अकोला ः पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना यशस्वीरीत्या राबविल्याबद्दल दोनच दिवसांपूर्वी दिल्ल
अॅग्रोमनी
अर्जेंटिनात महागाई भडकली
अर्जेंटिनात शेतीमालाचे दर वाढले आहेत. या दरवाढीला सरकारने शेतकऱ्यांना जबाबदार धरत देशांतर्गत बाजारात शेतीमालाचा पुरवठा न वाढविल्यास निर्यात शुल्कात वाढ करण्याचा इशारा दिला आहे.
ब्युनॉस आयर्स ः अर्जेंटिनात शेतीमालाचे दर वाढले आहेत. या दरवाढीला सरकारने शेतकऱ्यांना जबाबदार धरत देशांतर्गत बाजारात शेतीमालाचा पुरवठा न वाढविल्यास निर्यात शुल्कात वाढ करण्याचा इशारा दिला आहे. आधीच सरकारने सोयाबीन, सोयातेल, सोयामिल, मका गहू या उत्पादनांच्या निर्यातीवर मोठे शुल्क लावले आहे. सरकारच्या या निर्णयाचा विरोध करण्यासाठी शेतकरी आंदोलनाच्या भूमिकेत आहेत.
कोरोनानंतर अर्जेंटिनामध्ये शेतीमालाचे दर हे तेजीत आहेत. सर्वच अन्नधान्याच्या किंमत भडकल्याने महागाई वाढली आहे. ही महागाई नियंत्रणात आणण्यासाठी अर्जेंटिना सरकारने अनेक शेतीमालाच्या निर्यातीवर शुल्क लावले आहे. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात शेतीमालाच्या किमती तेजीत असल्याने निर्यात होतच आहे. त्यावर पर्याय म्हणून सरकार शेतीमाल निर्यात शुल्कात आणखी वाढ करण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून, शेतकरी आंदोलनाच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष अल्बर्टो फर्नांडिस यांनी शेतकऱ्यांची नुकतीच भेट घेतली आहे. देशांतर्गत वाढत्या किमतीमुळे अर्जेंटिना सरकारने नुकतेच मका निर्यातीवर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे सरकारवर शेतकरी आणि निर्यातदारांनी टीका केली होती
आंतरराष्ट्रीय पातळीवर अन्नधान्याचे दर वाढलेले असल्यामुळे सर्वच देशांत शेतीमाल बाजार सुधारलेला आहे. अर्जेंटिनातही अन्नधान्याचे दर वाढलेले आहेत. अर्जेंटिनात गेल्या वर्षीच्या तुलनेत ग्राहक किंमत निर्देशांक ३६ टक्क्यांनी वाढला आहे, तर डिसेंबरच्या तुलनेत ४ टक्के वाढलेला आहे. त्यामुळे देशात बिकट स्थिती तयार होत असून, सरकार निर्यात शुल्कात आणखी वाढ करण्याच्या तयारीत आहे.
फर्नांडिस यांनी देशांतर्गत अन्नधान्याच्या किमती वाढीसाठी शेतकऱ्यांना जबाबदार धरत, त्यांनी देशांतर्गत बाजारात शेतीमालाचा पुरवठा न वाढविल्यास शेतीमाल निर्यातीवर शुल्क आकारण्याचा नुकताच इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
‘‘देशात अन्नधान्याच्या किमतीत वाढ झाली आहे. या किंमतवाढीसाठी शेतकरी आणि शेती क्षेत्र जबाबदार असल्याचा आरोप आम्ही कधीही सहन करणार नाही, हे आम्ही या आधीच स्पष्ट केले आहे. तसेच सरकारने निर्यातीवर कोणतेही शुल्कवाढ केल्यास आम्ही ती मान्य करणार नाही. सरकारने अशाप्रकारचा कोणताही निर्णय घेतल्यास शेतकरी आंदोलन करतील,’’ असे येथील एका शेतकरी संघाने म्हटले आहे.
...असे आहे निर्यात शुल्क
अर्जेंटिना सरकारने शेतीमाल निर्यात शुल्कात वाढ केली आहे. सोयाबीन निर्यातीवर ३३ टक्के, सोयाबीन तेल आणि सोयामिलवर ३१ टक्के निर्यात शुल्क आहे. तसेच मका आणि गहू निर्यातीवर किंवा विदेशात विकायचा असल्यास १२ टक्के शुल्क आकारण्यात आले आहे. हे शुल्क निर्यात करणाऱ्या कंपन्यांवर आकारण्यात येत असले, तरी कंपन्या शुल्काची रक्कम शेवट शेतकऱ्यांवरच लादतात.
निर्यातीत मोठा वाटा
जागतिक पातळीवर शेतीमाल निर्यातीत अर्जेंटिनाचा मोठा वाटा आहे.सोयाबीन तेल आणि सोयामिल निर्यातीत अर्जेंटिना जागतिक पातळीवर आघाडीवर आहे. तर मका निर्यात करणारा तीन नंबरचा सर्वांत मोठा देश आहे. तसेच गहू निर्यातीतही महत्त्वाच्या देशांत अर्जेंटिनाचा समावेश आहे.
- 1 of 30
- ››