शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या  विमा कंपन्यांना सरळ करणार ः उध्दव ठाकरे

जालना येथील कार्यक्रमात बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे
जालना येथील कार्यक्रमात बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे

जालना  : राज्यात पीकविमा योजनेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या विमा कंपन्यांनी गावात फिरून शेतकऱ्यांकडून हप्ते गोळा केले. मात्र हजारो शेतकऱ्यांना विमा परतावा मिळाला नसल्याच्या तक्रारी आहेत. शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या विमा कंपन्यांना आता सरळ करणार आहे, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

जालना तालुक्यातील साळेगाव येथील चारा छावणीतील शेतकऱ्यांना अन्न धान्यवाटपाच्या कार्यक्रमात रविवारी (ता. ९) श्री. ठाकरे बोलत होते. या वेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, जयदत्त क्षीरसागर, माजी खासदार चंद्रकांत खैरे, विनोद घोसाळकर, उपनेते लक्ष्मण वडले, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, माजी आमदार संतोष सांबरे, जिल्हा प्रमुख भास्‍कर अंबेकर, औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर  उपस्थित होते. 

श्री. ठाकरे म्हणाले, की लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेचे मत आणि आशीर्वाद घेऊन मी मोकळा झालेलो नाही. दुष्काळात जनतेला आधार देण्याची जबाबदारी पार पाडण्याचे ओझे माझ्यावर आहे. दुष्काळ संपेपर्यंत शिवसेना शेतकऱ्यांसोबत राहील. पीक विमा भरूनही नुकसानीची रक्कम न मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी तयार करण्याच्या सूचना आपल्या मंत्र्यांसह पदाधिकाऱ्यांना देत शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना सरळ करणार, असा इशारा त्यांनी या वेळी दिला.

लोकसभा निवडणुकीत दुर्दैवाने चंद्रकांत खैरे पराभूत झाले. हा त्यांचा एकट्याचा पराभव नसून माझाही आहे. मात्र मी औरंगाबाद सुटू देणार नाही. पुन्हा औरंगाबादवर भगवा फडकवणार असल्याचे श्री. ठाकरे म्हणाले.     ‘नदीजोड प्रकल्प हाती घेणार’ मराठवाड्यात सतत दुष्काळ पडत असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. या परिस्थितीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी मराठवाड्यातील अकरा धरणे जोडण्याचा निर्णय चांगला असल्याचे सांगत दुष्काळमुक्त मराठवाड्यासाठी नदीजोड प्रकल्प हाती घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे या वेळी श्री. ठाकरे म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com