उत्तर भारतात पुराचे थैमान सुरूच

उत्तर भारतात पुराचे थैमान सुरूच
उत्तर भारतात पुराचे थैमान सुरूच

पाटणा, गुवाहाटी, वडोदरा: देशातील गुजरात, बिहार आणि आसाम या राज्यांमध्ये पूरस्थितीने जनजीवन विस्कळित झाले आहे. बिहार आणि आसाम या राज्यांमध्ये तर पुराची स्थिती बिकट झाली आहे. बिहारमध्ये १३ जिल्ह्यांमध्ये पुरामुळे १३० जणांचा मृत्यू झाला, तर आसाममध्ये ८६ जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमधील वडोदरा शहरालाही पुराच्या पाण्याने विळखा घातला आहे.  बिहार आणि आसाम राज्यांत मागील काही दिवासांपासून पूर स्थिती आहे. दोन्ही राज्यांत आत्तापर्यंत २१६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर लाखो लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. हजारो घरांचे नुकसान झाले असून, लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे. सध्या बिहारमध्ये पुरस्थिती कायम असून, नद्यांचा पूर कमी झालेला नाही. तर आसाम राज्यात नद्यांच्या पाणीपातळीत काही प्रमाणात घट होत असून, पुराची पातळी कमी होत आहे. आसाम राज्य सरकारने पूर बाधितांना घरांचे बांधकाम आणि इतर कामांसाठी निधी वितरित करण्याचे काम सुरू केले आहे.  वडोदरा येथे ५०० मिलिमीटर पाऊस  वडोदरा येथे जोरदार पावसामुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती आल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. राज्यात सर्वाधिक पाऊस वडोदरा या शहरात झाला. वडोदरामध्ये गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत तब्बल ५०० मिलिमीटर पाऊस झाला. या पावसामुळे शहरात सर्वत्र पाणी साचले. रस्ते आणि रेल्वे वाहतूक विस्कळित झाली. वडोदरा शहर आणि शेजराच्या अनेक खेड्यांमध्ये पाणी साचून पुरस्थिती निर्माण झाली. या भागातील जवळपास १००० लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. जोरदार पावसामुळे बुधवारपासून येथील हवाई वाहतूक बंद करण्यात आली आहे, तर अनेक रेल्वे गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. वडोदरा शहरातून वाहणारी विश्‍वमित्री नदीला पूर आल्याने सखल भागात नदीच्या पुराचे पाणी शिरले. आसाममध्ये ७०० गावांना तडाखा आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील २८ जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला होता. सध्या अनेक जिल्ह्यातील पूरस्थिती कमी झाली असून, आता १२ जिल्हे पुराच्या विळख्यात आहेत. धेमाजी, दरांग, बारपेटा, नलबारी, चिराग, गोपालपाडा, कामरूप, मोरीगाव, नागाव, गोपालघाट, जोरघाट आणि काचार या १२ जिल्ह्यांतील २६ महसूल मंडळांतील तब्बल ६९१ गावांना पुराचा वेढा कायम आहे. या गावांतील पाच लाख १८ हजार ६२३ लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. आसाम राज्यात पुरामुळे आतापर्यंत ८६ जणांचा बळी गेला आहे. बिहारमध्ये १३० जणांचा बळी शेजारील नेपाळमध्ये जोरदार पाऊस झाल्याने बिहारमध्ये जुलै महिन्यात पहिल्या आठवड्यातच पूरस्थिती निर्माण झाली होती. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बिहारमध्ये १३ जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला. या जिल्ह्यांतील १११ ब्लॉकमधील १२६९ ग्रामपंचायतींमधील जवळपास ८८.४६ लाख लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. राज्यातील सीतामढी आणि मधुराई या दोन जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. सीतामढी जिल्ह्यात ३७ तर मधुराईमध्ये ३० जणांचा बळी गेला आहे. दरम्यान काही भागांत पुराचे पाणी ओसरल्याने लोक आपल्या घरांकडे परत जात आहेत. त्यामुळे छावण्यांमधील लोकांची संख्या कमी होत आहे. एकट्या दरभंगा जिल्ह्यात १६.३३ लाख लोकांना पुराचा फटका बसला होता. यापैकी बहुतेक लोक आता घराकडे परतले आहेत. बागमती, बुऱ्ही, गंडक, अध्वारा आणि खिरोई या नद्या अद्यापही धोक्‍याच्या पातळीच्या वर वाहत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com