नवरात्रोत्सवात पुणे बाजारसमितीत फुलांची १२ कोटींची उलाढाल

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः नवरात्र आणि दसऱ्याला पुणे बाजार समितीत शेवंती आणि झेंडू या फुलांना विशेष मागणी राहिली. नवरात्रातील १० दिवसांमध्ये शेवंतीला सरासरी १०० रुपये, झेंडूला ३० रुपये आणि गुलछडीला २२० रुपये दर प्रतिकिलो असा मिळाला. या कालावधीत बाजारातील विविध फुलांची एकूण उलाढाल सुमारे १२ कोटी रुपये झाल्याची माहिती फूल विभाग प्रमुख प्रदीप काळे यांनी दिली.

गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळीत विशेष मागणी असते. या सणांचे नियोजन करून शेतकरी फुलांची लागवड करत असतात. यंदा पश्‍चिम महाराष्‍ट्रातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे फुलांचे उत्पादन घटले होते. परिणामी, पश्‍चिम महाराष्ट्रातून सुमारे २५ टक्क्यांपर्यंत आवक घटली होती. मराठवाड्यातून झेंडूची मोठ्या प्रमाणावर आवक झाली होती. झेंडूला सरासरी ५० रुपये दर शेतकऱ्यांना अपेक्षित होता. मात्र, मोठ्या प्रमाणावरील आवकेमुळे सरासरी ३० रुपये दर मिळाला. शेवंतीला सरासरी १०० रुपये दर मिळाल्याचे काळे यांनी सांगितले. 

दसऱ्यानंतर रखडलेला माल सध्या सुरू असून, मागणी कमी असल्याने अपेक्षित दर मिळत नसल्याचे चित्र आहे. दिवाळीत मागणी वाढल्यानंतर पुन्हा दर वाढतील. झेंडूची आवक मुबलक राहण्याचा अंदाज असून दर ३० रुपयांपर्यंत तर शेवंतीला १०० रुपयांपर्यंत दर राहतील असा अंदाज आहे. मात्र, परतीच्या पावसाचा धोका असून पाऊस जर झाला नाही तर आवक चांगली राहील, अशी माहिती फूल बाजार संघटनेचे अध्यक्ष अरुण वीर यांनी दिली. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील रामभाऊ सुर्यवंशी (बंगळवाडी, ता. परांडा) म्हणाले, की माझी सव्वा एकर झेंडूची लागवड आहे. नवरात्र आणि दसऱ्याला पुणे बाजार समितीमध्ये ३० रुपये दर मिळाला. हा दर दिवाळीत ४० रुपये मिळाला तरच पुण्यात फुले आणणे परवडणार आहे. परांडा ते पुणे वाहतूक खर्च एका किलोला ५ रुपये पडतो. एका पिकअप गाडीत १२५ क्रेट माल बसतो. गाडीचे भाडे साडेपाच हजार एवढे असते. तर काढणी खर्च एका किलोला २ रुपये पडतो. त्यामुळे ४०-५० रुपये दर मिळाला तरच परवडेल. 

मी गणपती, दसरा, दिवाळी आणि मार्गशीर्ष महिन्याचे नियोजन करून तीन एकरवर तीन टप्प्यात विविध वाणांची लागवड केली आहे गणपतीमध्ये मला १८० ते २०० पर्यंत दर मिळाला. नवरात्रात ७० ते ८० रुपये दर मिळाला. दिवाळीत हाच दर मिळण्याचा अंदाज आहे, असे यवत (जि. पुणे) येथील शेतकरी विनायक शितोळे यांनी सांगितले. 

आवकेपेक्षा निम्म्याच फुलांची नोंद  दसऱ्याच्या दोन दिवसांपासून विशेषतः झेंडू आणि शेवंतीची आवक होत होती. झेंडूच्या मोठ्याप्रमाणावर झालेल्या आवकेमुळे फूल बाजार आवारातील जागा कमी पडली. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समिती बाहेरच फुलांची विक्री केली. यामुळे बाजार आवारात झालेल्याच फुलांची नोंद बाजार समितीकडे झाली. नोंदीपेक्षा दुप्पट आवक झाल्याचे निरीक्षण शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी नोंदविले. बाजार समितीच्या नोंदीनुसार झेंडूची ३४२ टन आवक झाली होती. मात्र प्रत्यक्षात ही आवक ८०० ते १ हजार टन झाल्याचा अंदाज व्यापाऱ्याचा आहे.  

नवरात्रात विविध फुलांना मिळालेला दर खालीलप्रमाणे 
फुलांचा प्रकार सरासरी दर (किलो)
शेवंती पांढरी १००
शेवंती पिवळी  १२०
झेंडू ३०
तुळजापुरी   ८० 
गुलछडी  २२० 
लिली  ३२० 
बिजली १०० 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com