agriculture news in marathi, flood situation continues, pune, maharashtra | Agrowon

कोल्हापूर, सांगली, पंढरपूर पुराच्या विळख्यातच 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

पुणे : कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत असल्याने प्रमुख धरणांमधील विसर्ग वाढून नद्यांना महापूर आला. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापुरात बुधवारी (ता. ७) पूरस्थिती धोक्याच्या पातळीवरच होती. पावसाने काहीशी उसंत घेतल्याने नाशिक, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, औरंगाबादमध्ये पूर ओसरला. पावसामुळे जनजीवन प्रभावित झाले, तर शेतीशिवारात पाणी घुसल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. बुधवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये साताऱ्यातील कोयना नवजा येथे सर्वाधिक ३३०, तर रायगडमधील माणगाव येथे ३२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 
 

पुणे : कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत असल्याने प्रमुख धरणांमधील विसर्ग वाढून नद्यांना महापूर आला. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापुरात बुधवारी (ता. ७) पूरस्थिती धोक्याच्या पातळीवरच होती. पावसाने काहीशी उसंत घेतल्याने नाशिक, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, औरंगाबादमध्ये पूर ओसरला. पावसामुळे जनजीवन प्रभावित झाले, तर शेतीशिवारात पाणी घुसल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. बुधवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये साताऱ्यातील कोयना नवजा येथे सर्वाधिक ३३०, तर रायगडमधील माणगाव येथे ३२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 
 

पंचगंगेसह, सर्वच नद्यांना महापूर आल्याने कोल्हापूर शहर आणि काही गावांना पुराच्या पाण्याने वेढले आहे. जिल्ह्यात २०४ गावे पुरामुळे बाधित झाली असून, या गावांमधून ११ हजारांहून अधिक कुटुंबांमधील सुमारे ५२ हजार व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बुधवारी (ता. ७) सकाळी नौसेनेच्या दोन विमानांतून एका बोटीसह २२ जणांचे पथक तसेच गोवा कोस्टगार्डचे एक हेलिकॉप्टर बोटीसह दाखल झाले. एनडीआरएफ आणि लष्करांनी बोटीद्वारे कोल्हापूर शहर, शिरोळ, चिखली आदी भागांत पूरग्रस्तांना मदत देण्यास सुरवात केली आहे. रुकडीजवळच्या रेल्वे रुळावर पाणी आले आहे. राधानगरीचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद झाल्याने कोल्हापूरवासीयांना दिलासा मिळाला. जिल्ह्यातील सुमारे पन्नास टक्के शिवारे पाण्याखाली गेली आहेत. ऊस व भाताचे मिळून एक लाख हेक्टरहून अधिक क्षेत्र पाण्याखाली गेले असल्याने कोट्यवधी रुपयांचा तोटा शेतकऱ्यांना होणार आहे. 

सांगलीत आलेल्या महापुराने सर्वोच्च पातळी पातळी गाठली आहे. आयर्विन पुलाजवळ ५५ फूट पाणीपातळीची नोंद झाली. महापुराने निम्मे शहर पाण्याखाली गेले असून, जिल्ह्यातील ११७ गावांमधील ७५ हजारांहून अधिक नागरिक बाधित झाले आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. ‘एनडीआरएफ’च्या दोन टीम पूरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी मदत करत आहेत. जिल्ह्यातही सव्वा लाख लोकांचे स्थलांतर करण्यात आले असून, जिल्ह्यातील राज्य मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग पाण्याखाली गेले आहेत. तीस हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रातील पिकाचे नुकसान होणार आहे.  

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने नद्या दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली असल्याने कुजू लागली आहेत. मंगळवारी पश्चिम भागात दमदार पावसाच्या सरी कोसळत होत्या. शेतजमिनी उफाळू लागल्याने पिकांना धोका निर्माण झाला आहे. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे १६ फुटांवरून १४ फुटांवर आणण्यात आले आहे.

वीर, उजनी धरणांतून पाणी सोडण्यात येत असल्यामुळे नीरा, भीमा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. बुधवारी (ता. ७) उजनी धरणाने शंभर टक्के पाण्याची पातळी गाठली, धरणातून विसर्ग वाढला. भीमा नदीपात्राबाहेर पडल्याने त्याचा सर्वाधिक फटका पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ या तालुक्यांना बसला आहे. दुसरीकडे नीरेच्या पाण्यामुळे माळशिरस तालुक्याला फटका बसला आहे.  

