छावणीचालकांचा दंड रद्द करण्याची मागणी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  : पशुसेवेत कुचराई करणाऱ्या छावणीचालकांना नुकताच जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशाने दंड करण्यात आला. दंड करण्यात आलेली कारवाई त्वरित मागे घ्यावी; अन्यथा सोमवारपासून नगर तालुक्‍यातील चारा छावण्या चालवणे बंद करु, असा इशारा छावणीचालकांतर्फे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला. तालुक्यातील पदाधिकाऱ्यांसह ४५ छावणीचालक या वेळी उपस्थित होते.

आमदार कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. निवेदनात म्हटले, की छावणीचालक काही वाळूतस्कर नव्हेत, तरीही त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायकारक कारवाईमुळे तालुक्‍यातील छावणीचालकांची छावणी चालविण्याची मानसिकता संपली आहे. चारा छावण्या तपासणीसाठी अधिकारी सातत्याने येऊन तीच ती माहिती पुन्हा मागतात. त्यामुळे संबंधितांना इतर कामे करण्यास वेळच मिळत नाही. चारा, पाणी, पशुखाद्य, विजेची व्यवस्था आदी सुविधांपेक्षा दैनंदिन अहवालातील आकडेवारी व चारा छावणीतील पशुधनाची तफावत याबाबतची चौकशी केली जाते. पशुधनाला टॅगिंग करण्याची जबाबदारी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची असताना संबंधित संस्थाचालकाला याबाबत दोषी धरले जाते. आवक रजिस्टरवरील क्रमांक व चारावाटप कार्डावरील क्रमांक यामध्ये नजरचुकीने काही त्रुटी राहिल्या, तरी दंडात्मक कारवाई केली जाते. महावितरणकडे वीजजोडणीसाठी अर्ज करूनही जोडणी दिली जात नाही. याबाबतही छावणीचालकाला दोषी ठरवले जाते.

सर्व नोंदी व्यवस्थित असल्या, तरी तपासणी पथकातील सदस्य चुकीचा शेरा मारत छावणीचालकाला दोषी धरतात. अग्निप्रतिबंधक व्यवस्था करूनही छावणीचालकाला दोषी धरले जाते, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. दैनंदिन आकडेवारीपेक्षा जास्त जनावरे आढळली, तर त्यास तपासणी पथकाने आक्षेप घेऊ नये. पुढील काळात छावणी सुरू झाल्यानंतर आवश्‍यक सुविधा व कार्यवाही यासाठी किमान आठ दिवसांचा कालावधी द्यावा. भविष्यात तपासणी पथकाने केलेल्या अहवालाची प्रत छावणीचालकांना द्यावी. छावणीचालकांवर केलेली दंडात्मक कारवाई त्वरित मागे घ्यावी, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

इतर कुठल्याही कारणास्तव दंड केल्यास १५ एप्रिलपासून सर्व छावणीचालक छावण्या चालवणे बंद करतील. दरम्यान, जिल्हा प्रशासनासाठी दंडात्मक कारवाई महत्त्वाची नसून शेतकऱ्यांचे पशुधन महत्त्वाचे आहे. छावणी चालकांना तपासणी पथकाच्या अहवालाची प्रत दिली जाऊन, ४८ तासांची मुदत खुलासा व पूर्ततेसाठी दिली जाईल, असे आश्‍वासन जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी यावेळी दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com