agriculture news in Marathi fodder rate hike in state Maharashtra | Agrowon

पशुखाद्य दरात वाढ

अभिजित डाके
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

अतिवृष्टीमुळे पशुखाद्य तयार होणाऱ्या सोयाबीन, मका, भुईमुगाचे नुकसान झाल्याने कच्च्या मालाच्या दरात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सांगली ः अतिवृष्टीमुळे पशुखाद्य तयार होणाऱ्या सोयाबीन, मका, भुईमुगाचे नुकसान झाल्याने कच्च्या मालाच्या दरात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. परिणामी पशुखाद्याचे दर वाढले आहेत. या दरवाढीचा फटका पशुपालकांना बसत आहे. सध्या पशुखाद्याच्या दरात प्रति किलो दोन ते सहा रुपयाने वाढ झाली आहे. त्यामुळे पशुपालकांना उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेती व्यवसायाला पशुपालनाची जोड देत अतिरिक्त उत्पन्नाचे साधन केले. तर बहुतांश शेतकऱ्यांचा हाच मुख्य व्यवसाय बनला. जातिवंत दुधाळ जनावरे खरेदी करून या व्यवसायाला मोठे स्वरूप प्राप्त करून दिले आहे. यातून मिळणाऱ्या पैशातून ते आपला प्रपंच चालवत आहेत. मात्र, गेल्या वर्षभरापासून पशुपालन व्यवसाय विविध संकटाच्या फेऱ्यात सापडला आहे. त्यामुळे पशुपालकांना पशुधन सांभाळणे मुश्कील बनले आहे. त्यात आता पशुखाद्याच्या दरात वाढ झाल्याने पशुपालक हवालदिल झाला आहे.

पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल खरीप हंगामातील पिकाच्या माध्यमातून मिळतो. पीक चांगले असल्याने दर्जेदार पशुखाद्य तयार करता येते. या दरम्यान पशुखाद्याचे दर कमी होतात. खाद्याच्या मागणीतही वाढ होते. असा दावा पशुखाद्य तयार करणाऱ्या कारखानदारांनी केला. गतवर्षी आलेल्या महापूराचा फटका पशुखाद्य उद्योगाला बसला होता.

डिसेंबर २०१९ मध्ये पशुखाद्याच्या दरात वाढ झाली होती. त्यानंतर खाद्य तयार करण्यासाठीच्या कच्च्या मालाच्या किमती उतरल्याने पशुखाद्याचे दर कमी झाले. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. परंतु पशुखाद्याचे दर काही काळ स्थिर राहिल्यानंतर  दरात वाढ झाली. त्यामुळे दूध उत्पादकांना खाद्य दरात वाढ होत असल्याने मोठा फटका बसत आहे.

गेल्या वर्षीप्रमाणेच यंदा अतिवृष्टी झाली. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. परिणामी उत्पादनात घट झाली. त्यामुळे खाद्य तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल कमी पडू लागला आहे. पावसाने सोयाबीन, भुईमूग, मका, ज्वारी पिकांचा दर्जा घसरला. त्यामुळे कच्च्या मालाचे दर वाढले.

गतवर्षीच्या महापुराने दूध उत्पादक शेतकरी संकटात आहेत. त्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने प्रारंभी दुधाच्या मागणीत मोठी घट झाली. त्यातच दूध दर देखील खालावले. या साऱ्या संकटांमुळे दूध उत्पादकांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. पशुखाद्याच्या दरात वाढ झाल्याने पशुपालकांच्या मागे लागलेले शुक्लकाष्ट संपायला तयार नसल्याचे चित्र आहे.

खाद्य निर्मितीत ३० टक्क्यांनी घट
जानेवारी २०२० पासून खाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा सुस्थितीत सुरु झाला होता. त्यामुळे उत्पादन पूर्ण क्षमतेने सुरु झाले होते. परंतु यंदा गेल्या दोन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण पिकांचे नुकसान झाले. पिके पाण्याने कुजून गेली. त्यातही पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणारी पिकेही वाया गेल्याने उत्पादनातही घट झाली. परिणामी कच्चा माल कमी पडू लागल्याने  
खाद्य निर्मितीत ३० टक्क्यांनी घट होईल, असा अंदाज व्यापारी आणि पशुखाद्यनिर्मिती करणाऱ्या कारखानदारांनी व्यक्त केला आहे.

ताळमेळ कसा घालायचा?
एका जनावराला एकावेळी अंदाजे तीन ते साडेतीन किलो म्हणजेच दोन वेळेचे सहा ते सात किलो खाद्य दिले जाते. दोन महिन्यांपूर्वी खाद्यासाठी १२० ते १३० रुपये खर्च यायचा. आता हाच खर्च २०० ते २१० रुपये झाला. सरासरी एक दुभत्या जनावरापासून दोन्ही वेळचे दूध २० लिटर धरले तर दहा दिवसांचे बिल ४५०० ते ४८०० रुपये होते. यातून सर्व खर्च वजा केला तर हाती ७०० ते ७५० रुपये राहतात. यामुळे उत्पन्न, खर्चाचा ताळमेळ कसा घालायचा?

