कृषिकन्यांचा अन्नत्यागाचा आज चौथा दिवस

पुणतांबे, जि. नगर : एक दिवस अन्नत्याग करून अांदोलनाला पाठिंबा देणाऱ्या मुली. (छायाचित्र : गणेश बनकर)
पुणतांबे, जि. नगर : एक दिवस अन्नत्याग करून अांदोलनाला पाठिंबा देणाऱ्या मुली. (छायाचित्र : गणेश बनकर)

पुणतांबे, जि. नगर (प्रतिनिधी) : किसान क्रांती शेतकऱ्यांच्या आंदोलनाला साथ देण्यासाठी तीन कृषिकन्यांनी अन्नत्याग अांदोलन सुरू केले आहे. बुधवारी (ता. ६) आंदोलनाचा चौथा आणि उपोषणाचा तिसरा दिवस होता.   या अंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. गावकऱ्यांनी ‘गाव बंद’ पाळून आंदोलनाला पाठिंबा दिला. शाळेतील मुलींनी हातात काळे झेंडे घेऊन फेरी काढली. सरकारचा निषेध म्हणून स्टेशन रस्त्यावरील दुकानदारांनी दुकानांवर काळे झेंडे लावले होते. मुलींच्या अन्नत्याग आंदोलनाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.  निकिता जाधव, शुभांगी जाधव, पूनम जाधव या कृषिकन्यांच्या आंदोलनाला नगर, औरंगाबाद जिल्ह्यातील नेवासा, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर, वैजापूर आदी तालुक्यातील शेतकरी पाठिंबा देत आहेत. यात महिलावर्गाची संख्या मोठी आहे.  सकाळी रुरल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी हातात काळे झेंडे घेऊन, गावच्या मुख्य रस्त्यावरून फेरी काढली व अांदोलनाला पाठिंबा व्यक्त केला. या वेळी गावकरीही फेरीत सामील झाले होते. काही विद्यार्थिनींनी एक दिवस अन्नत्याग करण्याचा निर्णय करून आंदोलन स्थळी बैठा सत्याग्रह केला. अन्नत्याग आंदोलनात सहभाग नोंदविला.  सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करत नसल्याबाबत स्टेशन रस्त्यावरील दुकानदारांनी दुकानांवर काळे झेंडे लावून निषेध व्यक्त केला. सरकारने लवकरात लवकर या आंदोलकांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी भावना व्यक्त केली जात आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com