आज महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीतील समस्या वाढत आहेत.
अॅग्रो विशेष
पुण्यातील फूल बाजाराच्या कामाला गती
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने नव्याने बांधण्यात येणाऱ्या सुमारे ३ लाख चौरस फुटांच्या अत्याधुनिक बहुमजली फुल बाजाराला गती आली आहे.
पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने नव्याने बांधण्यात येणाऱ्या सुमारे ३ लाख चौरस फुटांच्या अत्याधुनिक बहुमजली फुल बाजाराला गती आली आहे. विविध कारणांनी रेंगाळलेला फुल बाजार दिड वर्षात पुर्णत्वास नेण्यासाठी गती देण्यात आली आहे. ११० कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या इमारतीमध्ये सुमारे ४०० फुल व्यापारी व्यापार करु शकतील. तर काही मजले व्यावसायीक करण्यात येणार आहेत. यामध्ये बॅंका आणि वित्तीय संस्थांचा समावेश असणार आहे, अशी माहिती बाजार समिती प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली.
२०१६ मध्ये तत्कालीन प्रशासकीय मंडळाने फुल बाजाराचे भुमिपूजन केले. मुळ ५४ कोटी रुपयांचा आराखडा असलेल्या आराखड्यामध्ये टप्प्याटप्याने आणि व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार बदल करण्यात आले. मुळ ७ मजली असलेला फुल बाजार आता ९ मजली होणार आहे. वाढीव २ मजल्यांना पणन संचालकांची मान्यता घेण्यात आली असून, वाढीव मजल्यांच्या बांधकामाच्या परवानगीचा प्रस्ताव महानगरपालिकेकडे पाठविण्यात आला असून, कोव्हिड मुळे प्रस्ताव प्रलंबित आहे, असे गरड यांनी यावेळी सांगितले.
नियमबाह्य खोदाई प्रकरणी दंड ६८ लाखांवर
इमारतीच्या पायासाठी परवानगीपेक्षा जास्त खोदाई प्रकरणी महसूल विभागाच्या गौण खनिज विभागाने बाजार समितीला सुमारे पावणे दोन कोटींचा दंड ठोठावला होता. यावर सुनावणी होऊन हा दंड आता ६८ लाखांवर आला असून, हा देखील दंड माफ करावा, अशी याचीका दाखल केली आहे. गौण खनिजाची विक्री केलेली नसून, इमारतीच्या बांधकामासाठीच वापरली असल्याने हा दंड देखील माफ करावा, अशी बाजार समितीने विनंती महसूल विभागाला केली आहे, असे गरड यांनी सांगितले.
प्रसंगी गाळ्यांचे लिलाव करणार
बाजार समितीने फुल बाजारासाठी केलेली गुंतवणुक हि सुमारे ११० कोटींची आहे. फुल बाजारातुन सेसद्वारे मिळणारे वार्षिक उत्पन्न हे दिड कोटींचे आहे. या उत्पन्नाद्वारे ११० कोटी वसुल होण्यास मोठा कालावधी लागेल. या गुंतवणुकीचा परतावा लवकरात लवकर मिळावा यासाठी गाळ्यांचे लिलाव करुन स्पर्धात्मक दराने जास्तीत जास्त उत्पन्न मिळविण्याचा बाजार समितीचा प्रयत्न आहे, असे गरड यांनी सांगितले.
असा असणार फुल बाजार
- प्रत्येकी २५ हजार चौरस फुटांचे ३ पार्किग मजल्यांसह ६ मजले
- लुज आणि कट फ्लॉवरसाठी स्वतंत्र मजले
- सात भव्य लिफ्ट
- तीन हजार चौरस फुटांची तीन शितगृहे
- लिफ्ट आणि शितगृहे सौर उर्जेवर संचलित असणार
- निर्याती आणि लिलावासाठी ऑनलाईन लिलाव हॉल
- 1 of 673
- ››