माजी आमदार प्रभाकर घार्गेंसह २० जणांवर खुनाचा गुन्हा, मनोज घोरपडेंसह सात जणांना कोठडी 

पडळ (ता. खटाव) येथील खटाव- माण ग्रो प्रोसेस कारखान्यातील वरिष्ठ अधिकारी जगदीप धोंडिराम थोरात (वय ४०, रा. गोवारे, ता. कऱ्हाड) यांच्या संशयित मृत्यूप्रकरणी माजी आमदार प्रभाकर घार्गे वीसजणांवर वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
 माजी आमदार प्रभाकर घार्गेंसह  २० जणांवर खुनाचा गुन्हा, मनोज घोरपडेंसह सात जणांना कोठडी With former MLA Prabhakar Gharge Murder case against 20 people, Manoj Ghorpade and 7 others jailed
माजी आमदार प्रभाकर घार्गेंसह  २० जणांवर खुनाचा गुन्हा, मनोज घोरपडेंसह सात जणांना कोठडी With former MLA Prabhakar Gharge Murder case against 20 people, Manoj Ghorpade and 7 others jailed

वडूज, जि. सातारा : पडळ (ता. खटाव) येथील खटाव- माण ग्रो प्रोसेस कारखान्यातील वरिष्ठ अधिकारी जगदीप धोंडिराम थोरात (वय ४०, रा. गोवारे, ता. कऱ्हाड) यांच्या संशयित मृत्यूप्रकरणी कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार प्रभाकर घार्गे, को चेअरमन मनोज घोरपडे, कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे यांच्यासह अन्य आठ व अनोळखी १२ जणांवर वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

दरम्यान, मनोज घोरपडेंसह सहा जणांना १६ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. रविवारी अंजनकुमार घाडगे यांनाही अटक करण्यात आली आहे. 

याबाबत समजलेली माहिती अशी की, मृत जगदीप थोरात यांना साखरेची अफरातफर केल्याच्या कारणावरून जनरल मॅनेजर यांनी ऑफिसमध्ये बोलावून घेऊन बुधवारी (ता. १०) सायंकाळी साडेपाच ते आठ वाजण्याच्या दरम्यान फायबर काठी, लाकडी काठी, ऊस व लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले होते. त्यानंतर रात्री उशिरा त्यांना कऱ्हाड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्या ठिकाणी त्यांचा गुरुवारी (ता. ११) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला.

या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या कारखाना पदाधिकारी व प्रशासनावर कठोर कारवाई करा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, असा पवित्रा मृताचे नातेवाईक, तसेच गोवारे ग्रामस्थांनी घेतला. या बाबत विक्रम आकाराम पाटील (रा. कापूसखेड, ता. वाळवा, जि. सांगली) यांनी दिलेल्या माहितीवरून कऱ्हाड पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक भरत तुकाराम पाटील यांनी गुन्हा दाखल केला. 

पडळ कारखाना वडूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने हा गुन्हा वडूज पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणी थोरात यांच्या मृत्यू प्रकरणी माजी आमदार घार्गे, मनोज घोरपडे, संग्राम घोरपडे, संचालक महेश घार्गे, शेडगे (मामा), सनी क्षीरसागर, पी. ए. अंजनकुमार, अशोक नलवडे आदींसह अन्य दहा ते बारा जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सर्व संशयितांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९, ३२३ लावण्यात आले आहे. संशयित मनोज घोरपडेंसह इतर सहा जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना १६ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, पोलिस उपअधीक्षक नीलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मालोजीराव देशमुख तपास करीत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com