्याने औरंगाबादमधील जायकवाडी प्रकल्पाच्या पाण्याच्या आवकेतही दुपटीने वाढ झाली. गोदावरीच्या पात्रातील पाण्यातही वाढीची शक्यता असल्याने वैजापूर, गंगापूर, पैठण तालुक्यातील गोदावरी काठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यातील अनेक मंडळामध्ये जोरदार पाऊस झाला. लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात मध्यम,तर औरंगाबाद, जालना, बीड तुरळक ठिकाणी हलका पाऊस झाला. किनवट तालुक्यात ओढ्या नाल्याचे पाणी शेतातमध्ये शिरल्यामुळे पिके पाण्याखाली गेल्याने नुकसान झाले. ओढ्याच्या पुरामध्ये एक शेतकरी वाहून गेला. हिंगोलीतील सांडस गावाजवळील पूल तुटल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्यामुळे इसापूर येथील उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या धरणातील उपयुक्त पाणीसाठ्यामध्ये होत असलेली वाढ होत आहे. येलदरी, सिद्धेश्वर, माजलगांव, निम्नदुधना धरणामध्ये अद्याप पाणीसाठा अचल पातळीत आहे, तर विष्णुपुरी प्रकल्प तळशी आहे.  रविवारी (ता.४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) :

  • कोकण : पेण ४९०, अलिबाग ४१०, ठाणे ३७०, बेलापूर ३४०, कल्याण, विक्रमगड, वाडा प्रत्येकी ३१०, कर्जत २९०, आंबरनाथ, भिरा प्रत्येकी २७०, सुधागडपाली २५०, खालापूर, उल्हासनगर प्रत्येकी २४०, मुरुड २३०, मोखेडा, श्रीवर्धन प्रत्येकी २२०, म्हसळा, रोहा प्रत्येकी २१०, महाड, सांताक्रुझ, मुरबाड, वसई प्रत्येकी २००, पालघर, शहापूर प्रत्येकी १९०, संगमेश्वर, उरण प्रत्येकी १८०, भिवंडी, खेड, लांजा, मंडणगड, माणगाव, पनवेल प्रत्येकी १७०, चिपळूण १६०, पोलादपूर, रत्नागिरी प्रत्येकी १५०, तलासरी १३०, पेडणे, राजापूर प्रत्येकी १२०, दोडामार्ग ११, हर्णे, सावंतवाडी प्रत्येकी १००.  कुडाळ, सांगे, वेंगुर्ला प्रत्येकी ९०, गुहागर ८०.
  • मध्य महाराष्ट्र :  महाबळेश्वर, त्र्यंबकेश्वर प्रत्येकी ३१०, हर्सूल २६०, इगतपुरी २२०, पेठ २००, धाडगाव, पौड प्रत्येकी १९०, सुरगाना १८०, ओझरखेडा १७०, अक्कलकुवा १६०, चंदगड, गगनबावडा, पन्हाळा, वेल्हे प्रत्येकी ११०, नवापूर, ओझर, राधानगरी, वडगाव  मावळ प्रत्येकी १००, आजरा, गारगोटी, गडहिंग्लज, शाहूवाडी, तळोदा, दिंडोरी, कडेगाव, खेड, शिराळा, जुन्नर, कराड, पाटण, विटा प्रत्येकी ६०, घोडेगाव, भोर, हातकणंगले, जळगाव, कोल्हापूर, नंदुरबार, पुणे, साक्री, सातारा प्रत्येकी ५०.
  • मराठवाडा: किनवट ८०, हिमायतनगर, माहूर, औंढा नागनाथ, हदगाव, कळमनुरी, अर्धापूर, हिंगोली, पूर्णा, अहमदपूर, बिलोली, धर्माबाद, कंधार, लोहा, मुदखेड, मुखेड, नायगाव खैरगाव, पालम, सेनगाव, वसमत प्रत्येकी २०. 
  • विदर्भ : चामोर्शी ९०, मुलचेरा ८०, गोंडपिंपरी ७०, एटापल्ली, महागाव प्रत्येकी ६०, जेवती, अहेरी, उमरखेड प्रत्येकी ५०, भामरागड ४०, पुसद ३०, सिरोंचा, राजूरा, कोपर्णा, बल्लारपूर, नरखेडा, चिखलदरा, चांदूरबाजार, गोंदिया, मौदा प्रत्यकी २०. 
  • घाट माथा : ताम्हिणी ४१०, दावडी ४००, शिरगाव ३९०, लोणावळा, डुंगरवाडी प्रत्येकी ३४०, अंबोणे ३३० खोपोली, खंद प्रत्येकी १९० कोयना (नवजा) १६०, भिवपुरी १५०, कोयना (पोफळी), शिरोटा प्रत्येकी १४०, वाणगाव १२०, ठाकूरवाडी १००.
  • पाऊस दृष्टिक्षेपात...

  •    गोदावरीच्या नाशिक, नगर, औरंगाबाद जिल्ह्यांतील नदीकाठ संवेदनशील 
  •    पुण्यातील मुळशी धरण भागात ४८ तासांत ९०० मिलिमीटर पावसाची नोंद 
  •    पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठेने इशारा पातळी ओलांडली
  •    मुसळधार पावसामुळे सिंहगड, डेक्कन क्वीन, इंद्रायणी, इंटरसिटी एक्स्प्रेस रद्द
  •    सांगलीत कृष्णा नदीने ओलांडली इशारा पातळी, औदुंबर येथील दत्त मंदिर पाण्याखाली
  •    चांदोली धरणातून विसर्ग वाढला, वारणेच्या पाणीपातळीत वाढ
  •    कोयना धरणाचे दरवाजे ११ फुटांपर्यंत उचलले
  •    कोयना-कृष्णा नदीकाठांवरील नागरिकांना सर्तकतेचा इशारा
  •    कोपर्डे (ता. सातारा) येथील पुलावरून कृष्णा नदीचे पाणी
  •    परभणीतील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या (इसापूर धरण) पाणीसाठ्यात वाढ
  •    बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यामध्ये पूरस्थिती गंभीर, लष्कर तैनात
  • ३०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडलेली ठिकाणे  : पेण ४५०, अलिबाग ४१०, ताम्हिणी ४१०, दावडी ४००, शिरगाव ३९०, ठाणे ३७०, बेलापूर ३४०, लोणावळा ३४०, डुंगरवाडी ३४०, अंबोणे ३३०, कल्याण ३१०, विक्रमगड ३१०, वाडा ३१०. कोकण, मध्य महाराष्ट्रात जोर कायम राहणार अरबी समुद्रावरून वाहत असलेले वेगवान वारे, बंगालच्या उपसागरात तयार होत असलेले कमी दाबाचे क्षेत्र आणि मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबचा पट्टा पाेषक ठरत असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्राला पावसाने दणका दिला आहे. आज (ता.५) कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार आहे. तर विदर्भात उद्यापासून (ता.६) पावसाचा जोर वाढण्याचा, तर मराठवाड्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com