अमरावतीत चौदा तालुकास्तरीय तत्काळ प्रतिसाद पथके

अमरावतीत पशुसंवर्धन विभागाकडून जिल्ह्यात १४ तालुकास्तरीय तत्काळ प्रतिसाद पथकेनिर्माण करण्यात आल्या असून, नियमित तपासणीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अमरावतीत चौदा तालुकास्तरीय तत्काळ प्रतिसाद पथके
अमरावतीत चौदा तालुकास्तरीय तत्काळ प्रतिसाद पथके

अमरावती : जिल्ह्यात अद्यापपर्यंत कुठेही बर्ड फ्लू सदृश परिस्थिती आढळलेली नसली तरीही दक्षता व प्रतिबंधात्मक उपाययोजना वेळीच करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत. त्यानुसार पशुसंवर्धन विभागाकडून जिल्ह्यात १४ तालुकास्तरीय रॅपिड रिस्पॉन्स टीम निर्माण करण्यात आल्या असून, नियमित तपासणीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  दरम्यान, पालकमंत्री ठाकूर यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा झोनोटिक डिसीज नियंत्रण समितीची बैठक घेण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी अध्यक्षस्थानी होते. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एम. यु. गोहोत्रे, डॉ. राधेश्याम बहादुरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय रहाटे, सहायक पशुचिकित्सा आयुक्त डॉ. एस. एम. कावरे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे, महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन बोंद्रे, डॉ. पी. टी. आकोडे, डॉ. एस. जी. जिरापुरे, तपन कोल्हे आदी उपस्थित होते.  जिल्ह्यात अद्याप बर्ड फ्लूची स्थिती आढळली नसली तरी खबरदारी व प्रतिबंधात्मक उपायांच्या अंमलबजावणीबाबत पालकमंत्र्यांचे सुस्पष्ट निर्देश आहेत. त्यामुळे नियुक्त तालुकास्तरीय पथकांनी पोल्ट्री फार्म, कुक्कुटपालक यांच्याकडे नियमित तपासणी करावी. जिल्ह्यात सुमारे ५ हजार क्षमतेचे ३५० ते ४०० पोल्ट्री फार्म आहेत. कोंबड्यांची अंदाजे संख्या १३ लाख आहे. या सर्व पोल्ट्री फार्म व कुक्कुटपालकांनाही सावधगिरीच्या सूचना देणे आवश्यक आहे. त्यासाठी पोल्ट्रीची नियमित स्वच्छता व येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या संख्येवर मर्यादा, पक्ष्यांत कुठेही आजाराची लक्षणे आढळताच तत्काळ तपासणी, आवश्यक तिथे चाचणी नमुने घेणे व आवश्यक माहिती मिळण्यासाठी पूर्णवेळ संपर्क कक्ष निर्माण करावा. आतापर्यंत करण्यात आलेल्या प्रत्येक कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, असे निर्देश सिद्धभट्टी यांनी दिले.  पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. गोहोत्रे म्हणाले, ‘‘पक्ष्यांमध्ये अद्याप प्रादुर्भाव आढळला नाही. मात्र धारणी तालुक्यात दिया येथे तीन कावळे, एक घुबड व बडनेऱ्यात दोन पक्षी मृत झाल्याचे आढळले. त्यांच्या मृत्यूची कारणे जाणून घेण्यासाठी सहा पक्षी पुणे येथील राज्यस्तरीय रोग अन्वेषण प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, जिल्ह्यात कुठेही अशी घटना आढळल्यास तत्काळ तपासणीचे आदेश दिले आहेत.’’  स्थलांतरित पक्ष्यांच्या संचाराने प्रादुर्भाव होऊ शकतो. मुख्यत्वे हे पक्षी जलाशयांच्या ठिकाणी वावरत असतात. त्यामुळे जलाशये, तलाव आदी ठिकाणी अशा घटनांवर देखरेख ठेवण्याबाबत जलसंपदा विभागाला सुस्पष्ट निर्देश देण्यात यावेत. ही कार्यवाही महापालिकेच्या अंतर्गत जलाशयाबाबतही व्हावी. महापालिका स्तरावरील पथकांना नियमित तपासणीच्या सूचना द्याव्यात व जनजागृतीही करावी. मध्यप्रदेशात बर्ड फ्लूची लागण झालेली असल्यास नजीकच्या क्षेत्रातून पोल्ट्रीसाठी पक्षी येतात किंवा कसे, हे तपासावे व आवश्यक असल्यास या वाहतुकीसाठी सीमा मर्यादा घालाव्या लागतील. त्याबाबत पशुसंवर्धन विभागाने अहवाल द्यावा, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. व्यवहारे यांनी दिले. 

काळजी घ्या; भीतीचे कारण नाही : डॉ. रहाटे  पशुसंवर्धन अधिकारी रहाटे म्हणाले, ‘‘पोल्ट्री फार्मला सोडियम बायकार्बोनेटने नियमित स्वच्छता करण्याचे आदेश दिले आहेत. पथकांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना आवश्यक साधने देण्यात येत आहेत. बर्ड फ्लूसदृश स्थिती जिल्ह्यात अद्याप आढळली नाही. मात्र खबरदारी घेण्यात येत आहे.

अमरावती जिल्हा सध्यातरी सुरक्षित आहे. राज्य सीमेपलीकडून येणाऱ्या पोल्ट्री वाहतूकदारांना सूचना देण्यात आली आहे. आजाराच्या प्रादुर्भावाबाबत सगळी तथ्ये विभागाकडून सातत्याने तपासण्यात येत आहेत. त्यामुळे निष्कारण अफवाही पसरू नयेत. कुक्कुटपालक शेतकरी व पोल्ट्रींवर विपरीत परिणाम होऊन त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये. उकडून अंडी व चिकन खाण्यास हरकत नसते. चिकन उकळताना हा विषाणू ७० सेल्सीअस वर मरतो. जलाशये, पाणवठ्यांवरील पक्ष्यांच्या संचाराबाबतही तपासणीची कार्यवाही होत आहे.

पक्षीप्रेमींच्या संघटनांशी सतत संपर्क व माहिती घेतला जात आहे. त्यात अद्यापपर्यंत तरी स्थलांतरित पक्ष्यांत प्रादुर्भाव आढळला नाही, असेही डॉ. रहाटे म्हणाले. जिल्ह्यात सतत संपर्कासाठी संपर्क कक्ष तत्काळ उघडण्यात येईल, असे गोहोत्रे यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com