यवतमाळमध्ये पाण्याचे पाचशे स्रोत ‘फ्लोराईड’मिश्रित

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

यवतमाळ  : जिल्ह्यातील फ्लोराईडमिश्रित जलस्रोतांच्या संख्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे. २०१७-१८ मध्ये मॉन्सूनपूर्व केलेल्या रासायनिक तपासणीत ही बाब उघड झाली आहे. पूर्वीच्या तुलनेत तपासणीत १५० स्रोतांची भर पडल्याने प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली आहे.

जिल्ह्यातील अनेक गावांत फ्लोराईडयुक्त जलस्रोत मोठ्या प्रमाणात आहेत. त्यात सर्वाधिक स्रोत पांढरकवडा, झरी, मारेगाव, पांढरकवडा, महागाव, उमरखेड व राळेगाव तालुक्‍यांतील काही भागांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्ह्यात मार्च ते एप्रिल मॉन्सूनपूर्व रासायनिक तपासणी करण्यात आली.

यंदा मोबाईल ॲपद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. परिणामी, साडेसात हजारांवर पाण्याचे नमुने घेण्यात आलेत. पूर्वी साडेपाच हजारांच्या जवळपास नमुने तपासले जात होते. त्यात ३५० नमुन्यांत फ्लोराईड आढळून आले. त्यानंतर ऑक्‍टोबर ते डिसेंबरदरम्यान जिल्ह्यातील साडेआठ हजार पाणी नमुने घेण्यात आलेले आहेत. त्यांची प्रयोगशाळेत तपासणी सुरू आहे. या वेळी नमुने वाढल्याने फ्लोराईडयुक्त जलस्रोत्रांचे नमुनेही वाढले आहेत.  

३७ रुग्णांवर उपचार फ्लोराईडयुक्त जलस्रोत असलेल्या घाटंजी तालुक्‍यातील खैरगाव येथील ३७ रुग्णांना सावंगी मेघे येथील विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे. फ्लोराईडमुळे त्यांना हाडांचे आजार जडले आहेत. दात व हाडे ठिसूळ होणे आदींचा त्रास त्यांना जाणवत आहे.

निंगनूर सर्कलमध्ये ३५ रुग्ण आरोग्य विभागाने जिल्ह्यात सर्वेक्षण केले. त्यात उमरखेड तालुक्‍यातील निंगनूर सर्कलमधील अनेक गावांत रुग्ण आढळून आलेत. विशेष म्हणजे, गमापूर गावातील रामकिशन जाधव यांचा किडनीच्या आजाराने मृत्यू झाला. त्यानंतर केलेल्या तपासणी सर्कलमध्ये ३५ रुग्ण समोर आलेले आहेत.

आर्णी, वणी व घाटंजी या तालुक्‍यांत फ्लोराईडमिश्रिम पाण्याची मोठी समस्या आहे. पाण्यामुळे नागरिकांना हाडांचे, दातांचे विविध आजार होत आहेत. नागरिकांना शुद्धपाणी मिळावे, यासाठी फिल्टर प्लांट आवश्‍यक आहे. काही ठिकाणी ते बसविले असले, तरी देखभाल व्यवस्थित होत नसल्याचे निर्दशनास आले आहे. याबाबत पालकमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. आज आमच्याकडे ३७ रुग्ण दाखल झाले आहेत. - डॉ. अभ्युदय मेघे, सीईओ, विनोबा भावे ग्रामीण वैद्यकीय रुग्णालय, सावंगी मेघे.

ज्या गावांमध्ये दूषित पाण्याचे स्रोत आहेत, त्या गावांत शुद्ध पाण्यासाठी आर. ओ. एटीएम युद्धपातळीवर बसविण्यात येणार आहेत. पांढरकवडा तालुक्‍यातील खैरगाव (बुद्रुक) येथील काही लोकांना किडनीचे आजार झालेत. त्यामुळे त्या ठिकाणी शासनाने तातडीने शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. शासन सर्व गावांना शुद्ध पाणी पुरविण्यास कटिबद्ध आहे. - किशोर तिवारी, अध्यक्ष, शेतकरी स्वावलंबन समिती, राज्य सरकार.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com