नगर जिल्ह्यातील दहा तालुक्यांमधील चारा संपला

नगर जिल्ह्यातील दहा तालुक्यांमधील चारा संपला
नगर जिल्ह्यातील दहा तालुक्यांमधील चारा संपला

सूर्यकांत नेटके  नगर : जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस गंभीर होत आहे. जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न तीव्र होत आहे. सद्यपरिस्थितीत जिल्ह्यामधील १४ पैकी दहा तालुक्यांमधला चारा संपल्याने आसपासच्या जिल्ह्यांमधून चाऱ्याची आवक करण्यास सुरवात झाली आहे. उन्हाळ्याचे जवळपास अडीच महिने शिल्लक असल्याने यंदा आता यापुढच्या दिवसांत चारा छावण्यांवरच जनावरे जगविण्याची मदार आहेत. चारा छावण्यांची संख्या यापूर्वीचे सगळे रेकॉर्ड तोडण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तविली जात आहे.  नगर जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळ गंभीर आहे. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न वरचेवर गंभी होत आहे. जिल्ह्याला जोडून असलेल्या औरंगाबाद, नाशिक, बीड, सोलापुर, पुणे जिल्ह्यांमध्येही फारशी वेगळी परिस्थिती नाही. त्यामुळे सध्या बहुतांश भागात चारा छावण्यावरच जनावरे जगवण्याची भिस्त आहे. यापूर्वी २०१६ मध्ये जिल्ह्यात सर्वाधिक चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. यंदा राज्य सरकारने उशिरा परवानगी दिल्याने चारा छावण्यांची उशिराच सुरू झाल्या आहेत. जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार अकोले, कोपरगाव, नगर, पारनेर, कर्जत, जामखेड, पाथर्डी, श्रीगोंदा, श्रीरामपूर, शेवगाव या दहा तालुक्‍यांतील जनावरांचा चारा आता पूर्णपणे संपला आहे.  जसे जसे उन्हाळ्याची तीव्रता वाढत जात आहे, तशी तशी चाराटंचाई उग्र रूप धारण करत आहेत. शेतकऱ्यांनी चाऱ्याच्या शोधासाठी स्थलांतर सुरू केले आहे. काहींना यश येऊ लागले आहे. चाऱ्या अभावी शेतकऱ्यांचे पशुधन धोक्‍यात आले आहे. अनेक तालुक्यांमध्ये चारा छावण्यांचाच शेतकरी, पशुपालकांना आधार ठरला आहे. जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात ७१ हजार ४७३ मेट्रिक टन चारा आहे. तो २२ मेपर्यंत पुरेल. राहाता तालुक्यात ७ हजार ४४३ मेट्रिक टन चारा असून, तो ३ एप्रिलपर्यंत पुरेल. राहुरी तालुक्यात सर्वाधिक असा २ लाख ३३ हजार ८५९ मेट्रिक टन चारा उपलब्ध असून, एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत हा चारा पुरेल. तर नेवासा तालुक्यात २ लाख २७ हजार ३८६ मेट्रिक टन चारा असून तो मार्च अखेरपर्यंत पुरेल. ही शासकीय आकडेवारी पहिली असता चारपैकी तीन तालुक्यांतील चारा पुढील महिन्यात संपणार असून, या चार तालुक्यांतही चारा छावण्यांची संख्या वाढणार आहे. जिल्ह्यात सध्या २७६ चारा छावण्या सरकारी अनुदानावर सुरू आहेत. त्यात सर्वाधिक ६४ चारा छावण्या पाथर्डी तालुक्यात असून, त्याखालोखाल ५५ छावण्या कर्जत तालुक्यात सुरू झाल्या आहेत. जामखेड तालुक्यात ३९, श्रीगोंदा तालुक्यात ४०, शेवगाव तालुक्यात ३१, नगर तालुक्यात २७, पारनेर तालुक्यात २० छावण्या सुरू आहेत. यंदा जिल्ह्यामध्ये उपलब्ध असलेलया चारा पाहता छावण्याची संख्या अतापर्यंतचा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त होत आहे. सध्या काही तालुक्यांत शेजारच्या जिल्ह्यांमधून चारा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.   जिल्ह्याची स्थिती 

  • लहान जनावरे ः २ लाख ७४ हजार २१५
  • मोठी जनावरे ः १३ लाख ६६ हजार ७०३
  • एकूण जनावरे ः १६ लाख ४० हजार ९१८
  • दर दिवसाला चाऱ्याची गरज (टनांत) ः ८ हजार ३३८
  • दर महिन्याला ः २ लाख ५० हजार १५७
  • उपलब्ध चारा ः ५ लाख ५९ हजार ६८७
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com