नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई तीव्र होण्याची शक्‍यता

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे चाराटंचाई निर्माण होणार आहे. प्रशासनाकडे असलेल्या उपलब्ध चाऱ्याच्या अहवालानुसारच ही बाब स्पष्ट झाली आहे. जिल्हाभरात वेगवगळ्या माध्यमातून २२ लाख ५६ हजार ८७४ मेट्रिक टन चारा उपलब्ध होत आहे. जिल्हाभरातील पशुधनाचा विचार करता दर महिन्याला चार लाख ५८२ मेट्रिक टन चाऱ्याची गरज असते. त्यामुळे मार्च-एप्रिलमध्ये गंभीर चाराटंचाईला जिल्ह्याला सामोरे जावे लागणार आहे.

नगर जिल्ह्यामध्ये यंदा पुरेसा पाऊस नाही. खरिपातील बहुतांश पिके वाया गेली आहेत. रब्बीची पेरणीही होण्याची शक्‍यता धुसर झाली आहे. प्रशासनाच्या लेखी आतापर्यंत ७० टक्के पाऊस झाला असून, साधारण बारा तालुक्‍यांतील स्थिती चिंताजनक आहे. मात्र बारा नव्हे चौदाही तालुक्‍यांत फारशी वेगळी परिस्थिती नाही. पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्‍न आताच निर्माण झाला आहे. त्यामुळे पशुधन जगवणे अवघड होणार असून, सर्वाधिक फटका दुभत्या जनावरांना बसणार आहे.

दरवर्षी खरिपातील ज्वारी, बाजरी, भात, कडवळ, पडीक शेत, डोंगर आदी प्रक्रियेतून चारा उत्पादन होत असते. यंदा मात्र चारा उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. उपलब्ध चाऱ्याचा ताळमेळ घालून नेमका किती चारा उपलब्ध होईल आणि तो कधीपर्यंत पुरेल याचा अहवाल मांडला जातो. सध्या प्रशासनाकडे असलेल्या माहितीनुसार नगर जिल्ह्यात यंदा ११ लाख ६१ हजार ११६ मेट्रिक टन चारा उपलब्ध होत असून, गतवर्षीचा सध्या १० लाख ९५ हजार ७५८ मेट्रिक टन चारा शिल्लक आहे. त्यामुळे २२ लाख ५६ हजार ८७४ मेट्रिक टन चारा उपलब्ध असणार आहे.

जिल्ह्यामध्ये असलेल्या जनावरांचा विचार करता सध्या दर दिवसाला चार लाख ५८२ मेट्रिक टन चारा लागतो. त्यामुळे उपलब्ध असलेला चारा साधारण सहा महिने पुरेल, असे स्पष्ट झाल्याने जिल्ह्यामध्ये एप्रिलपासून चाऱ्याच्या गंभीर टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उपलब्ध चाऱ्याचा योग्य पद्धतीने वापर करावा, चारा वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्याला प्रशासनाकडून सुरवात झाली आहे.  

जिल्ह्यामधील पशुधनाची स्थिती
मोठी जनावरे १३,५९,०४८
लहान जनावरे  २,८९,५००
शेळ्या,मेंढ्या   ११,५३,८३६
उपलब्ध चाऱ्याची स्थिती (मेट्रिक टन)
वन क्षेत्रापासून उपलब्ध चारा १,६८,०००
गवती कुरण, चराऊ क्षेत्रापासून उपलब्ध चारा  १,५६,०००
बांध क्षेत्रातून उपलब्ध होणारा चारा १४,२००
पडीक क्षेत्रापासून उपलब्ध होणारा चारा १,१७,०००
पिकांपासून उपलब्ध चारा  ५,७०,०००
कृषी, पशुसंवर्धन योजनांतून होणारा चारा   १,३५,३१६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com