नऊ राज्यांत ७२ जागांसाठी आज मतदान

नऊ राज्यांत ७२ जागांसाठी आज मतदान
नऊ राज्यांत ७२ जागांसाठी आज मतदान

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी  आज (सोमवारी, ता. २९) चौथ्या टप्प्याचे मतदान होईल. यासोबतच महाराष्ट्रातील निवडणुकीची रणधुमाळी शांत होणार आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील शिल्लक १७ जागांचा समावेश असून, नऊ राज्यांतील ७२ जागांसाठी ९६१ उमेदवार मतदारांकडे कौल मागतील. त्यात मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या पुत्रांसोबतच कन्हैया कुमार, पार्थ पवार, ऊर्मिला मातोंडकर, डॉ. अमोल कोल्हे या नव्या, परंतु चर्चेतील चेहऱ्यांचाही समावेश आहे.  मध्य प्रदेशात मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र मुकुलनाथ छिंदवाडामध्ये पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. जबलपूरमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष राकेशसिंह यांच्यापुढे काँग्रेसचे राज्यसभा खासदार विवेक तनखा यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. राजस्थानात जोधपूरमध्ये वैभव गेहलोत विरुद्ध मोदी सरकारमधील मंत्री गजेंद्र सिंह शेखावत ही लढत लक्षवेधी असेल. यासोबत पालीमध्ये विद्यमान मंत्री व भाजपचे पी. पी. चौधरी, बारमेरमध्ये भाजपचे दिग्गज नेते असलेल्या जसवंतसिंह यांचे पुत्र मानवेंद्रसिंह यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. झालावाडमध्ये माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांचे पुत्र दुष्यंत पुन्हा मतदारांचा कौल आजमावणार आहेत.  उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये वादग्रस्त वक्तव्यांमुळे प्रसिद्ध असलेले भाजप खासदार साक्षी महाराज, फरुखाबादमध्ये काँग्रेसचे माजी मंत्री सलमान खुर्शीद, इटावामध्ये भाजपमधून काँग्रेसवासी झालेले अशोक दोहरे विरुद्ध भाजपचे माजी मंत्री डॉ. रमाशंकर कठेरिया, कन्नौजमध्ये समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल, कानपूरमध्ये काँग्रेसचे माजी मंत्री श्रीप्रकाश जायस्वाल हे रिंगणात आहेत. आसनसोलमध्ये मोदी सरकारमधील मंत्री बाबूल सुप्रियो आणि तृणमूल काँग्रेसच्या अभिनेत्री खासदार मुनमून सेन, वीरभूममधून तृणमूल काँग्रेसच्या शताब्दी रॉय हे प्रमुख चेहरे मैदानात आहेत. बिहारमध्ये बेगुसरायमधून भाजपचे मंत्री गिरिराज सिंह विरुद्ध भाकपचे विद्यार्थी नेते कन्हैया कुमार, मोदी सरकारमधून बाहेर पडलेले राष्ट्रीय लोक समता पक्षाचे माजी मंत्री उपेंद्र कुशवाह लढत आहेत.  तपशील..

  • राज्ये : ९ 
  • मतदारसंघ : ७२  
  • उमेदवार : ९६१
  • मतदान केंद्रे : १.४०लाख 
  • मतदार : १२.७९ कोटी 
  • राज्य आणि मतदारसंघ

  • महाराष्ट्र ः १७
  • राजस्थान ः १३
  • उत्तर प्रदेश ः १३
  • पश्‍चिम बंगाल ः ८
  • मध्य प्रदेश ः ६
  • ओडिशा ः ६
  • बिहार ः ५
  • झारखंड ः ३
  • जम्मू-काश्‍मीर ः १
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com