साताऱ्यात पुरामुळे २५ हजार वीजग्राहकांचे नुकसान

पुरामुळे २५ हजार वीजग्राहकांचे नुकसान
पुरामुळे २५ हजार वीजग्राहकांचे नुकसान

सातारा : अतिवृष्टी आणि पुराचा वीज वितरणला शॉक बसला आहे. अनेक ठिकाणी ट्रान्स्फॉर्मरमध्ये बिघाड झाल्यामुळे सुमारे २५ हजार ग्राहकांचे नुकसान झाले आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव सध्या पूरग्रस्त भागात वीजपुरवठा खंडित केलेला आहे. त्यामुळे नेमका नुकसानीचा आकडा पूर ओसरल्यावर समजणार आहे. 

सातत्याने दोन आठवडे होणारी अतिवृष्टी आणि विविध धरणांतील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सोडलेले मोठ्या प्रमाणात पाणी यामुळे कऱ्हाड, पाटण, वाई तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच सातारा, जावली, महाबळेश्‍वर तालुकेही अतिवृष्टीने बाधित झाले आहेत. या पुराचा वीज वितरण कंपनीला मोठा फटका बसला आहे. 

अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यात ट्रान्स्फॉर्मर बुडाले आहेत. तसेच खांब, विजेच्या ताराही तुटल्या आहेत. डीपीमध्ये पाणी घुसले आहे. ही सर्व नुकसानीची माहिती पूर ओसरल्यानंतरच प्रत्यक्ष समजणार आहे. सध्यातरी प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील सुमारे ८७३ ट्रान्स्फॉर्मर बाधित झाले आहेत. त्या प्रमाणात डीपी बॉक्सही पाण्यात गेले आहेत. यामुळे साधारण २४ हजार १८६ ग्राहक बाधित झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक नुकसानी पाटण, कऱ्हाड, जावली, महाबळेश्‍वर, सातारा तालुक्याचा समावेश आहे. 

वाई तालुक्यात काही ठिकाणच्या वीज पोलचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका कृषी पंपांच्या लाइनला बसला आहे. त्यामुळे पूर ओसरल्यावरच नेमकी नुकसानीची आकडेवारी समजणार आहे. सध्यातरी पूरग्रस्त भागात वीजपुरवठा खंडित आहे. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत केल्यानंतर प्रत्यक्ष नुकसान समजणार आहे. त्यामुळे वीज वितरणला पुराने कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीचा फटका बसला आहे.

अतिवृष्टीमुळे वाई, महाबळेश्‍वर, पाचगणी येथे विविध कारणांनी विजेचा ब्रेकडाऊन आहे. पोलची दुरुस्ती केल्यानंतर तेथे वीजपुरवठा पूर्ववत होत आहे. पण पाटण आणि कराडला पूरपरिस्थिती असल्याने तेथील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित करण्यात आला आहे, असे वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com