येत्या हंगामात पिकांची, पावसाची स्थिती सामान्य राहण्याचा अंदाज

भेंडवळ येथे घटमांडणी
भेंडवळ येथे घटमांडणी

भेंडवळ, जि. बुलडाणा : येत्या हंगामात पिकांची, तसेच पावसाची स्थिती सामान्य राहणार असल्याचा अंदाज भेंडवळ येथील घटमांडणीत व्यक्त करण्यात आला. ज्वारी, बाजरी, तुरीचे पीक चांगले दर्शविले असून, येत्या वर्षात शेतकऱ्यांना चारा-पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

अक्षय तृतीयेला बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ (ता. जळगाव जामोद) येथे झालेल्या घटमांडणीचे बुधवारी (ता. आठ) सूर्योदयी अंदाज वर्तविण्यात आले. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मंगळवारी (ता. सात) भेंडवळ गावाच्या शेजारी असलेल्या शेतात सूर्यास्तापूर्वी घटमांडणी करण्यात आली होती. या घटमांडणीला आता साडेतीनशे वर्षांची परंपरा आहे. दरवर्षी या घटमांडणीत धान्याच्या राशी, पाण्याचा करवा व इतर साहित्याच्या आधारे पीक, पाऊस, नैसर्गिक आपत्ती तसेच राजकीय भाकीत वर्तविण्यात येते. संपूर्ण राज्याचे लक्ष या भाकिताकडे लागलेले असते. बुधवारी पहाटे या भेंडवळच्या घटमांडणीची भविष्यवाणी जाहीर झाली. या घटमांडणीची सुरवात करणारे चंद्रभान महाराज वाघ यांचे वंशज पुंजाजी महाराज वाघ यांनी घटाची पाहणी केली. त्यांना शारंगधर महाराज वाघ यांनी साह्य केले. यानंतर दोघांनी मांडणीचे विश्लेषण केले. 

पीक परिस्थिती सामान्य घटमांडणीच्या अंदाजानुसार येत्या हंगामात तूर, ज्वारी, बाजरीचे पीक चांगले येईल. तूर, बाजरीच्या दरात तेजी राहू शकते. ज्वारीचे दर सामान्य राहतील. कापूस, मूग, उडीद, तीळ, धान, जवस, लाख, वाटाणा, गहू, हरभरा, करडई ही पिके सामान्य स्वरूपाची दर्शविण्यात आली. पिकांचे उत्पादन सामान्य राहतानाच बाजारभावही सामान्य राहू शकतात. 

जुलैत सर्वाधिक पाऊस घटमांडणीत ठेवलेल्या मातीची ढेकळे व करव्यातील पाण्याचे निरीक्षण केल्यानंतर पावसाचा अंदाज देण्यात आला. या वर्षी जून महिन्यात साधारण स्वरूपाचा पाऊस राहील. यामुळे पेरणीला विलंब लागू शकतो. मात्र जुलैमध्ये चांगला व सार्वत्रिक पाऊस होईल. ऑगस्टमध्ये जुलैच्या तुलनेत पाऊस कमी राहील. पावसाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये लहरी स्वरूपाचा पाऊस दर्शविण्यात आला. या वर्षी अवकाळी पावसाचे प्रमाण बरेच राहू शकते. जिकडे पाऊस पडेल त्या भागात सामान्य पीक परिस्थिती राहू शकते. 

नैसर्गिक आपत्तीचे संकेत घटमांडणीत ठेवलेली पुरी गायब झालेली दिसून आली. त्यामुळे या वर्षात नैसर्गिक आपत्तींचे संकेत मांडणीतून देण्यात आले. पाऊस, भूकंप यामुळे मोठे नुकसान होऊ शकते. मांडणीतील करंजी फुटून सर्वत्र विखुरली होती. हा आर्थिक अडचणींचा संकेत असल्याचे सांगण्यात आले.

राजा कायम? देशाच्या राजकीय घडामोडींबाबतही मांडणीत विश्लेषण करण्यात आले. पानविडा हा देशाच्या राजाचे प्रतीक मानला जातो. पानविडा कायम असल्याने राजा कायम राहील असे सांगण्यात आले. मात्र याबाबत विश्लेषकांनी अधिक भाष्य करणे टाळले. देशात याही वर्षात घुसखोरीच्या घटना घडणार आहेत. मात्र देशाची संरक्षण यंत्रणा त्यांचा सक्षमपणे सामना करतील. त्यामुळे चिंतेचे कारण नाही, असेही सांगण्यात आले. 

अशी होती घटमांडणी भेंडवळ गावाशेजारी एका शेतात मोठा खड्डा करण्यात आला होता. या खड्ड्यात चार मातीचे मोठी ढेकळे ठेवून त्यावर पाण्याने भरलेला करवा ठेवला होता. त्यावर करंजी, पुरी, पापड, वडा, भजी ठेवले होते. खड्ड्याच्या वर्तुळाकार अंबाडी, गहू, ज्वारी, बाजरी, सरकी, हिवाळी मूग, उडीद, करडी, तांदूळ, जवस, तीळ, मसूर, हरभरा, वाटाणा, भादली अशी धान्ये ठेवण्यात आली होती. पृथ्वीच्या प्रतीकात्मक स्वरूपात पुरी, समुद्राचे प्रतीक म्हणून घागर आणि त्यावर पापड, वडा, पावसाचे प्रतीक म्हणून मातीची ढेकळे, वडा, पानसुपारी यांची मांडणी केली होती. या सर्व वस्तूंच्या घटमांडणीमधील बदलांचे निरीक्षण करून भाकीत वर्तविण्यात आले. ही भविष्यवाणी ऐकण्यासाठी बुलडाणा, अकोला, वाशीम, जळगाव खानदेशसह मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यांतून हजारो शेतकरी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com