संत्र्याची ४० टक्के फळे झाडावरच

संत्रापट्ट्यात विक्रीअभावी अद्यापही ४० टक्के फळे तशीच असून, पुढील बहर घेण्यासाठी त्याची तोड अनिवार्य आहे. त्यामुळे मिळेल त्या भावात फळे विक्रीची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
संत्र्याची ४० टक्के फळे झाडावरच
संत्र्याची ४० टक्के फळे झाडावरच

नागपूर : खरेदीदारच नसल्याने झाडावरील शिल्लक फळांचे करायचे काय, असा प्रश्‍न संत्रा उत्पादकांना पडला आहे. संत्रापट्ट्यात विक्रीअभावी अद्यापही ४० टक्के फळे तशीच असून, पुढील बहर घेण्यासाठी त्याची तोड अनिवार्य आहे. त्यामुळे मिळेल त्या भावात फळे विक्रीची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.  विदर्भाचे मुख्य फळपीक असलेल्या संत्रा उत्पादकांवर या वर्षी दराअभावी उत्पादन खर्चाची भरपाई देखील अशक्य झाली आहे. संततधार पावसामुळे देशाच्या इतर राज्यांतून मागणी नसणे, संत्रा सालीवर पावसाच्या कारणामुळे रंगधारणा न होणे, प्रक्रिया उद्योगाचा अभाव अशी कारणे त्यामागे दिली जात आहेत. गेल्या वर्षी ३५ ते ४० रुपये किलो असलेल्या संत्र्याची त्यामुळेच या वर्षी अवघ्या सात ते आठ रुपये किलो दराने विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. हा संत्रा तोडणीस देखील महाग असल्याने अनेक शेतकऱ्यांनी बागेतील फळे तशीच ठेवली आहेत. परंतु पुढील वर्षी आंबिया बहर घ्यायचा असल्यास या फळांची तोडणी गरजेची ठरते. फळांची तोड करून डिसेंबर महिन्यात बाग ताणावर सोडली जाते. त्यानंतर दहा जानेवारीच्या पुढे बागेचे पाणी व्यवस्थापन केले जाते.  शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेता व्यापाऱ्यांकडून मनमानी दरात बागेतील फळांची मागणी केली जात आहे. त्यामुळेच आंबिया बहराचा हंगाम अंतिम टप्प्यात असताना देखील दरातील तेजीचा फायदा शेतकऱ्यांना मिळविता आला नाही. विदर्भात सुमारे एक लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर संत्रा लागवड आहे. त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी तालुके संत्रा लागवडीत आघाडीवर आहेत. दराअभावी अनेक शेतकरी फळांची तोडणी करून ते उकिरड्यावर फेकत आहे. सध्या स्थितीत झाडावर चाळीस टक्के फळे तशीच शिल्लक असल्याचे महाऑरेंजच्या सूत्रांनी सांगितले. या वर्षी साडेसहा ते सात लाख टन संत्रा उत्पादन अपेक्षित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com