सोलापूर जिल्ह्यात पूरस्थिती कायम

बेगमपूर- माचनूर दरम्यानच्या पुलाला पाणी टेकले
बेगमपूर- माचनूर दरम्यानच्या पुलाला पाणी टेकले

सोलापूर  ः पुणे जिल्ह्यातील धरणांतून उजनी धरणात येत असलेल्या पाण्यामुळे भीमा नदीकाठी पूरस्थिती गंभीर झालेली आहे. गेल्या आठ दिवसांपासून वीर धरणातून, तर गेल्या चार दिवसांपासून उजनी धरणातून भीमा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत असल्यामुळे भीमा नदी दुथडी भरून वाहताना आता पात्राच्या बाहेर पडली आहे. त्यातच बुधवारी (ता. ७) उजनी धरणाने शंभर टक्के पाण्याची पातळी गाठली. त्याचा सर्वाधिक फटका पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ तालुक्यांना बसला आहे. दुसरीकडे नीरेच्या पाण्यामुळे माळशिरस तालुक्याला फटका बसला आहे. आतापर्यंत सुमारे आठ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यत आले आहे. 

पंढरपूर शहराला सोलापूर, बार्शी, मराठवाड्याशी नवे, जुने तिन्ही, तर मंगळवेढ्याला जोडणारे गोपाळपूर येथील दोन्ही पूल पाण्याखाली गेल्यामुळे बुधवारी सकाळी ११ वाजल्यापासून पंढरपुरात करकंब, शेटफळ, मोहोळ, तिऱ्हे, मंगळवेढामार्गे येणारी सर्व वाहतूक पूर्णपणे बंद झालेली आहे. येथील दगडी पूल सोमवारीच पाण्याखाली गेला आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता टेंभुर्णीकडे जाणारा नवीन पूल आणि १ वाजण्याच्या सुमारास दगडी पुलाजवळील बांधण्यात आलेला नवीन पूलही पाण्याखाली गेला.

गोपाळपूरमार्गे मंगळवेढा, विजापूरकडे जाणारे दोन्ही पूल मंगळवारीच पाण्याखाली गेल्यामुळे यामार्गे मंगळवेढ्याला जाणारी वाहतूक बंद झाली आहे. सांगोला रोडवरून कासेगावमार्गे या भागातील वाहतूक सुरू झालेली आहे. सोलापूर-मंगळवेढा मार्गावरील बेगमपूर येथील पूल पाण्याखाली गेल्यामुळे सोलापूरकडे मंगळवेढा आणि पंढरपूरचा सर्वच मार्गांनी असणारा संपर्क ठप्प झालेला आहे. तिऱ्हेमार्गे सोलापूर रस्त्यावरील वाहतूक देगाव येथील रस्त्यावर पाणी आल्यामुळे बंद पडलेली आहे.

भीमा नदीकाठच्या उंबरे, पिराची कुरोली, पटवर्धन कुरोली, शेळवे, देवडे, खेडभाळवणी, खेड भोसे, व्होळे, कौठाळी, शिरढोण, इसबावी,  चिंचोली, भटूंबरे, शेगाव दुमाला, गोपाळपूर, देगाव, अजनसोंड, मुंढेवाडी, चळे, सुस्ते, आंबे, खरसोळी, पोहोरगाव, पुळूज, आंबेचिंचोली, सरकोली या गावांतील सुमारे ४० हजार हेक्टर पिके पाण्याखाली गेली आहेत. त्याचबरोबर नदीपासून आतील बाजूला असलेल्या वाखरी, देगाव, ईश्‍वर वठार या भागातील शेकडो हेक्टर पिके पाण्याखाली गेली आहेत. वाखरी येथे मंगळवारी सायंकाळीच पुराचे पाणी आल्यामुळे ओढ्याच्या दोन्ही बाजूंची पिके पाण्यात गेलेली आहेत. तसेच यल्लमादेवी मंदिरास पाण्याने पूर्णपणे वेढा घातलेला आहे. 

उजनी शंभर टक्के; पण विसर्ग केला कमी दरम्यान, पुण्याकडून उजनी धरणात येणारा पाण्याचा विसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी ११ वाजता उजनीतील विसर्ग १ लाख ६० हजार क्युसेकपर्यंत कमी करण्यात आलेला आहे. मात्र तरीही वीर धरणातील विसर्ग ८० हजार क्युसेकपर्यंत कायम असून, पुढील दोन ते चार दिवस पूरस्थिती कायम राहील मात्र नियंत्रणात राहील, असे सांगितले. 

पंढरपुरात शेकडो घरे पाण्यात पंढरपूर शहरातील व्यास नारायण, अंबाबाई पटांगण झोपडपट्टीतील ४०० पेक्षा जास्त झोपड्या पाच ते सात फूट पाण्याखाली गेल्या आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com