महापुराने बुडवला गुऱ्हाळघराचा गोडवा

पूर
पूर

कोल्हापूरः सर्वच बाबतीत मातब्बर असणाऱ्या कोल्हापूरचा गोडवा ही तितकाच अवीट आहे. यापैकीच कोल्हापूरला चिकटून असणारे वडणगे हे गाव. या गावाच्या गुऱ्हाळघरांना पुराचा फटका तर बसलाच पण अतिवृष्टीनेही झोडपून काढले. या दुहेरी संकटामुळे आता येणाऱ्या हंगामावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. एकेका गुऱ्हाळाची झालेली लाखो रुपयांची हानी आता गुऱ्हाळमालकांना कर्जाच्या खाईत लोटणारी ठरत आहे. आता पुढचा हंगाम सुरू कसा करायचा ही चिंता अनेक गुऱ्हाळघरांना सतावत आहे. प्रचंड नुकसानीमुळे यंदा अपवाद वगळता गुऱ्हाळे सुरू होतील की नाही याची शाश्‍वती राहिली नसल्याची व्यथा गुऱ्हाळमालकांनी मांडली. कोल्हापूर रांगड म्हंटल जातं तशी येथील माणसांची मायाळू वृत्तीही तितकीच चर्चेची. मुळातच अनेक नद्यांच्या कुशीत असणारी गावे व त्या मातीचा मायाळू गुण कोल्हापूरकरांच्या नसानसात भिनलाय. याच गोडीचे प्रतीक समजला जाणारा येथील गूळ उद्योग. १८८६ ला शाहू महाराजांनी गुळाची पेठ वसविली. विशेष करून करवीर तालुक्‍यातील नदीकाठची जमीनच इतकी सुपीक आहे. या तालुक्‍यातील काही गावांत तयार होणाऱ्या गुळास "पेढा"असे संबोधले जाते. असे असले तरी अनेक अडचणीमुळे हा व्यवसाय आता अखेरच्या घटका मोजत आहे. ज्या गावात शेकडो गुऱ्हाळघरे होती त्याच गावात आता अगदी बोटावर मोजण्याइतकीच गुऱ्हाळघरे राहिली आहेत.  गुऱ्हाळमालकांनी मांडलेली व्यथा... पहा video जळण भिजल्याने इंधनाची उपलब्धता अशक्‍य संजय पाटील हे तिसऱ्या पिढीपासून गुऱ्हाळ व्यावसायिक आहेत. श्री. पाटील यांचे गुऱ्हाळ हे वडणगेतील प्रमुख गुऱ्हाळापैकी एक समजले जाते. यंदा आलेल्या महापुरात हे गुऱ्हाळही पाण्याखाली गेले. गुऱ्हाळ उभे करतानाच नैसर्गिकरीत्या ते उंचीवर उभे करावे लागते. चुलवाणीसाठी पाच ते सहा फूट उंचीवरच गुऱ्हाळघराचे बांधकाम केले जाते. साधारणत: येथील गुऱ्हाळ हंगाम नोव्हेंबरमध्ये सुरू होतो. यासाठी गुऱ्हाळघर स्वच्छतेची कामे सुरू होती. यातच पुराचे पाणी थेट गुऱ्हाळघरात आले. यापूर्वी गुऱ्हाळासाठी महत्त्वाची असणारी चिपाडाची (जळण) भिजली. आणि आता ही भिजलेले चिपाडच गुऱ्हाळ सुरू करण्याचा प्रमुख अडथळा ठरणार आहेत. तब्बल तीन दिवस पाणी राहिल्याने चिपाडातील अंश निघून गेला आहे. आता काही दिवसांनी खराब होण्याचा धोका आहे. गुऱ्हाळाचे चिलीम (धुराडे) खराब झाले आहे. पण, पावसामुळे ते फुटून त्यातून पाणी निघत असल्याचे दृश्य पूर काळात होते. सरकारकडून गूळ उद्योगाकडे काणाडोळा पूर ओसरला. सरकारी मदतीचे अध्यादेश निघण्यास सुरवात झाली. पण, या अध्यादेशात पाणीपट्टीसकट इतर उद्योगाचा समावेश होता. परंतु, जो शेतीपूरक कुटीरोद्योग म्हणून गणला जातो त्या गुऱ्हाळघर उद्योगाची कुठेच नोंद नसल्याने गुऱ्हाळघर मालकांत अस्वस्थता पसरली. पहिल्यांदा त्यांनी बाजारसमितीत जाऊन मदत मिळण्याबाबत बैठका घेतल्या. जे काही होईल ते मुंबईतच होणार असल्याने संजय दिंडे यांच्यासहीत काही गुऱ्हाळघर मालकांनी थेट मंत्रालय गाठले. मुख्यमंत्र्याची भेट मिळाली नसल्याने नाराज झालेल्या श्री. दिंडे यांनी गुऱ्हाळमालकांची अवस्था मांडली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील भेटले. त्यांनी काही तरी तरतूद करू असे सांगितले आहे. पण, यावर गांभीर्याने कार्यवाही होण्याची गरज व्यक्त केली. बाबासाहेब पाटील यांनी