प्रथमच नगर बाजारातून कडबा हद्दपार

नगर जिल्ह्यासह शेजारील सोलापूर, बीड, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्येही दुष्काळी स्थिती आहे. त्याचा चारा बाजारावर परिणाम झाला आहे. येथे साधारण सहा ते सात महिन्यांपासून कडबा विक्रीला येणे बंद झाले आहे, असे बहुधा प्रथमच झाले असावे. यातूनच दुष्काळाची तीव्रता स्पष्ट होते. - अभय भिसे, सचिव, बाजार समिती, नगर.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर ः जिल्ह्यात चाराटंचाईचे गंभीर परिणाम थेट बाजारात दिसू लागले आहेत. नगरमधील कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या फक्त ऊस आणि काही प्रमाणात मक्‍याची विक्री होताना दिसत आहे. विशेष म्हणजे चारा बाजारातून काही महिन्यांपासून ज्वारीचा वाळलेला कडबा चक्क गायबच झाला आहे. अनेक दिवसांपासून कडबा विक्रीला आलाच नाही, असे बाजारसमिती सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यामधील अन्य बाजार समित्यांमध्येही अशीच स्थिती आहे.

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत ऊस, घास, मका, ज्वारीचा वाळलेला कडबा व अन्य चाऱ्याची विक्रीसाठी सातत्याने रेलचेल असते. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून चारा बाजारावर दुष्काळी परिस्थितीचा गंभीर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. यंदा अपुऱ्या पावसामुळे खरिपात पिके आली नाहीत तर रब्बीत पेरणीच झालेली नाही. गतवर्षीचाही फारसा चारा सध्या लोकांकडे शिल्लक नाही. प्रशासनाच्या अहवालानुसार डिसेंबर महिन्याअखेर पुरेल एवढाच चारा शिल्लक आहे. त्यामुळे दरवर्षी बाजारात कडबा चारा विक्रीला येत असतो.

यंदा मात्र गेल्या काही महिन्यांपासून कोणीही कडबा विक्रीला आणत नसल्याने बाजारातून तो हद्दपारच झाल्यासारखी स्थिती आहे. ओला मका, घास, कडवळ चाऱ्याचीही आवक फारशी नाही. सध्या फक्त उसाच्या चाऱ्याचीच जास्त विक्री होत असून ४०० टनांच्या जवळपास उसाची आवक होत आहे. ज्वारीचा वाळलेला कडबा बाजारातून हद्दपार होण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे बाजार समितीतून सांगण्यात आले.

ग्रामीण भागातही कडब्याची फारशी विक्री होत नाहीत, त्यामुळे सध्याचा दरही ४ हजारांपुढे गेला आहे. दुभत्या जनावरांना कडबा हा सकस चारा म्हणून दिला जातो. मात्र आता दुभत्या जनावरांनाही कडबा मिळणे दुरापास्त झाले आहे. विशेष म्हणजे यंदाही ज्वारीची पेरणी नसल्याने अजून किमान वर्षभर कडबा चारा मिळणे कठीण आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com