अन्नदात्यांनी अहंकाराला झुकविले: राहुल गांधीं

कृषी कायदे रद्द करण्याच्या पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर उत्साह वाढलेल्या काँग्रेसने हा शेतकऱ्यांचा विजय आणि क्रूर सरकारच्या अहंकाराचा पराभव असल्याची तोफ डागली आहे. तर कॉँग्रेस नेते राहुल गांधींनी, अन्नदात्यांच्या सत्याग्रहाने अहंकाराला झुकविले असल्याचे शरसंधान केले.
The food givers bowed the ego
The food givers bowed the ego

नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द करण्याच्या पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर उत्साह वाढलेल्या काँग्रेसने हा शेतकऱ्यांचा विजय आणि क्रूर सरकारच्या अहंकाराचा पराभव असल्याची तोफ डागली आहे. तर कॉँग्रेस नेते राहुल गांधींनी, अन्नदात्यांच्या सत्याग्रहाने अहंकाराला झुकविले असल्याचे शरसंधान केले.  पंतप्रधानांच्या घोषणेनंतर कॉँग्रेस नेते आक्रमक झाले आहेत. कॉँग्रेस पक्षाच्या ट्विटर हॅन्डलवरून सरकारला लक्ष्य करणारे बरेच ट्विट करण्यात आले. अभिमान व्यर्थ ठरला आणि देशातला शेतकरी जिंकला, हा अन्नदात्याच्या संघर्षाचा विजय असून, क्रूर सरकारच्या अहंकाराचा पराभव आहे. प्रत्येक वेळी सत्याग्रहानेच अन्यायाला पराभूत केले असल्याचा संदेश शेतकऱ्यांच्या विजयाने दिला असल्याचे कॉँग्रेस पक्षाने म्हटले. तर कृषी कायदे रद्द होण्याच्या राजकीयदृष्ट्या निर्णायक प्रसंगी परदेश दौऱ्यावर असलेले कॉँग्रेस नेते राहुल गांधींनी, हे कायदे सरकारला मागे घ्यावेच लागतील, असा इशारा देणारा व्हिडिओ जोडलेले ट्विट करून शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. देशातील अन्नदात्यांच्या सत्याग्रहाने अहंकाराचे मस्तक झुकवले. अन्यायाविरुद्धच्या या विजयाबद्दल अभिनंदन. जयहिंद, जय हिंद का किसान!, असे या ट्विटमध्ये राहुल गांधींनी म्हटले. तर कॉँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी केंद्र सरकारवर कडाडून हल्ला चढवला. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी, लोकशाही विरोधामुळे जे शक्य होत नाही ते निवडणुकांच्या भयातून साध्य करता येऊ शकते, असा चिमटा काढला. तीन कृषी कायदे रद्द करण्याची पंतप्रधानांची घोषणा हा धोरणात्मक बदल किंवा हृदय परिवर्तन नाही. तर निवडणुकांच्या भीतीमुळे हे झाले आहे. कृषी कायद्यांविरोधात ठाम राहिलेल्या कॉँग्रेससाठी तसेच शेतकऱ्यांसाठी हा मोठा विजय असल्याचेही चिदंबरम यांनी म्हटले. पुढील निवडणुकीत पराभवाची भीती असेल तर पंतप्रधान मोदी नोटाबंदीचा निर्णय ही हिमालयाएवढी घोडचूक असल्याचे मान्य करतील, चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी करून भूभाग बळकावल्याचे मान्य करतील आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा भेदभाव वाढविणारा असल्याचेही मान्य करतील, असाही टोला चिदंबरम यांनी लगावला.  माजी मंत्री आणि कॉँग्रेस नेते जयराम रमेश यांनीही ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आणि मोदींची ‘हेडलाइनजीवी’, अशी शेलक्या शब्दात संभावनाही केली. आधी संसदेत कायदे लादले नंतर अभूतपूर्व निदर्शनांना तोंड दिले. आता उत्तर प्रदेश आणि पंजाबची निवडणूक लढताना वस्तुस्थिती कळाल्यानंतर बऱ्याचदा आवाहन करूनही माघार घेतली आहे. अखेरीस शेतकऱ्यांचा विजय झाला आहे. त्यांच्या दृढतेला सलाम, अशी प्रतिक्रिया जयराम रमेश यांनी या निर्णयावर दिली. तसेच अजूनही देश ज्या निर्णयाची किंमत चुकवतो आहे, त्या ८ नोव्हेंबर २०१६चा पाशवी (नोटाबंदीचा) निर्णय रद्द करण्याचाही मार्ग असता तर बरे झाले असते,  असाही टोला जयराम रमेश यांनी मोदी सरकारला लगावला आहे.

प्रतिक्रिया

हा अहिंसेचा विजय आहे. या लढ्यात ७००हून अधिक शेतकरी कुटुंबांनी बलिदान दिले. ज्या कुटुंबीयांच्या सदस्यांनी न्यायाच्या या लढ्यात आपले प्राण दिले, त्यांचे बलिदान सार्थकी लागले आहे. आज सत्य, न्याय आणि अहिंसेचा विजय झाला आहे. काँग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे. आज सत्तेत असलेल्यांनी शेतकरी आणि मजुरांच्या विरोधात रचलेलं षड्‌यंत्र हरले आहे. हुकूमशाही राज्यकर्त्यांचा अहंकारही नष्ट झाला आहे. रोजीरोटी आणि शेतीवर हल्ला करण्याचा कट फसला आहे. अन्नदात्यांचा विजय झाला.  सोनिया गांधी, हंगामी अध्यक्षा, काँग्रेस

उद्या देशभरात  ‘किसान विजय दिवस’  केंद्राने पारीत केलेले तीन शेतकरी कायदे रद्द झाल्यानंतर विविध स्तरांतून प्रतिक्रिया येत आहेत. २० नोव्हेंबरला काँग्रेसच्या वतीने देशभरात शेतकरी विजय दिवस साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये देशभरातील काँग्रेसी कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती आहे. काँग्रेसच्या वतीने विविध राज्यात किसान विजय रॅली, किसान विजय सभा आयोजित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com