पुणे जिल्ह्यात सहा चारा छावण्या मंजूर

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सुपे, जि. पुणे  ः चारा आणि पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जिल्ह्यात सहा चारा छावण्यांना सरकारने मंजुरी दिली आहे. बारामती तालुक्‍यात चार, तर शिरूर तालुक्‍यात दोन छावण्या असतील, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी अमिता तळेकर यांनी दिली. 

बारामती तालुक्‍यातील सुपे, सोमेश्वरनगर, पळशी व उंडवडी सुपे या ठिकाणी, तर शिरूर तालुक्‍यातील केंदूर व कान्हूर मेसाई या गावांत येत्या चार-पाच दिवसांत छावण्या सुरू होतील. या तालुक्‍यातून आलेल्या मागणीला जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी लागलीच मंजुरी दिल्याचे गायकवाड यांनी सांगितले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत चाराटंचाई जाणवणार नाही, अशी स्थिती असल्याचे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, आवश्‍यक ठिकाणी छावणीच्या आलेल्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील दौंड व खेड तालुक्‍यांतून छावणीची मागणी येऊ शकेल, असा अंदाज या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी व पशुधन विभागाच्या अधिकाऱ्यांनी छावणी सुरू करण्याविषयी केलेल्या शिफारशीनुसार छावण्यांना मंजुरी दिली जाते. एका छावणीत सुमारे तीन हजारांपर्यंत जनावरे ठेवता येणार आहेत. गेल्या चार-पाच महिन्यांपासून बारामती तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यात पाणी व चाराटंचाई जाणवू लागली. अनेक शेतकऱ्यांनी पाणी टंचाईमुळे जनावरे विकली आहेत. पाण्यासाठी टॅंकर सुरू होते. त्यातून मिळणाऱ्या पाण्यात जनावरांचे भागत नव्हते, त्यामुळे जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com