कांदा पट्टयात अस्वस्थता; चौघांनी संपवले जीवन

संग्रहित चित्र
संग्रहित चित्र

नाशिक   ः गंभीर दुष्काळ स्थिती, कर्ज, नापिकी व शेतमालाचे कोसळलेले भाव शेतकऱ्यांच्या जिवावर उठले आहेत.  शुक्रवार (ता. १८) मालेगाव तालुक्‍यासाठी घातवार ठरला. तालुक्‍यातील तीन शेतकऱ्यांनी एकाच दिवशी आत्महत्या केल्याने तसेच बागलाण तालुक्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. यात, नांदगाव खुर्द येथील चेतन केदा बच्छाव (वय २३) या तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन, तर ज्ञानेश्‍वर शिवणकर (३५, रा. कंधाणे) व वसंत बंकट सोनवणे (४५, रा. सायने खुर्द) या दोघा शेतकऱ्यांनी विषप्राशन करून आत्महत्या केली.

कांद्याला कोंब फुटल्याने कांदा विकला जाणार नाही, विकला तरी भाव मिळणार नाही. त्यामुळे कर्ज फेडणे अशक्‍य होईल. त्यातच कांदादराचा आशावाद फोल ठरल्याने एकत्रित कुटुंबाचा गाडा कसा ओढायचा, या विवंचनेत असलेले ज्ञानेश्‍वर शिवणकर यांनी कांद्याच्या ढिगाऱ्यावरच (शिर) विषप्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्यावर सुमारे ७५ हजार रुपये कर्ज होते. त्यांच्या पश्‍चात तीन भावांचे एकत्रित कुटुंब. दोन मुलगे, दोन मुली, आई-वडील असा परिवार आहे.

दुसऱ्या घटनेत नांदगाव खुर्द येथील चेतन बच्छाव या तरुण शेतकऱ्याने सकाळी दहाच्या सुमारास काकाच्या घरी छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. अविवाहित असलेला चेतन कळवण येथे मोलमजुरी करून गुजराण करीत होता. त्याची गावात कोरडवाहू शेती असून, आई-वडिलांचे निधन झाले आहे. त्याच्यावर खासगी वित्तीय संस्थेचे चार ते पाच लाख रुपये कर्ज होते.  

सायने येथील वसंत सोनवणे यांनी कर्जाचा डोंगर असल्याने गुरुवारी (ता. १७) रात्री विषारी औषध प्राशन केले. अत्यवस्थ अवस्थेत त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच शुक्रवारी दुपारी त्यांचे निधन झाले. त्यांची सुमारे साडेपाच एकर शेती असून, पत्नी, दोन मुलगे, दोन मुली असा परिवार आहे. सोनवणे यांच्यावर सिंडिकेट बॅंकेसह अन्य सुमारे पाच लाख रुपयांचे कर्ज होते. तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सारदे येथेही शेतकरी आत्महत्या जायखेडा : सततची नापिकी, कर्ज, कांद्याचे घसरते भाव आदींमुळे त्रस्त असलेले सारदे (ता. बागलाण) येथील शेतकरी शिवाजी निंबा कापडणीस (वय ५५) यांनी स्वतःच्या शेतात विषप्राशन करून आत्महत्या केली.शिवाजी कापडणीस यांची सारदे येथे पत्नी व वडिलांच्या नावे दहा एकर शेती आहे. त्यावर पत्नीच्या नावे साधारण दोन लाख ६५ हजार, तर वडिलांच्या नावे अंदाजे दहा लाखांचे कर्ज असल्याचे सांगितले जाते. हे कर्ज फेडण्याची विवंचना व घरातील कर्ता पुरुष असल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी यातून चिंताग्रस्त असलेले कापडणीस यांनी उंबरडू शिवारातील राहत्या घराजवळ विषारी औषध प्राशन केले. पोलिसपाटील स्वप्नील देवरे यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार जायखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नामपूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय आधिकारी डॉ. दीपक पाटील, गणेश आहिरे यांनी विच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.   आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना तत्काळ मदत देण्याची मागणी मालेगाव, जि. नाशिक : तालुक्यातील ज्ञानेश्वर शिवणकर, चेतन केदा बछाव व वसंत बंकट सोनवणे या तीन शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. शासनाने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या परिवारास संपूर्ण कर्जमाफी देऊन कुटुंबीयांना १० लाख रुपयांचे अर्थसाह्य तत्काळ द्यावे, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघ व मालेगाव विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (ता. १९) निवेदनाद्वारे केली आहे. शिष्टमंडळाने तहसीलदार कुंवर, नायब तहसीलदार धारणकर यांना निवेदन दिले. या वेळी भरत पाटील, किशोर जाधव, देवा पाटील, निखिल पवार, तात्या महाले, दिनेश पाटील, राजेश अलीझाड, बापू पाटील आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com