कोल्हापुरात पूरस्थिती बिकटच

पुराचे पाणी शासकीय कार्यालयात शिरले
पुराचे पाणी शासकीय कार्यालयात शिरले

कोल्हापूर  : जिल्ह्यातील नागरिकांची पुराशी असणारी झुंज बुधवारी (ता. ७)देखील सुरूच होती. कोल्हापूर शहराबरोबर जिल्ह्याची अवस्था भयंकर झाली आहे. पंचगंगा वगळता अन्य नद्यांच्या पाणीपातळीत द्रुतगतीने वाढ होत असल्याने ग्रामीण भाग हादरून गेला आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बुधवारी सकाळी नौसेनेच्या दोन विमानांतून एका बोटीसह २२ जणांचे पथक, तसेच गोवा कोस्टगार्ड एक हेलिकॉप्टर आणि बोटीसह दाखल झाले. सकाळपासूनच एनडीआरएफ आणि लष्कराने बोटीद्वारे कोल्हापूर शहर, शिरोळ, चिखली आदी भागांतील पूरग्रस्तांना मदत देण्यास सुरवात केली आहे.

बुधवारी पहाटेपासूनच प्रयाग चिखलीकडे चार बोटींसह पथक रवाना झाले, तर शहरासाठी दोन बोटींसह मदत देण्यास सुरवात झाली. सकाळी नौसेनेच्या दोन विमानांमधून एका बोटीसह २२ जणांचे पथक शहरात दाखल झाले. त्याचबरोबर गोवा कोस्टगार्डचे एक हेलिकॉप्टर एका बोटीसह दाखल झाले आहे. नौसेनेने गुरुवारी पुन्हा १४ बोटी देण्याचे मान्य केले आहे. प्राधान्याने प्रयाग-चिखलीकडे मदत पाठविली जात असून, आवश्यक त्या ठिकाणी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून एअरलिफ्टिंग सुरू करण्यात येणार आहे.

जिल्ह्यामध्ये पूर्णत: आणि अंशत: पूरबाधित अशा २०४ गावांचा समावेश आहे. मंगळवारअखेर या गावांमधून ११ हजार ४३२ कुटुंबांमधील ५१ हजार ७८५ व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. महावितरणच्या कोल्हापूर शहरातील सर्वांत उंचावर असलेल्या ३३ केव्ही बापट कॅम्प वीज उपकेंद्रात पुराचे पाणी घुसल्याने संपूर्ण वीज वितरण ठप्प झाले आहे. महावितरणचे मुख्य अभियंता अनिल भोसले यांनी पुरस्थितीतील वीज वितरण यंत्रणेचा आढावा घेतला. अगदी कर्मचाऱ्यांच्या वसाहतीतसुद्धा पाणी शिरले असून, त्यांनी निवासस्थाने रिकामे केली आहेत.

रुकडी जवळच्या रेल्वे रुळावर पाणी आले आहे. राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद झाल्याने कोल्हापूर वासीयांना दिलासा मिळाला. बुधवारी दुपारी २ वाजता पंचगंगेची पातळी एक इंचाने कमी झाली. शिरोळ तालुक्यात मात्र पाणी वाढतच असल्याने घबराट आहे. जिल्ह्यातील सुमारे ५० टक्के शेतीशिवारे पाण्याखाली गेली आहेत. अनपेक्षित पाणी वाढल्याने पिकांचे मोठे क्षेत्र पुरात बुडाले आहे. ऊस व भाताचे मिळून एक लाख हेक्टरहून अधिक क्षेत्र पाण्याखाली गेले आहे. नेमके नुकसान काही दिवसांनी लक्षात येणार असले तरी, शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा तोटा होणार आहे. 

‘गोकुळ’च्या दुधाचे मोफत वाटप जिल्ह्यातील वाढती पूरस्थिती पाहता गोकुळने आज सकाळपर्यंत (ता. ८)  दूध संकलन करू नका, अशा सूचना दूध संस्थांना दिल्या आहेत. पुण्या-मुंबईकडे जाणाऱ्या एकवीस टँकरमधील साडेपाच लाखांहून अधिक लिटर दूध शिल्लक आहे. यातील पाच लाख दुधाचे रि-प्रोसेसिंग करून त्याचे वाटप केले जाणार आहे. बुधवारी सकाळी अर्धा लिटरच्या पॅकिंगमधून ३०० लिटर दूध आंबेवाडी, चिखली येथे मोफत देण्यात आले. उर्वरित दूधही आवश्यकतेनुसार मोफत दिले जाणार असल्याचे ‘गोकुळ’कडून सांगण्यात आले आहे.

गंभीर पूरपरिस्थितीत जिल्ह्याला पुरेल इतका दूधसाठा ‘गोकुळ’कडे आहे. मात्र गुरुवारी संध्याकाळपर्यंत पुणे, मुंबईकडे दूध वाहतूक होणार नाही. त्यामुळे या शहरांना दूधटंचाईचा सामना करावा लागणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com