पशुखाद्याचे दर (रुपये/किलो)

पशुखाद्य सप्टेंबर  नोव्हेंबर
सरकी पेंड २०.५०     २४
सोयाबीन पेंड   २८ ३६
सरकी डिओसी पेंड   २३   २५
शेंग डिओसी पेंड २८  ३०
गोळी पेंड   २० २२
गहू भुसा १५     १८
भात कोंडा    ६.५०   ८.२५

प्रतिक्रिया 
लॉकडाऊन झाल्यापासून दुधाच्या दरात सुमारे प्रतिलिटरला सहा रुपयांनी कमी आहेत. सातत्याने खाद्याच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे आर्थिक ताळमेळ बसत नाही. दुधाच्या दरात वाढ झाल्याशिवाय आमचे प्रश्न सुटणार नाहीत.
- प्रितम पाटील, दूधगाव, ता. मिरज.

पशुखाद्य महागले आहे. दूध उत्पादन वाढीसाठी खाद्याशिवाय दुसरा पर्याय नाही. खाद्य महाग झाले असले तरी सध्या दर्जेदार खाद्य मिळत नाही. दहा दिवसांचा दुधाच्या बिलाचा हिशोब केला असता यामध्ये खाद्यासाठी दोन हजार, चारा, आरोग्याचा खर्च २००० रुपये, निव्वळ नफा ७५० रुपये मिळाला. या पैशातून ताळमेळ कसा घालायचा, असा प्रश्न आहे.
- बापू खरगे, विठलापूर, ता. आटपाडी.


इतर अॅग्रो विशेष
जवानांनंतर शेतकऱ्यांचे ‘संचलन’ नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर...
लाल वादळ मुंबईत धडकले नाशिक : दिल्ली येथे सुरू असलेल्या ऐतिहासिक शेतकरी...
शेतीपंप वीजबिले तपासली जाणार; चुकीची...कोल्हापूर : ‘‘राज्य सरकारने कृषिपंप वीजजोडणी धोरण...
राज्यात एफआरपीचे ७७ टक्के वितरणपुणे : साखर कारखान्यांकडे लक्षावधी टन साखर पडून...
पूर्व विदर्भात गुरुवारी पावसाची शक्यतापुणे : मराठवाडा ते बिहार या दरम्यान कमी दाबाचा...
देशातील साखर उत्पादन ‘सुसाट’; १४२ लाख...कोल्हापूर : यंदाच्या हंगामातील साखर उत्पादनाने...
पशुसंवर्धन विभागात ३० टक्‍के पदे रिक्‍तनागपूर : पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या दुर्दशेसोबतच...
दिल्लीतील ट्रॅक्‍टर परेडला हिरवा कंदील...नवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेले...
बारामतीत अवतरले ‘अॅग्रोवन मार्ट’बारामती, जि. पुणे : शेतकऱ्यांच्या सर्व गरजांची...
औरंगाबादेत होणार अंडीपुंजनिर्मिती केंद्रऔरंगाबाद : रेशीम शेती व उद्योगाला चालना...
गोंदियात किमान तापमान १० अंशांवरपुणे : उत्तर भारतातील राजस्थान, पंजाब उत्तर...
शेतकऱ्यांच्या २६ च्या ‘ट्रॅक्टर परेड’...नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी...
केंद्राच्या स्पष्ट धोरणाअभावी ‘जीएम’...नागपूर ः एकीकडे जनुकीय सुधारित (जीएम) पिकांच्या...
लोक सहभागातून जैवविविधता, पर्यावरण...ग्रामीण भागातील जैवविविधतेच्या संवर्धनामध्ये पाच...
अपात्र लाभार्थ्यांना कोणी केले मालामाल?ज गामधील सर्वांत मोठी यशस्वी लोकशाही असलेला आपला...
ग्लोबल अन् लोकल मार्केटमका आणि सोयाबीनच्या जागतिक उत्पादनात घट होण्याची...
निर्णय आता तुमच्या हाती : केंद्र सरकारनवी दिल्ली ः शेतकरी नेते ‘कृषी कायदे रद्द करणे...
शेतमाल निर्यात खर्च झाला दुप्पट नाशिक : लंडनमध्ये डिसेंबरअखेर कोरोनाचा नव्या...
बर्ड फ्लूने १३ हजार पक्ष्यांचा मृत्यू पुणे : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लू...
कृषिपंपाच्या थकबाकीची आता ऊसबिलातून...सोलापूर :  कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी आणि...