पाणीटंचाईमुळे पुणे विभागात चारापिकांचे क्षेत्र घटले

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे   ः  गेल्या महिन्यापासून पुणे विभागात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. यामुळे रब्बी हंगामात चारापिकांच्या लागवड क्षेत्रात चांगलीच घट झाली आहे. रब्बी हंगामात पुणे विभागातील नगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यात अवघ्या ४९ हजार ३५० हेक्टरवर चारापिकांची लागवड झाली आहे. परिणामी चारा उत्पादनात घट होऊन आगामी काळात चाराटंचाई निर्माण होईल, अशी शक्यता असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तर नगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले तालुक्यात यंदा बऱ्यापैकी पाऊस झाला.उर्वरित भागात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिले. त्यामुळे खरीप हंगामात चारापिकांच्या क्षेत्रात चांगलीच घट झाली होती. या भागातील शेतकऱ्यांना परतीच्या पावसाची अपेक्षा होती. परंतु, परतीच्या पावसानेही हुलकावणी दिली. यामुळे भागातील शेतकऱ्यांना आॅक्टोबरपासूनच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सध्या विहिरींमधील पाणीपातळीही घटली आहे. नगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील बहुतांशी गावे व वाड्या वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

पुणे विभागातील बहुतांशी शेतकरी पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करत आहे. त्यामुळे जनावरांसाठी चाऱ्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. त्यासाठी अनेक शेतकरी चारा उपलब्धतेसाठी मका, ज्वारी (कडवळ), बाजरी, लुसर्नग्रास, नेपिअर अशा चारापिकांची पेरणी करतात. यंदा आॅक्टोबरपासूनच सुरू झालेल्या पाणीटंचाईमुळे रब्बी हंगामात मका, ज्वारी, बाजरी, लुसर्नग्रास, नेपिअर या चारापिकांची लागवड झाली असली तरी त्यांचे क्षेत्र अत्यंत कमी आहे.

हवेली, वेल्हे, जुन्नर, आंबेगाव, बारामती, इंदापूर, दौड या तालुक्यांत चारापिकांची लागवड झाली आहेत. मुळशी, भोर, मावळ, खेड, शिरूर, पुरंदर ही तालुके चारापीक लागवडीपासून दूर असल्याचे चित्र आहे. नगर जिल्ह्यातही जवळपास सर्वच तालुक्यांत कमी अधिक पेरणी झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात चारापिकांचे क्षेत्र अत्यंत कमी आहे. त्यामुळे चाऱ्याचे मोठे दुर्भिक्ष जाणवण्याची शक्यता आहे.

विभागात झालेली चारापिकांची पेरणी, क्षेत्र (हेक्टर)
पीक क्षेत्र
मका  १७,३९०
ज्वारी  ९,९८०
बाजरी ३८०
लुसर्नग्रास  ६२७०
नेपिअर  १८२०
इतर चारापिके १३,५१०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com