शेळ्या-मेढ्या
शेळ्या-मेढ्या

शेळ्या-मेंढ्यांसाठीही आता चारा छावण्या : मंत्रिमंडळ निर्णय

मुंबई: राज्यातील दुष्काळी भागात सुरू असलेल्या चारा छावण्यांमधील जनावरांसाठी टॅंकरद्वारे पाणी देण्याचा तसेच प्रथमच शेळ्या-मेंढ्यांसाठी छावणी सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. चारा छावण्यांची बिले देण्यास विलंब करू नये, चारा छावण्यांच्या ठिकाणी तात्पुरते स्वच्छतागृहे सुरू करण्याचे निर्देश दिल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.  यासंदर्भात माहिती देताना मंत्री पाटील म्हणाले की, राज्यात सध्या ६२०९ टॅंकर्सच्या माध्यमातून ४९२० गावे आणि १० हजार ५०६ पाड्यांवर पाणीपुरवठा केला जात आहे.  छावण्यांमधील जनावरांच्या सोयीसाठी शासनामार्फत टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. जनावरांच्या देखरेखीसाठी शेतकरी तसेच त्यांच्या कुटुंबातील महिला मोठ्या प्रमाणावर छावण्यांमध्ये उपस्थित असतात. अशावेळी महिलांसाठी त्याठिकाणी तात्पुरती स्वच्छता गृहे उभारावीत, अशा सूचना प्रशासनाला करण्यात आल्या आहेत. चारा छावण्यांचे बिले जिल्हा प्रशासनाने तांत्रिक बाबी तपासून तातडीने अदा करावेत. त्यात विलंब करू नये. ज्यांना शेतीच्या कामासाठी बैल दिवसभरासाठी न्यायचा आहे, त्यांना ते घेऊन जाण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. राज्यात लहान व मोठ्या जनावरांसाठी छावण्या आहेत, मात्र शेळ्या-मेंढ्यांसाठी राज्यात प्रथमच छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. मंत्रालयात दुष्काळावरील उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. या वेळी वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पदुम मंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, विविध विभागांचे अपर मुख्य, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते. नुकसान भरपाईपोटी २२ ०० कोटींचे वाटप राज्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याच्या नुकसान भरपाईपोटी आतापर्यंत ३४ लाख शेतकऱ्यांना २,२०० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहेत. तसेच राज्यात नाशिक, पुणे, औरंगाबाद विभागात एकूण १५०१ चारा छावण्या सुरू आहेत. त्यामध्ये सुमारे १० लाख ४ हजार ६८४ जनावरे आहेत. आतापर्यंत चारा छावण्यांसाठी औरंगाबाद विभागीय आयुक्तांना १११ कोटी, पुणे चार आणि नाशिक विभागीय आयुक्तांना ४७ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे, अशी माहिती मंत्री पाटील यांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com