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर कमी झाला. मुसळधार पावसामुळे अनेक भागांत साचलेले पाणीदेखील ओसरत आहे. मात्र पूरस्थितीमुळे लाखोंची हानी झाली आहे. पाणी भरलेल्या बाजारपेठा अजूनही सुरू झालेल्या नाहीत. पश्‍चिम महाराष्ट्राशी संपर्क तुटल्यामुळे जीवनावश्‍यक वस्तूंची आवक पूर्णपणे थांबली आहे. खारेपाटण, बांदा या दोन्ही शहरांमध्ये पुराचे पाणी साचून आहे. कुडाळ, मालवण, दोडामार्ग, वैभववाडी, देवगड या तालुक्यांतील पुराचे पाणी ओसरले आहे. झाराप ते कुडाळ रेल्वे स्थानकादरम्यान रुळावर पाणी असल्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळित झाली.

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात भातशेती पाण्यात आहे. काजळी नदीला आलेल्या पुराचे पाणी पोमेंडी, सोमेश्‍वर, हातीससह गुरुमळी येथील शेतात शिरले आहे. पुराच्या पाण्याबरोबर आलेला गाळही भातशेतीमध्ये साचून राहिल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. चिपळूण, राजापूर शहर सलग तीन दिवस पुराच्या पाण्यात होते. माखजनसह संगमेश्‍वर बाजारपेठेमध्ये पाणी घुसले. वाशिष्ठी, जगबुडी, शास्त्री, बाव नदी, काजळी या जिल्ह्यांतील मोठ्या नद्यांना पूर आला आहे. संगमेश्‍वर तालुक्यातील दहा ते बारा गावांतील भातशेतीमध्ये पाणी साचून असल्यामुळे नुकसानीचा आकडा वाढणार आहे. काजळीच्या नदी किनाऱ्या‍वर सुमारे पन्नास एकराहून अधिक शेती बाधित होऊ शकते, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

नांदूर मध्यमेश्वर, नागमठाणमधून होणारा पाण्याचा विसर्ग घटल्याने बुधवारी दुपारनंतर वैजापूर व गंगापूर तालुक्‍यात गोदावरीचे पाणी ओसरण्यास सुरवात झाली. जायकवाडी प्रकल्पात होणाऱ्या प्रत्यक्ष आवकेच्या प्रमाणाही कमी झाले आहे. पूर ओसरणे सुरू असले तरी या पुराने शेतीपिकाचे मोठे नुकसान केले आहे. वैजापूर तालुक्‍यातील नदीकाठच्या पिकांचेही पुराने नुकसान केले आहे. भोकर, नांदेड, मुदखेड, उमरी, धर्माबाद, मुखेड तालुक्यांतील अनेक मंडळांमध्ये चांगला पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील परभणी, पूर्णा, गंगाखेड तालुक्यांतील अनेक मंडळांमध्ये हलका पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत, औंढानागनाथ तालुक्यातील अनेक मंडळांमध्ये पावसाचा जोर चांगला होता. 

नशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ सुरगाणा तालुक्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे भातशेती संकटात सापडली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून धो-धो पडणाऱ्या पावसाचे पाणी भाताच्या लागवडीखालील क्षेत्रामध्ये साचून राहिल्याने भातरोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी रोपे पिवळी पडून सडण्याच्या मार्गावर आहेत.  

पुणे जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. जिल्ह्याच्या उर्वरित भागांत पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी सुरू आहेत. धरणांमध्ये येणाऱ्या आवकेनुसार पाण्याचा विसर्गही कमी-अधिक करण्यात येत आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने नद्यांची पाणीपातळी कमी झाली आहे.

बुधवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) : कोकण : माणगाव ३२०, तळा २२०, महाड, सावंतवाडी प्रत्येकी २१०, कुडाळ १८०, चिपळूण १७०, मुरूड १६०, पोलादपूर १४०, गुहागर १३०, दापोली १३०, वेंगुर्ला, वैभववाडी, म्हसळा, संगमेश्वर प्रत्येकी १२०, कणकवली, खेड प्रत्येकी ११०, वाल्पोई, लांजा, मंडगणगड, शहापूर, दोडमार्ग प्रत्येकी १००, सुधागडपाली, मालवण प्रत्येकी ९०, राजापूर, जव्हार, वाडा प्रत्येकी ८०, देवगड, राहा, कर्जत प्रत्येकी ७०.

मध्य महाराष्ट्र : महाबळेश्वर २८०, गगनबावडा २३०, आजरा, राधानगरी प्रत्येकी १९०, चंदगड १८०, गारगोटी, जावळी मेढा प्रत्येकी १५०, पाटण १४०, कागल १३०, लोणावळा, इगतपुरी प्रत्येकी ११०, शाहूवाडी, पन्हाळा, गडहिंग्लज प्रत्येकी १००, वाई, कोल्हापूर प्रत्येकी ९०, त्र्यंबकेश्वर, शिराळा, वेल्हे, भोर प्रत्येकी ८०, पेठ, पौड प्रत्येकी ७०, सुरगाणा ६०, कराड, हातकणंगले प्रत्येकी ५०.

