पावसाने फुले झाली मातीमोल

दसरा, दिवाळीला विक्रीसाठी येतील अशा पद्धतीने दरवर्षी शेतकरी मोठ्या प्रमाणात फुलांचे उत्पादन घेतात. यंदाही फुलाचे क्षेत्र अधिक होते. दसऱ्याला बऱ्यापैकी दरही मिळाला. मात्र गेल्या आठ दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसाने फुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे मागणी नाही आणि दरही नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी फुले फेकून दिली. खूप मोठे नुकसान झाले. - संतोष सुंबे, शेतकरी, पाडळी तर्फे, ता. पारनेर, जि. नगर
झेंडू फुले
झेंडू फुले

नगर ः दसरा, दिवाळी फूल उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आधार देऊन जाते. यंदा मात्र गेल्या आठ दिवसांपासून पडत असलेल्या सततच्या पावसाने फुले अक्षरशः मातीमोल झाली आहेत. फुलांना दसऱ्यात मिळालेल्या दराच्या तुलनेत आता (दिवाळी) निम्‍माही दर मिळत नाही. झेंडूला तर चक्क एक रुपया ते पाच रुपये दर मिळत आहे. त्यामुळे बाजारात नेऊनही फुले फेकूनच द्यावी लागणार असल्याचे गृहीत धरून अनेक शेतकऱ्यांनी जागीच फुले फेकून दिली. बाजार समितीच्या आवारातही फेकलेल्या फुलांचा अक्षरशः चिखल पाहायला मिळाला. फुलबाजार कोसळल्याचा शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे.  नगर जिल्ह्यातील नगर, पारनेर, अकोले, कोपरगाव यासह शेजारी सोलापूर, पुणे जिल्ह्यामध्ये फुलांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. साधारण दसरा, दिवाळीच्या काळात फुले विक्रीला येतील अशा पद्धतीने फुलांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. दसरा, दिवाळीच्या काळात दरवर्षी नगर बाजार समितीत दररोज साधारण पाच ते सहा दिवस सुमारे ४० ते पन्नास टनांची आवक होत असते. त्याचपद्धतीने यंदाही लोकांनी लागवड केलेली आहे. मात्र नगरसह राज्याच्या अनेक भागांत जोरदार पाऊस पडत असल्याने फुलांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे फुले भिजल्याने ते टिकण्याची क्षमता कमी झाली असून काळी पडली आहेत. पाण्याने भिजल्यामुळे फुलांना दर्जा राहिला नसल्याने दरातही मोठी घसरण झाल्याने दरवर्षी चांगला आधार देणारी फुले मातीमोल झाल्याचे पाहायला मिळाले. विक्रीसाठी आणलेली फुले खराब झाल्याने विकली नसल्यामुळे ते फेकून दिली. त्याचा अक्षरशः चिखल झाल्याचे नगर बाजार समितीत पाहायला मिळाले. पावसाचा सर्वाधिक फटका झेंडूला बसला. बाजारात जाऊनही फुले फेकून द्यावे लागत असल्याचे पाहून अनेक शेतकऱ्यांनी जागेवरच फुले टाकून दिली. पावसामुळे दर पडल्याने आणि फुले वाया गेल्याने फूल उत्पादक शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला.  फुलांचे ठोक दर (कंसात दसऱ्याला मिळालेले दर)  झेंडू    १ ते ५ (२० ते ४०)  अष्टर    २० ते २५ (८० ते १००)  शेवंती    ५० ते ७० (१३० ते १६०)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com