यंदा दुहेरी फटका बसल्याचे सांगत यंदाच काही खरं नाही असे सांगत निराशा व्यक्त केली. वडणग्यातील काही गुऱ्हाळे पुराने गेली तर बहुतांशी गुऱ्हाळघरे अतिवृष्टीने खराब झाली आहेत. अनेकांची पडझड झाली आहे. सरकार याबाबत काहीच करीत नाही असे सांगत नाराजी व्यक्त केली. यशवंत घाटगे, अनिल देवणे यांनीही सरकारने मदत केली नाही तर हा व्यवसायच पूर्ण बंद होईल अशी भीती व्यक्त केली. नुकसान टाळण्यासाठी पुन्हा कर्जाची गरज नेताजी चौगले म्हणाले, की या हंगामासाठी मजुरांना आम्ही पाच पाच लाखांपर्यंत ॲडव्हान्स दिला आहे. जर गुऱ्हाळघरे सुरू झाली नाहीत. तर ही सगळी रक्कम वाया जाणार आहे. काम नसल्याने ती रक्कम मजूरही परत करू शकणार नाहीत. यामुळे आता ते नुकसान टाळण्यासाठी पुन्हा कर्जाऊ रक्कम घेऊन कोणत्याही परिस्थितीत गुऱ्हाळघरे सुरू केल्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. यंदा शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचा ऊस गुऱ्हाळघरांकडे असा आणायचा अशी चिंता व्यक्त करीत यंदा गुऱ्हाळघरे सुरू झाली तरी एक दोन महिन्यांच्या वर चालणार नाहीत, अशी भीती व्यक्त केली.  जर हंगाम पूर्ण झाला नाही तर आम्ही करायचे काय असा सवाल श्री. चौगले यांनी व्यक्त केला. पुराने जवळ जवळ ७५ टक्के ऊस खराब झालाय. एक गुऱ्हाळघर पूर्ण क्षमतेने चालण्यासाठी किमान पंचवीस एकर ऊस लागतो. पण यंदा सर्वच उसात अनेक दिवस पाणी राहिल्याने उसातून किती उत्पादन निघणार याची कोणतीच खात्री नसल्याचे त्यांनी सांगितले. गुऱ्हाळघरे चालवायची कशी? श्री. पाटील यांनी व्यवसायाची सद्य:स्थिती स्वत:चे उदाहरण देत स्पष्ट केली. ‘‘मी दहा वर्षांपूर्वी गुऱ्हाळघर सुरू केले. त्या वेळी सुमारे दोन लाख रुपये कर्ज घेतले. जसे काही दिवस जातील तशी कर्जाची रक्कम कमी होऊन फायद्याची रक्कम हाती पडत राहील या अपेक्षेने गुऱ्हाळ सुरू केले. परंतु, झाले उलटेच. कधी मजुरांनी दगा दिला तर कधी गुळाच्या दराने. तर कधी वातावरणातील नैसर्गिक बदलाने. आता तर पुराने, अतिवृष्टीने सगळेच गेले आहे. आता माझ्या डोक्‍यावर जवळ जवळ दहा लाख रुपयांचे कर्ज आहे. आता ते फेडायचे कसे असा उलट प्रश्‍न करीत गुऱ्हाळघरे  चालविणे किती नुकसानीचे ठरत आहे.’’ उत्पादनात निम्म्याने घटण्याची शक्‍यता जसे शेतकऱ्यांचे गणित बिघडले तसे गुऱ्हाळघर मालकांचेही. शेतकरी आताच नुकसानीच्या फेऱ्यात गेलाय. ऊस उत्पादनाची शाश्‍वती नाही. यामुळे यंदा गुऱ्हाळघरे सुरू होईपर्यंत किती ऊस टिकेल या बाबत कोणतीच खात्री देत नसल्याचे चित्र आहे. पूर ओसरल्यानंतर निम्मे बुडलेले जे ऊस पीक हिरवे दिसत होते. आता ऊन पडल्यानंतर ते वाळण्यास सुरवात झाले आहे. जादा पाण्यामुळे ते तळातूनच खराब होत आहे. परिणामी, आणखी दहा ते पंधरा दिवसांत ऊस पीक चाऱ्यासाठीही उपयुक्त ठरणार नाही, अशी स्थिती आहे. या साऱ्या वातावरणात यंदा कोणत्या अपेक्षेने गुऱ्हाळघरे सुरू होतील याची खात्री देता येत नसल्याचा अंदाज गुऱ्हाळ उत्पादकांचा आहे. गुऱ्हाळघरांचे नुकसान झाल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी किमान लाख रुपयापर्यंतचा खर्च अपेक्षित तेवढी रक्कम गोळा करून पुन्हा ऊस उपलब्ध करण्याचे आव्हान यंदा गुऱ्हाळघरमालकांना आहे. ऊस उत्पादनातच घट असल्याने यंदा गूळनिर्मितीही यथातथाच राहील असा अंदाज गुऱ्हाळमालक संजय पाटील यांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com