नगर जिल्ह्यात आत्माअंतर्गत चारशेसाठ हेक्टरवर चारा उत्पादन

आत्माअंतर्गत चारशेसाठ हेक्टरवर चारा उत्पादन
आत्माअंतर्गत चारशेसाठ हेक्टरवर चारा उत्पादन

नगर ः कृषी विभागाच्या आत्माअंतर्गत नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी चारशेसाठ हेक्टर क्षेत्रावर चारा उत्पादन घेतले जाणार आहेत. याशिवाय चारापीक प्रात्यक्षिकांत सहा हजार ९१२ मुरघास तयार करण्यासाठी लागणाऱ्या पिशव्या दिल्या जातील, असे कृषी विभागातून देण्यात आली. सध्या जिल्ह्यामधील चौदाही तालुक्यांत प्रात्यक्षिकाचे नियोजन केले असले तरी पाणी असलेल्या भागाला प्राधान्य दिले जाणार आहे.

यंदाच्या पावसाळ्यात पुरेसा पाऊस झालेला नसल्याने नगर जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. नदी, नाले, तलाव, गाव व पाझर तलावांत पाणी साचले नाही. त्यामुळे पाणीपातळी अजिबात वाढली नाही. खरिपात पिके आली नाहीत. रब्बीची अवघी सोळा टक्के पेरणी झाली आहे. त्यामुळे आता पुढील आठ महिने पाणी, चाराटंचाईशी सामना करावा लागणार आहे. त्या अनुषंगाने प्रशासन सगळ्या शक्यता तपासून उपाययोजना करण्याचा प्रयत्न करत आहे. पशुसंवर्धन विभागासोबतच कृषी विभागाच्या आत्माअंतर्गत पीक प्रात्यक्षिकांतून चारा उत्पादन करून त्याचा मुरघास तयार केला जावा, असे प्रयत्न राहणार आहेत.

एका शेतकऱ्याला वीस गुंठ्यांवर हा प्रयोग करता येईल. त्यासाठी दोन हजार रुपये अनुदानाच्या कक्षेत पंधरा किलो अाफ्रिकन टाॅल मक्याचे बियाणे, मुरघास तयार करण्यासाठी तीन पिशव्या दिल्या जाणार आहेत. दोन हजार ३०४ प्रात्यक्षिके असून, तेवढेच शेतकरी यात सहभागी होतील. ३४६ क्विंटल बियाणे प्रात्यक्षिकांत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. या प्रात्यक्षिकांतून २० हजार ७३६ मट्रिक टन चारा उपलब्ध होईल.

उत्पादित झालेल्या चाऱ्यापासून मुरघास तयार करण्याची संकल्पना आहे. त्यामुळे प्रात्यक्षिकांत सहभागी झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला मुरघास तयार करण्यासाठी लागणाऱ्या प्रति एक टन क्षमतेच्या तीन पिशव्या दिल्या जाणार आहे. यासाठी जवळपास ४६ लाख रुपये खर्च होणार आहेत. प्रात्यक्षिकांत सहभागी होत असलेल्या शेतकऱ्यांकडे किमान दोन जनावरे असणे बंधनकारक आहे.

तालुकानिहाय प्रात्यक्षिके कंसात उत्पादित होणारा चारा (टन)
नगर १६० (१४४०)
पारनेर १३६ (१२२४)
पाथर्डी १६० (१४४०)
श्रीगोंदा २०० (१८००)
कर्जत १०० (९००)
जामखेड ८० (७२०)
श्रीरामपूर १६४ (१४७६)
शेवगाव १८४ (१६५६)
नेवासा २०० (१८००)
राहुरी २०० (१६००)
संगमनेर १७० (१५३०)
अकोले १६० (१४४०)
कोपरगाव २३० (२०७०)
राहाता १६० (१४४०)

दुष्काळात चाराटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आत्मातून पीक प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून चारा उत्पादन आणि त्याचा मुरघास करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. अापत्तीवर मात करण्यासाठी प्रशासन, कृषी विभाग उपाययोजना करत आहे. एकमेकांना साह्य करण्यासाठी शेतकऱ्यांनीही सहभागी व्हावे. - पंडित लोणारे,  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,  नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com