खेडा खरेदीत शेतकऱ्यांना साडेपाच कोटींचा गंडा

खेडा खरेदीतील दोन व्यापाऱ्यांनी शंभरावर शेतकऱ्यांना तब्बल साडेपाच कोटी रुपयांनी गंडा घातल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे.
Fraud of farmers in purchasing grain
Fraud of farmers in purchasing grain

यवतमाळ ः खेडा खरेदीतील दोन व्यापाऱ्यांनी शंभरावर शेतकऱ्यांना तब्बल साडेपाच कोटी रुपयांनी गंडा घातल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. या वर्षी मे महिन्यात घडलेल्या या घटनांप्रकरणी पोलिसात रीतसर तक्रारही दाखल करण्यात आली. त्यानंतरच्या घडामोडीत एका व्यापाऱ्याने आत्महत्येचे मार्ग पत्करला असला तरी शंकर पहूरकर नामक व्यापारी चार महिन्यांपासून महागाव पोलिसाना मिळत नसल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर शंका व्यक्‍त केली जात आहे.  खेडा खरेदीच्या माध्यमातून विदर्भात फसवणुकीच्या घटनांमध्ये नजीकच्या काळात मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या नव्या कायद्यांवर न्यायालयाची स्थगिती असली तरी या बाबत अनेकांना माहिती नसल्याने बाजार समितीच्या परवान्याविनाच खेडा खरेदीचे व्यवहार होत आहेत. यात कोट्यावधी रुपयांच्या शेतीमालाची खरेदी करून व्यापारी पसार होत असल्याचे प्रकारही वाढले आहेत.  महागाव तालुक्‍यातील गुंज येथील एका व्यापाऱ्याने साडेतीन कोटी रुपयांचा शेतीमाल खरेदी केला. त्यानंतर काही दिवस पसार राहिलेल्या या व्यापाऱ्याने पोलिस तक्रार आणि वाढत्या दबावातून आत्महत्या केली. मात्र त्याने फसवणूक केलेल्या शेतकऱ्यांच्या पैशाचे काय, असा प्रश्‍न मात्र आजही कायम आहे. महागाव तालुक्‍यातच फसवणुकीची दुसरी घटना हिवरा भागात घडली. हिवरा येथील शंकर पहूरकर यांनी हिवरासह नजीकच्या काही गावांतून हरभरा खरेदी केला. तब्बल अडीच कोटी रुपयांच्या शेतीमालाची खरेदी करून पहूरकर पसार झाला. १०० ते १२५ शेतकऱ्यांची फसवणूक या माध्यमातून झाली आहे. यामध्ये हिवरा गावातील शेतकऱ्यांचे ३० ते ४० लाख रुपये आहेत. ५ मे २०२१ पासून पहूरकर फरार झाला आहे. २१ जून २०२१ रोजी महागाव पोलिसात सात शेतकऱ्यांनी तक्रार दिली. पोलिसांनी ती चौकशीत ठेवली; मात्र पहूरकरचा थांगपत्ता लागत नसल्याने १७ जुलै रोजी या प्रकरणी रीतसर तक्रार नोंदवित महागाव गुन्हे दाखल करण्यात आले. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव यांनी पुढाकार घेऊनही यश मिळाले नाही.  शेतकऱ्यांनी लावला सुगावा  पोलिसांच्या रेकॉर्डवर पहूरकर फरार आहे. त्याचा शेतकऱ्यांनी मात्र आपल्यास्तरावर माग काढला. पहूरकरची पत्नी हिवरा येथे या प्रकरणाशी संबंधित दस्तऐवज नेण्यासाठी गुपचूप आली होती. ती ज्या खासगी बसने परतीच्या प्रवासाला निघाली, त्या बसचा शेतकऱ्यांनी कारने पाठलाग केला आणि पुण्यात शंकर पहूरकरला पकडले. या वेळी त्याने शेतकऱ्यांना धनादेश दिल्याने हे शेतकरी परतले. परंतु खात्यात पैसे नसल्यामुळे ते बाउंस झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अकोला, वर्धा, अमरावती जिल्ह्यांतही या पूर्वी शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे प्रकार घडले आहेत.

प्रतिक्रिया

मी विराट ४५ क्‍विंटल व डॉलर ८ क्‍विंटल या प्रमाणे ३ लाख ८० हजार रुपयांचा हरभरा विकला. गावातीलच व्यापारी असल्याने त्याच्यावर विश्‍वास ठेवला आता पश्‍चात्तापाशिवाय हाती काहीच नाही. पोलिसांनी देखील असहकार्याचे धोरण अवलंबिले आहे; त्यामुळे न्याय कुणाला मागावा, असा प्रश्‍न आहे. आम्ही युक्‍ती वापरून व्यापारी शंकर पहूरकरचा पुण्यात माग काढला. पोलिसांना हे काम का जमत नाही?  -विठ्ठल कहाने, शेतकरी हिवरा, ता. महागाव, जि. यवतमाळ

शेतकऱ्यांनी पुण्याला शंकर पहूरकरचा माग काढण्यापूर्वी आम्हाला कल्पना दिली असती, तर त्याचवेळी त्याला अटक करता आली असती. शेतकऱ्यांचे देखील सहकार्य यात आम्हाला अपेक्षित आहे.  - विलास चव्हाण, पोलिस निरीक्षक, महागाव, यवतमाळ

भद्रावती बाजार समितीचा पुढाकार  चंद्रपूर ः बाजार समिती भद्रावती व उपबाजार चंदनखेडा हद्दीत व्यापाऱ्यांकडून खेडा खरेदीच्या माध्यमातून अनधिकृतपणे शेतीमाल घेतला जात आहे. त्यामुळे बाजार समितीचा सेसही बुडत असून, शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा प्रकारही घडू शकतो. परिणामी, व्यापाऱ्यांनी खेडा खरेदी न थांबविल्यास त्यांच्याविरोधात कारवाईचा निर्णय भद्रावती बाजार समिती प्रशासनाने नुकत्याच झालेल्या बैठकीत घेतला आहे.  शेतातील सोयाबीन, तूर, धान काढणीस आला आहे. प्रक्रिया उद्योजकांची शेतीमालाला चांगली मागणी असल्याने दरातही तेजी आली आहे. याचाच फायदा उचलत काही व्यापाऱ्यांनी विनापरवाना शेतीमाल खरेदीसाठी खेडा खरेदीचा सपाटा लावला आहे. त्यामुळे विना परवाना खेडा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचा ठरावही सचिव नागेश पुनवटकर यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मंजूर करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com