अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची अंत्ययात्रा
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची अंत्ययात्रा

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (ता. १७) दिल्लीतील राजघाटावरील राष्ट्रीय स्मृती स्थळावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वाजपेयी यांची मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला. 'अटलबिहारी अमर रहे`, `वंदे मातरम्' अशा घोषणांनी भारलेल्या आणि अत्यंत शोकाकुल वातावरणात वाजपेयी यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

वाजपेयी यांचे गुरुवारी (ता. १६) सायंकाळी वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. गुरुवारी रात्री वाजपेयी यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास त्यांचे पार्थिव भाजप मुख्यालयात नेण्यात आले. वाजपेयी यांचे निवासस्थान ते भाजप मुख्यालय या मार्गावर वाजपेयींच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. भाजपसह विविध पक्षांच्या नेत्यांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. दुपारी दोन वाजेच्या सुमारास वाजपेयी यांच्या अंत्ययात्रेला सुरवात झाली. प्रचंड मोठ्या जनसागरात निघालेल्या या अंत्ययात्रेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी पायी जात सहभाग घेतला.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, डीएमकेचे नेते ए. राजा यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी त्यांचे अखेरचे दर्शन घेतले. भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वाँगचुक वाजपेयींच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहिले.

तिन्ही सेनादलप्रमुखांनी पुष्पचक्र अर्पण करून वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्यांना ३०० जवानांनी मानवंदना दिली. वाजपेयी यांच्या पार्थिवाभोवती गुंडाळलेला तिरंगा नात निहारीकाकडे सोपवण्यात आला. त्यानंतर वाजपेयी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाबद्दल केंद्र सरकारने २२ ऑगस्टपर्यंत सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com