मराठवाडा : अहमदपूर, मुदखेड प्रत्येकी ६०, उमरी, धर्माबाद, पूर्णा प्रत्येकी ५०, भोकर, जळकोट प्रत्येकी ४०, देगलूर ३०, निलंगा, परभणी, बिलोली, अर्धापूर प्रत्येकी २०.

विदर्भ : काटोल १३०, नरेखडा ९०, सिरोंचा ७०, सिंदेवाही, साकोली प्रत्येकी ६०, आष्टी, एटापल्ली, गडचिरोली, जेवती, मूल, खरंघा प्रत्येकी ५०, आहेरी, वरूड, चिमूर, नागभिड, चामोर्शी प्रत्येकी ४०, मुलचेरा, आर्वी, नागपूर, कोर्ची, भामरागड, मोर्शी प्रत्येकी ३०. 
घाटमाथा : कोयना नवजा ३३०, कोयना पोफळी १९०, शिरगाव, दावडी, ताम्हणी प्रत्येकी १७०, आंबोणे १५०, डुंगरवाडी १००.
--
विदर्भात जोरदार पावसाची शक्यता
बंगालच्या उपसागरात ओडिशा, पश्चिम बंगालजवळ तीव्र कमी दाब क्षेत्र सक्रिय आहे. ओडिशासह पूर्व भारतातील राज्यात ढगांची दाटी झाली आहे. आज (ता. ८) कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार कायम राहणार आहे. विदर्भात जाेरदार पावसाचा, तर मराठवाड्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
 
'पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करावेत'

मुंबई  : राज्यात ज्या भागात पूर ओसरला आहे तेथे पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा आणि वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे. पिण्याच्या पाण्याच्या नळ जोडण्या पूर्ववत करण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत. दुर्गम भागात आदिवासी पाड्यांमध्ये तसेच पूरग्रस्तांसाठीच्या मदत छावण्यांमध्ये अन्नधान्य, पिण्याचे पाणी आदी सुविधा पुरविण्यात याव्यात. रेल्वे यंत्रणेला पाऊस आणि धरणांच्या विसर्गाबाबतची माहिती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पूरस्थितीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देशही प्रशासनाला दिले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पूरस्थिती, यंत्रणांमार्फत सुरू असलेले मदतकार्य याबाबत मुख्यमंत्र्यांनी बुधवारी (ता. ७) आढावा घेतला.या वेळी त्यांनी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.
 


इतर अॅग्रो विशेष
खरीप धान्योत्पादन १४४ दशलक्ष टनांवर नवी दिल्ली ः कोरोना पुणे मुंबई बातमी ...
ऊसतोड कामगार मंडळाची रचना, धोरण लवकरचः...मुंबई : ऊसतोड कामगारांचे विविध प्रश्न व समस्यांवर...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या...पुणे ः राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील...
‘पोकरा’मधून फळबाग, वनशेती, बांबू, तुती...औरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
पावसाळ्यापूर्वीच कापूस खरेदीचे नियोजन अमरावती : गेल्या हंगामात पावसामुळे कापसाचे नुकसान...
सुधारित शेती, पूरक व्यवसायाचा ‘निवजे...निवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) गावकऱ्यांनी शेती...
मॉन्सूनचा परतीचा प्रवास लांबला पुणे : देशभरात गेले तीन ते चार महिने समाधानकारक...
राज्यात पावसाचा जोर ओसरला पुणे : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. परंतु काही...
पपईला अतिपावसाचा फटका जळगाव ः अतिपावसात खानदेशात पपईचे पीक खराब झाले...
कृषी विधेयकांविरोधात आज ‘भारत बंद’ नगर/कोल्हापूर: केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन...
कपाशी सल्ला कपाशीच्या बोंडे सडण्याच्या समस्येवर उपाययोजना...
कोकण, खानदेशात पावसाचा धुमाकूळ पुणे ः कोकण आणि खानदेशला पावसाने झोडपून काढले....
हलका ते मध्यम पावसाची शक्यता पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्र व खानदेशात दोन...
कृषी विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यावरचंडीगड ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी...
नाशिकमध्ये खरीप कांदा लागवडी बुरशीजन्य...नाशिक: खरीप हंगामातील पोळ कांदा लागवडी पूर्ण...
कुलगुरू निवडीचे निकष ऐरणीवर पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये...
काजू बागायतदारांना गंडा घालणाऱ्या...सिंधुदुर्ग: काजू बागायतदारांना जादा दराचे आमिष...
सोयाबीन ठरेल ‘मॅजिकबीन’ नागपूर: देशात यावर्षी सोयाबीन खालील क्षेत्रात घट...
ऊस उत्पादक पट्ट्यात पेरूचा यशस्वी प्रयोगसांगली जिल्ह्यातील अंकलखोप (ता. पलूस) या ऊस...
झेंडू ठरलंय हमखास उत्पन्नाचे पीकशहरी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन मोह (ता.सिन्नर...