सांगली जिल्ह्यात शेळ्या-मेंढ्यांसाठी चारा छावणी सुरू होईना

ओला चाऱ्याचा दर चार हजार रुपये आहे. पण २० ते ३० किलोमीटर अंतरावरून चारा विकत आणवा लागत आहे. शासनाने शेळ्या - मेंढ्यासाठी वेगळी चारा छावणी सुरू करण्याचे आदेश दिले. पण जिल्ह्यात छावणी सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाऊल उचलले नाही. त्यामुळे तातडीने शेळ्या - मेंढ्यांसाठी छावणी सुरू करावी. - चंद्रकांत पावणे, विभूतवाडी, जि. सांगली.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सांगली   ः जत तालुक्‍यासह आटपाडी, खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ या तालुक्यांत सुमारे ६ लाख ३१ हजार ७९८ शेळ्या-मेंढ्या आहेत. मेंढीपालन हा येथील प्रमुख व्यवसाय आहे. परंतु चारा उपलब्ध नसल्याने शेळ्या-मेंढ्यांसाठी वेगळी चारा छावणी सुरू करा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार शासनाने शेळ्या-मेंढ्यांसाठी चारा छावणी सुरू करण्याचे आदेश दिले. मात्र, जिल्हा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. 

जिल्ह्यात शेळ्या-मेंढ्यांसाठी चारा छावणी सुरू करण्याकरिता जिल्हा प्रशासनाने ठोस पावले उचलली नसल्याने एकही छावणी अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे चारा छावणी कधी सुरू होणार, असा प्रश्न मेंढपाळ उपस्थित करू लागले आहेत.  जिल्ह्यात जत, आटपाडी, खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ या तालुक्यांत प्रामुख्याने शेळी-मेंढी पालन व्यवसाय केला जातो. वर्षभरात पाऊस झालेला नाही. रब्बी आणि खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे चाऱ्याचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. मोठ्या प्रमाणात चालणारा हा व्यवसाय हळूहळू कमी होऊ लागला आहे. त्यामुळे शेळ्या-मेंढ्यांसाठी वेगळी चारा छावणी सुरू करण्याची मागणी वारंवार करण्यात येत होती.

काही दिवसांपूर्वी शासनाने शेळ्या-मेंढ्यांसाठी वेगळी चारा छावणी सुरू करा, असे आदेश दिले. आता शेळ्या-मेंढ्यांच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने मेंढपाळ निश्चिंत होते. परंतु शासनाच्या आदेशाकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने एकही चारा छावणी सुरू झालेली नाही. त्यामुळे मेंढ्यांची विक्री करून प्रपंच चालवण्याची वेळ मेंढपाळांवर आली आहे. गाव, परिसरात कामे नाहीत. छावण्या सुरू करा, असे सांगून देखील जिल्हा प्रशासनाने कोणत्याही हालचाली सुरू केलेल्या नाहीत.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com