गडचिरोलीत पूरस्थिती कायम; कोल्हापुरात संथ गतीने घट

पूर
पूर

नागपूर/कोल्हापूर ः मध्य प्रदेशात पावसाचा जोर कायम असल्यामुळे पूर्व विदर्भातील गडचिरोली, भंडारा जिल्ह्यांत पूर परिस्थिती तिसऱ्या दिवशीदेखील कायम होती. गोंदिया जिल्ह्यात मंगळवारी पूर ओसरला. मात्र १२०० हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. तर, कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस थांबल्याने नद्यांचे पाणी संथ गतीने ओसरण्यास सुरवात झाली आहे. पाणी ओसरण्याची गती संथ असली तरी, पुढील कालावधीत पाणी जलद ओसरेल, असा अंदाज जलसंपदा विभागाने व्यक्त केला. भंडारा जिल्ह्यात नद्यांच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने जिल्ह्यात सर्वदूर रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. परंतु मध्य प्रदेशात पावसाची संततधार सुरू असल्याने जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सर्वच विभागांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे. जिल्ह्यात पूर परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला असून बोट व इतर आधुनिक साहित्य सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्‍याचा संपर्क तिसऱ्या दिवशीदेखील जिल्हा मुख्यालयापासून तुटलेला होता. जिल्ह्यातील नद्या तिसऱ्या दिवशीदेखील ओव्हरफ्लो वाहत होत्या. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून सर्वच रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत. त्याचा फटका येथील सामान्य नागरिकांना बसत आहे.  बुधवारी (ता. ११) सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावड्यात सर्वाधिक ५१ मि. मी. पाऊस झाला. कोयनेतून २०५३२ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. तर अलमट्टीमधून ७१७४१ पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दुपारी दोन वाजता राजाराम बंधारा येथील पंचगंगेची पातळी ४० फुटावरून ३८.११ फूट इंचापर्यंत खाली आली. जिल्ह्यातील बंधारेही हळूहळू मोकळे होत असून दुपारपर्यंत ३४ बंधारे पाण्याखाली होते. राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे बंद झाल्याने भोगावती नदीत होणारा विसर्ग थांबला आहे.  बुधवारी दिवसभरही या भागात फारसा पाऊस नसल्याने नद्यांच्या पाण्याची वाढ थांबली असल्याचे राधानगरी धरणाच्या सूत्रांनी सांगितले. कोयना धरणाचा विसर्ग वीस हजारावर आणण्यात आला आहे. पाऊस पूर्ण थांबला असला तरी पावसाव्यतिरिक्त इतर स्रोतातून काही प्रमाणात पाणी धरणात येत असल्याने लेव्हल ठेवण्यासाठी पुढील दोन दिवस तरी कोयनेतून विसर्ग संपूर्ण बंद करण्यात येणार नसल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  कोयनेच्या विसर्गात कपात केल्याने त्याचा सकारात्मक परिणाम कृष्णेची पाणी पातळी कमी होण्यावर होत आहे. संथगतीने कृष्णेची पातळी कमी होत आहे. यामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्याच्या कृष्णा काठावरील गावांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रातून जाणारे पाणी कमी झाल्याने आलमट्टी धरणानेही विसर्गात घट केली. धरणक्षेत्राबराबर कोल्हापूर जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी ढगाळ हवामान व सुर्यप्रकाश असे वातावरण राहिले. यामुळे पुराचे पाणी पुढील दोन दिवसात जलद गतीने कमी होइल असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.  गोंदिया जिल्ह्यात १२०० हे. नुकसान गोंदिया आणि तिरोडा तालुक्‍यात नद्यांना पूर आल्याने त्यालगत असलेल्या शेतांमध्ये पाणी शिरले. पुरामुळे दोन्ही तालुक्‍यांत सुमारे ११ गावांमधील १२०० हेक्‍टर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यात सध्या पूर ओसरला असून सर्वच रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. राज्यातील प्रमुख धरणांतून होणारा विसर्ग 

गोसी खुर्द  १० हजार ०७४
कोयना   २० हजार ५३२
मुळशी  ५ हजार १३० 
उजनी  १० हजार 
वीर   १३ हजार ९६१ 
भाटघर   ४ हजार १००
वारणा  ४ हजार ५५१
दारणा   १० हजार ३८४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com